The Story on Magic and Education in Marathi

The Story on Magic and Education in Marathi : जादू आणि शिक्षणावरील कथा.

1 min read

The Story on Magic and Education in Marathi : जादू आणि शिक्षणावरील कथा.

एकदा काय झाले, लांबच्या एका देशातून अश्विनकुमार नावाचा एक जादूगार मजल-दरमजल करत त्याच्या साथीदारांसह गोरखपूर गावात दाखल झाला. गावातली चांगली मोकळी जागा बघून त्यानं आपलं बस्तान तिथंच ठोकलं. त्याचे रोज तीन खेळ तिथे असायचे. जसजशी जादूगाराच्या जादूची चर्चा गावभर व्हायला लागली, तसतशी खेळ पाहायला गावकऱ्यांची गर्दीसुद्धा वाढायला लागली. आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तर पोरासोरांची तोबा गर्दी व्हायची. कारण त्या दिवशी पोरांच्या शाळेला नेमकी सुट्टी असायची. जादूगाराची बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या गावात काही दिवसांतच पोहचली.

गोरखपूर गावाच्या बाजूलाच असलेल्या संगमनेर गावातली मुलं तर जादूगाराच्या बातमीने एकदम हरखूनच गेली. कारण गोष्टींच्या पुस्तकांतच त्यांनी परीने केलेली जादू वाचली होती. पण जादू कशी असते, जादूची मजा काय असते, हे त्यांनी कधी पाहिलं नव्हतं, की अनुभवलं नव्हतं. गावातल्या पारावर जमलेल्या पोरांच्या घोळक्यात एकाच विषयावर चर्चा रंगायची ती म्हणजे जादूगाराची. जादूगार कसा दिसत असेल, त्याची टोपी, त्याचा कोट, त्याची काठी आणि त्या काठीवर मंत्र पुटपुटून तो करीत असलेली जादू….
याबद्दलच जो तो बोलत बसायचा. बबन्या मात्र गुमसूम बसलेला असायचा. बबन्या हा मुलखाचा मित्रा. जादूगाराच्या बातमीनं तो मनातून थोडा सटपटलाच होता. संभाने त्याला टोकलंच. ‘बबन्या, तुला काय झालं रं मूग गिळून गप्प बसायला?’ बबन्या म्हणाला, ‘मला तर बाबा, जादूगाराची खूप भीती वाटते. तो पोरांचं माकड करतो म्हणे. कधी टोपीतून कबूतर काढतो तर कधी काठी फिरवून, मंत्र म्हणून त्याच कबूतराचा तो पांढरा ससा करतो म्हणे. अरे बाबा, आपल्यालाच त्यानं कबूतर केलं म्हणजे?’

गावातला संभा तसा सगळ्या पोरांमध्ये हुशार. शाळा शिकून, शेतीची कामं वडिलांच्या बरोबरीने पार पाडणारा. अंगानं दणकट आणि गावातल्या पोरांमध्ये सर्वांत जास्त चाणाक्ष. पुस्तकं वाचायचा नादच त्याला भारी. भुताखेताच्या गोष्टींना तो कधीच घाबरत नव्हता. तो बबन्याला म्हणाला, बबन्या, काय लेका एवढं कशापायी त्या जादूगाराला घाबरतोस. अरे, माणसासारखा माणूसच की त्यो. आणि मला एक सांगा, जादू नुसती याच्या त्याच्याकडून ऐकण्यात काय मजा. जादू कशी आसतीया ती पाहिलीच पाहिजे. आणि मी पुस्तकात वाचलंय, अरे जादूगाराची जादूबिदू सबकुछ झूठ असते बाबा. त्याची ती हातचलाखी असतीया सारी. आणि त्यात विज्ञानबी असतंय, बरं ते आता सारं सोडा, उद्या हाय शाळेला सुट्टी. आपण उद्याच दुपारी गोरखपूरला जाऊया सारे, जादूचा खेळ पाहायला. अरं, तिकिटसुद्धा पोरांना अवघं पाचंच रुपये हाय. हाफ तिकीट. मग काय ठरलं ना आता पक्कं. उद्या सर्वांनी अकरा वाजता इथं जमायचं आणि मग इथूनच दुपारचा जादूचा खेळ पाहायला आपण साऱ्यांनी जायचं आणि लक्षात ठेवा, जो येणार नाही तो मित्राभागुबाई बरं का. संभाच्या बोलण्यावर साऱ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. मग एकमेकांना टाळ्या देत उद्या यायचं कबूल करत जो तो आपापल्या घराकडे वळला.

Also Read : The Story on Forest Boy and His Dream in Marathi

दुसऱ्या दिवशी जादूचा खेळ पाहायला जायचं म्हणून संभानं आईकडे हट्ट धरला. आईनेही फार आढेवेढे घेतले नाही. गोरखपूर गाव तसं त्यांच्या संगमनेर गावालाच चिकटून उभं असलेलं गाव. आठवड्याच्या बाजाराला या गावातली लोकं गोरखपूरलाच जायची. आई म्हणाली, ‘जा पण खेळ संपल्याबरोबर आपलं घर गाठायचं. सुट्टी म्हणून नुसतं इकडंतिकडं बाजारभर भटकत बसायचं नाही. तडक घराकडं निघायचं. कबूल?’ संभा आनंदानं म्हणाला, ‘व्हह्य व्हय. कबूल कबूल.’

