Two calendars and 11 day leaps

Two calendars and 11 day leaps : दोन कॅलेंडरं आणि ११ दिवसांची उडी

1 min read

Two calendars and 11 day leaps : आपण रोज सकाळी उठतो, आवरतो, आपापली कामं करायला लागतो. दिवसभरात कितीतरी वेळा आपण त्या दिवसाची तारीख काय आहे हे बघत असतो. आज ही तारीख आहे, म्हणजे आता चार दिवसांनी शाळेची सहल; आज ही तारीख आहे म्हणजे आता आजी इकडे यायला १२ दिवस राहिलेत; अरेच्च्या, आज ही तारीख, म्हणजे उद्याच गृहपाठ द्यायचा आहे; असं काय काय आपल्या डोक्यात सुरू असतं. तारखा एकेक आकड्याने पुढे जातात, तो महिना संपतो, मग पुढच्या महिन्यात परत तसंच, हे आपल्या अगदी सवयीचं झालेलं असतं. पण समजा, एक दिवस असं झालं, की आज १० तारीख आहे, पेपरमध्ये आलंय, की उद्या क्रिकेटची मॅच आहे; रात्री झोपताना आपण ठरवलं, की उद्या पटापट कामं आवरून मॅच बघायची; आणि सकाळी उठल्यावर दिसलं की एकदम १६ तारीखच आली, मधले पाच दिवस कॅलेंडरमधून गायबच झालेत, तर?

खूप पूर्वी असा एक प्रकार झालेला आहे. माणसं दोन तारखेला झोपली आणि सकाळी उठल्यावर कॅलेंडरमध्ये थेट १४ तारीख आलेली होती. अर्थात त्या माणसांना असं होणार हे आधीच सांगितलेलं होतं. पण मुळात तारीख अशी पुढे का गेली, ती सुद्धा ११ दिवसच का, त्याची ही गोष्ट.

also read : Story of Brave on a Bicycle

पूर्वीच्या काळी घड्याळं वगैरे नव्हती तेव्हा सूर्य उगवल्यावर माणसाचा दिवस सुरू व्हायचा आणि सूर्य मावळल्यावर तो संपायचा. पण एकीकडे माणूस सूर्य, चंद्र, त्यांच्या उगवण्याच्या मावळण्याच्या वेळा, आकाशातल्या त्यांच्या वेगवेगळ्या जागा, यांचा अभ्यास करत होताच. त्यातूनच कधीतरी काळ-वेळ- दिवस मोजण्यासाठी कॅलेंडर तयार झालं असणार.

पुढे काही काळ असं एकच कॅलेंडर नव्हे, तर वेगवेगळी कॅलेंडरं वापरली जात होती. म्हणजे इजिप्शिअन कॅलेंडरमध्ये प्रत्येकी ३० दिवसांचे १२ महिने होते आणि प्रत्येक महिन्यात १० दिवसांचे तीन आठवडे होते. इतर कुठेतरी असंच आणखी वेगळंच काहीतरी वापरलं जायचं. तेव्हाचे राजे, त्यांचं सैन्य, साहसी प्रवासी वेगवेगळ्या खंडांमध्ये जायला लागले, मोठमोठ्या सम्राटांची मोठाली राज्यं स्थापन व्हायला लागली. मात्र सम्राट एकच, आणि त्याच्या राज्यातली कॅलेंडरं वेगवेगळी, त्यामुळे दिवस वेगवेगळे, असा गोंधळ व्हायला लागला.

Two calendars and 11 day leaps

हा गोंधळ दुरूस्त करायला हवा असं सर्वप्रथम वाटलं रोमन सम्राट ज्युलिअस सीझरला. त्याने ठरवलं की आपल्या राज्यात एकच कॅलेंडर हवं. मग त्याने तसं एक कॅलेंडर तयार करवून घेतलं. त्याचं नाव ‘ज्युलिअन कॅलेंडर’. हे कॅलेंडर तेव्हाच्या गणिती आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासाप्रमाणे केलेलं होतं. आपण ते सोप्या पद्धतीने समजून घेऊ या.

