The Story on Forest Boy and His Dream in Marathi

The Story on Forest Boy and His Dream in Marathi : फॉरेस्ट बॉय आणि त्याचं स्वप्न कथा.

1 min read

The Story on Forest Boy and His Dream in Marathi : फॉरेस्ट बॉय आणि त्याचं स्वप्न कथा.

तेजसला खूप स्वप्नं पडायची. दचकून जाग यायची. काही आठवायची, काही आठवायचीच नाहीत. एखादं स्वप्न खरं वाटायचं. एखादी खरी गोष्ट स्वप्नासारखी वाटायची. तो झोपेत खूप बडबडतो असं मम्मी म्हणायची; पण मोबाईलवर ते बोलणं रेकॉर्ड कर म्हटलं तर करायची नाही. खरं आणि खोटं यात खूपदा गोंधळायला होतं, असंही त्याला वाटायचं. ओंडका आहे असं वाटायचं; पण तो कोकणरानातला कोंबडा गिळून बसलेला अजगर असायचा. उडत गेलं ते फुलपाखरू की पतंग, कळायचं नाही. कधी कधी तर स्वप्नात भुतं पण यायची. सगळीच भुतंखेतं त्रास देणारी नसतात. स्वप्नातल्या भुतांच्या सावल्या पडत नसत. एखादं भूत बिचारं सावली शोधत, सावली मागत यायचं; पण खूप ऊन पडलं, तरी भुताला सावली भेटायची नाही. मुळात उजेडात यायला भुतं घाबरायची. चंद्रप्रकाशात नाच करणारी भुतं मात्र होती; पण रात्रभर वाऱ्यावर भटकणाऱ्या भुताटकीची दया यायची. भुतं कुठं जेवत असतील? कुठं निजत असतील? त्यांची लग्नं होत असतील का, असे प्रश्न मनातच लोंबकळत राहायचे.

सुटीच्या दिवशी नानी म्हणजे त्याची आज्जी त्याला हाक मारायची. ‘तेजा, ऊठ आता. ‘पहाटेचे’ नऊ वाजले राजा. घावन केले आहेत मी. गारेगार घावन खाणार आहेस का तू? काल रात्री गारा पडत होत्या. गारांचा पाऊस पडून गेला. माहीत आहे का?’ नानी किती प्रेमळ होती ! खरं तर ती आईची आई.

तेजसला मात्र एकटं एकटं राहायला खूपच आवडायचं. कोकणरानात एक मोठ्ठी गुहा होती. त्या गुहेत वटवाघळांचे थवे पण होते. ही वाघळं झोपताना स्वतःला उलटं टांगून घ्यायची. त्या गुहेपाशी पिंपळाचं सळसळतं झाड होतं. ते जिवंत माणसासारखंच वाटायचं. तिथं तेजस एकटा जाऊन बसायचा. अभ्याससुद्धा करायचा. रानात एक स्मशान होतं.

रानाकडे जाण्याचं आणखी एक कारण होतं. तिथं तळं होतं. तळ्यात रंगबिरंगी मासे होते. ते पायांना गुदगुल्या करायचे. पाण्यात पाय सोडून बसलं तरी लगेच यायचे. तळ्यात फारसं पाणीच नव्हतं. तळं पूर्ण आटलं तर, मासे तडफडतील ! त्यातले काही रंगीत मासे पकडून तेजसनं घरच्या काचेच्या मत्स्यपेटीत सोडले होते. टँकमधील पाण्याची काही वाफ होणार नव्हती. गप्पी मासे, पिडतुली नावाचे झेब्रा फिश, गोड्या पाण्यातली कोळंबी, वाघ्या मासे… तळ्यानं तेजाला खूप मासे दिले !

तेजसच्या स्वप्नात नागराज येऊ लागला. हा नागोबा केवढा मोठ्ठा होता. फणा काढून उभा राहिला तर तेजसच्या विशाल दादाएवढा उंच पुरुष वाटेल ! राजनाग आपल्याला चावणार नाही याची तेजाला खात्री होती. नागराज त्या तळ्याजवळच्या गुहेकडे निघून जायचा. म्हणजे तो गुहेतच राहायचा तर ! स्वप्नातला तो राजनाग ‘भुजंग’ जातीचा होता. इंग्लिशमध्ये किंग कोब्रा. इतका चपळ, एवढा विषारी, असा मोठा नाग कोकणात असणं, दिसणं शक्यच नाही, पण स्वप्नात तो यायचा ! त्यानं नानीला त्या तेजस्वी नागाबद्दल सांगितलं, तर तिनं फक्त हवेत हात जोडले आणि ती स्वतःशीच काही पुटपुटली. काय ते कळलं नाही.