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेवर बबन्या, संभा, परश्या, धन्या, म्हादू, यसूदास, गणप्या… सारे सारे आले. सारेच मोठ्या उत्साहात गोरखपूरच्या दिशेने निघाले. गप्पा मारता मारता अर्धा पाऊण तास कसा गेला हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. एकदाचे सारे जादूगाराच्या तंबूजवळ पोहोचले. साऱ्यांनी आपापलं तिकीट काढलं. कधी एकदा जादूचा खेळ सुरू होतोय असं पोरांचं झालं. काही क्षणातच जादूगार खांद्यावर दोन तीन पांढरे उंदीर घेऊन मुलांसमोर हसत हसतच आला. त्याचा कोट काळा आणि टोपी पांढरी आणि डोळे करारी. कुणावर रोखले तर समोरच्याला भीतीच वाटावी अगदी तस्से. बरेच जादूचे खेळ दाखवले त्याने. शेवटी त्याने स्टेजवर कोणत्याही एका मुलाने यावे असे आवाहन केले. लगेच संभा चपळाईने स्टेजवर गेला. जादूगाराने संभासमोर एक सरळ सपाट बुड असलेले धातूचे भांडे घेतले. मग एक साधे रंगीत सुती कापड घेतले. हे कापड भांड्याभोवती पूर्णपणे फिट असे बसवले आणि त्याच्या टोकाला पिळ दिला हाताने. जेणेकरून कापड सैल राहणार नाही.

मग त्याने दुसरे एक कापड रॉकेलमध्ये बुडवून चिमट्यामध्ये पकडून पेटवले व धातूच्या भांड्यावरील कापडावर ठेवले. पोरांना वाटले भांड्यातले कापडसुद्धा जळाले. त्याची राख झाली. जाळ विझल्यावर राख फेकून जादूगाराने भांड्यातील कापड पोरांना दाखवले. कापड मुळीच जळालेले नव्हते. पोरांनी टाळ्या वाजवल्या. राखेतून कापड काढले. जादू झाली असे मुलांना वाटले. पण संभाने सांगितले, धातूचे भांडे हे उष्णतावाहक आहे त्यामुळे भांड्याने उष्णता शोषून घेतली. त्यामुळे आतल्या कापडाला उष्णता लागलीच नाही म्हणून ते जळाले नाही.

संभा अभ्यासात हुशार, चाणाक्ष, सडेतोड बोलणारा आणि न घाबरणारा. त्याने जादूमागचं विज्ञान पटवून दिलं. जादूगाराची हातचलाखीसुद्धा ओळखली. जादूगार एकदम आवाक झाला. त्याने संभाला जवळ घेतलं आणि म्हणाला, पोरांनो, माणसाला दोन डोळे असतात. तो त्या दोन डोळ्यांनी वरवरचंच पाहतो. पण दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. पण या संभाजीकडे त्याच्या दोन डोळ्यांसोबतच शिक्षणाचा तिसरा डोळा आहे. तो पाहतो, अनुभवतो. चिंतन करून त्याचं मत तयार करतो. हीच हुशारी आपल्या पुढच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडते हे ध्यानात ठेवा. माझ्यासाठी नव्हे तर या संभाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्यांचा कडकडाट झाला. टोपलीतला एक ससा जादूगाराने संभाला आपली आठवण म्हणून भेट दिला.

घराकडे जाताना परतीच्या वेळी संभासोबत त्याचे गावचे मित्र तर होतेच पण आता आणखी एक नवा मित्र त्यांच्यात सामील झाला होता… आणि तो चक्क संभाच्या खांद्यावरच बसला होता. तो मित्र म्हणजे पांढराशुभ्र ससा. सशाने संभाच्या खांद्यावरून टुणकन् खाली उडी मारली. पण तो पळून गेला नाही. संभाचा सहवास त्याला आवडला बहुतेक. शहाण्या पोरासारखा तो त्यांच्यासोबत टुणटुण उड्या मारत चालू लागला. बबन्या लगेच म्हणाला….

गोजिरवाणा म्हणताच आठवतं याचं रूप

कापसासारखा रंग शोभे त्याला खूप

लांब कान करून टवकारून तो पाही

टुणटुण उड्या मारत हा मित्र जवळ येई

यावर सारेच हसले. सगळे का हसले बुवा? म्हणून ससा सगळ्यांकडेच कावराबावरा होऊन पाहायला लागला. पोरांचा पुन्हा हशा पिकला. संभाने मग प्रेमाने त्या सशाला आपल्या खांद्यावर घेतलं तेव्हा कुठं सशाला हायसं वाटलं. पोरांच्या गप्पा मग पुन्हा सुरू झाल्या. गप्पांचा विषय आता एकच… ससुल्यागडी.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.