also read : Story of Brave on a Bicycle

पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला ३६५.२५ दिवस लागतात. ज्युलिअस सिझरच्या कॅलेंडरमध्ये यात थोडासा बदल करून वर्षाचे बरोबर ३६५ दिवस बनवले गेले. प्रत्येक महिन्यात ३० किंवा ३१ दिवस, फेब्रुवारीचे २८ दिवस, हे सगळे मिळून वर्षाचे ३६५ दिवस झाले. आता उरला फरक वरच्या ०.२५ दिवसाचा. तो भरून काढण्यासाठी दर चार वर्षांनी एकदा फेब्रुवारीमध्ये एक दिवस वाढवायचं ठरलं. पुढे १५ व्या शतकापर्यंत युरोपमध्ये हेच कॅलेंडर वापरलं जात होतं. १५ व्या शतकात १३ वा ग्रेगरी याने हे कॅलेंडर सुधारण्याचं ठरवलं. कारण ज्युलियन कॅलेंडर आणि सौर कॅलेंडर यांच्यात एक छोटासा फरक पडत होता.

अगदी नेमकं सांगायचं, तर एक सौर वर्ष म्हणजे ३६५.२४२२ दिवस. ज्युलिअन कॅलेंडरने तर ते ३६५.२५ दिवस धरलं होतं. त्यामुळे दरवर्षी दोन्हींत ०.००७८ दिवसांचा फरक पडायचा. आता आपल्याला वाटेल, हजारातला ७८ वा भाग म्हणजे अगदीच लहानसा झाला. तो सोडून दिला तरी काय बिघडणार आहे! पण तो साचत साचत गेला, की काय होईल ? पहिल्या वर्षी ०.००७८, दुसऱ्या वर्षी ०.०१५६, दहाव्या वर्षी ०.०७८, विसाव्या वर्षी ०.१५६ असं करत करत दर १२८ वर्षांनी दोन्ही कॅलेंडरमध्ये एका दिवसाचा फरक पडणार, हे पोप १३वा ग्रेगरी आणि त्याच्या कॅलेंडर सुधारणा समितीने सर्वांना सांगितलं. १५८२ मध्ये त्यांनी एक नवीन कॅलेंडर तयार केलं- ग्रेगोरियन कॅलेंडर. तोपर्यंत दरवर्षी ०.००७८ हा काळ साठत जाऊन ११ दिवस इतका झालेला होता. तो फरक भरून काढण्यासाठी कॅलेंडरमध्ये ४ ऑक्टोबर १५८२ नंतर थेट १५ ऑक्टोबर १५८२ तारीख घेतली गेली.

पुढे परत असा फरक पडू नये म्हणून लीप वर्षाचं, म्हणजे फेब्रुवारीत किती दिवस असावेत त्याचं गणितही त्यांनी थोडं सुधारून घेतलं. दर चार वर्षांनी एक लीप वर्ष येणार, पण वर्षाच्या संख्येला १०० ने पूर्ण भाग जात असेल तर ते लीप वर्ष नसेल; मात्र वर्षाच्या संख्येला ४०० ने पूर्ण भाग जात असेल तर ते सुद्धा लीप वर्ष मानायचं ठरलं. म्हणजे, १६००, १७००, १८०० ही लीप वर्ष नव्हती; मात्र २००० हे लीप वर्ष होतं. हे इथे तीन-चार वाक्यांमध्ये लिहिलेलं आहे खरं, पण तेव्हा त्यासाठी बरीच किचकट गणितं करावी लागली असणार हे नक्की.

also read : Story of Brave on a Bicycle

युरोपमधल्या अनेक देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरायला लगेच सुरुवात केली. इंग्लंड-अमेरिकेत मात्र १७५२ साली त्याचा वापर सुरू झाला. इंग्लंडमधले लोक २ सप्टेंबर १७५२ या दिवशी झोपले आणि सकाळी उठले तेव्हा तारीख १४ सप्टेंबर होती. आमचे ११ दिवस परत द्या, म्हणून काही काळ लोकांनी गोंधळ घातला. पण नंतर सर्वांना या नव्या कॅलेंडरची सवय झाली. जुन्या तारखेनुसार होणारे सगळे सण, उत्सव आता नवीन तारखेप्रमाणे व्हायला लागले. अमेरिकेतही हा बदल झाला. चक्क जॉर्ज वॉशिंग्टननेही ११ फेब्रुवारीचा आपला वाढदिवस तिथून पुढे २२ फेब्रुवारीला साजरा करण्यास सुरुवात केली. तारीख-वार, दिवस, महिने, वर्ष अगदी नेमक्या प्रकारे मोजता यावेत यासाठी ही सगळी धडपड.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.