नागराज काही दिवस स्वप्नात दिसला नाही, तर तेजसला अस्वस्थ वाटायचं. असं का वाटतं, नागोबा स्वप्नात आपल्यालाच का भेटतो, ते कुणाला विचारायचं? त्याने सर्पमित्राला अनुपभाईला विचारलं. अनुप साप हाताळणारा, लोकांच्या घरात शिरलेला सर्प पकडून त्याला पुन्हा रानात सोडणारा सापांचा मित्र होता. विषारी घोणस, मण्यार, फुरसं असे सापही त्यानं पकडले होते. अनुपभाई म्हणाला, ‘स्वप्न मला काय सांगतोस ? किंग कोकाची पद्धत माहीत आहे का तुला? नागीण पाचोळ्याची घरट्यासारखी रचना करून त्यात अंडी घालते. तो तुझा ‘किंग’ गुहेत कशाला जाईल? उद्या तू सांगशील, गुहेत गुप्त धन पुरलेलं आहे. अनुपनं तेजसची थट्टाच केली.

Also Read : Story of Too Much Soil in Marathi

डोलणारा, फक्त तेजसशी काहीतरी अस्पष्ट बोलणारा तो भुजंग फक्त स्वप्नापुरता नाही, असं तेजसला नक्की वाटू लागलं. गुहा आत आत कुठपर्यंत गेली आहे, हे तेजाला ठाऊक नव्हतं; पण किंग कोका गुहेत नक्की असणार असं त्याच्या मनानं घेतलं होतं. दाट जंगलात साप खूपच होते; पण भुजंगही आहे, ही फक्त तेजसची भावना होती. वर्गातले मित्र तर हसूच लागले. पियुष तर म्हणाला, ‘तुला स्वप्नात अॅनाकोंडासुद्धा दिसेल. दोन-तीन अॅनाकोंडे पकडलेले असतील स्वप्नाच्या वाटेवर…

त्या रात्री स्वप्नात आलेला भुजंग काय बोलला ते तेजसला नीट ऐकू आले. नाग म्हणाला, ‘मला जंगलात राहायचा कंटाळा आलाय रे. मला माणसांत राहायचंय ! तुम्ही मुलं किती चांगली आहात. मला फुला-फळांच्या बागेत नेऊन सोड. तिकडे कसं जायचं ते मला माहीत नाही. माझ्यासाठी तेवढं कर रे बाळा !…

तेजसला जाग आली. स्वप्न तर पडून गेलं. गुहेत राहणारा तो भुजंग माणसांत यायला बघत होता. वेगळं काही मागत होता. त्याला एकट्याला रानात राहायचं नव्हतं. इतर जातीचे साप होते; पण त्याचं असं तिथं कुणीच नव्हतं. त्याच्यासाठी पाचोळ्याचं घरटं तयार करणार कोण? नागोबा अगदी एकटा पडला होता. तो त्या कोकणरानात कुठून कसा आला ते एक गूढच होतं.

तेजसचं लक्ष अभ्यासात लागेना. जीवशास्त्राच्या पुस्तकात मात्र नागराजाचा फोटो होता. फोटोतला नाग तेजसकडे एकटक बघत होता. तेजस कितीतरी वेळ त्या नागाच्या फोटोकडेच बघत बसला होता. त्याला अचानक आठवलं की, त्याचे आजोबा असताना नानी गावात त्यांच्याबरोबर राहायची तेव्हा त्यांच्या त्या घरात पितळेचा उंच, उभा नागराज होता. ती नागाची प्रतिमा किती सुंदर होती. नानी एकदा फोनवर म्हणाली की, ती नागाची प्रतिमा गायब झाली ! जणू नाग जिवंत होऊन निघून गेला. नानीनं पितळी नाग खूप शोधला; पण मिळालाच नाही. एखादा दागिना चोरीस जावा, तसं वाटलं नानीला! तो काही वारुळातला साधा नाग नव्हता! नागाची ती पितळी मूर्ती कुणी चोरली म्हणावं, तर फक्त तेवढीच वस्तू कशी चोरीला जाईल? शिवाय, कुणी नोकरमाणूसही त्या मोठ्या घरात नव्हता. मग तो पितळी नाग गेला कुठं? अदृश्य कसा झाला? सगळंच अद्भुत होतं आणि म्हणूनच असेल, तेजसच्या स्वप्नात भुजंग येऊ लागल्यावर नानीनं त्याला नमस्कार केला होता. थोडी भीती आणि काळजीच वाटली तिला !

तेजस आता रोजच अनुपदादाकडे हट्ट करू लागला. म्हणाला. ‘भाई, आपण जाऊया ना गुहेच्या आत. शोधूया ना नागराजाला. तो नक्की आहे तिथं ?’

तेजसच्या त्या भुजंगासाठी म्हणून नव्हे; पण गुहा एकदा बघायचीच आहे. दुसरं काही सापडेल म्हणून दिवसाढवळ्या अनुप, तेजस आणि अनुपभाईचा मित्र सागर गुहेत शिरले. दिवस असूनही मोठे कमांडर टॉर्च लावावे लागलेच. अचानक, हिस्सऽऽ हिस्सऽऽ असा आवाज आला!… सापच होता तो. ओ हो ! चक्क भुजंग दिसला तेजसला. तो डोळे विस्फारून बघतच राहिला. उंचापुरा, देखणा, एखाद्या राजपुत्रासारखा नागराज ! अनुप तर फारच चकित झाला. फणा काढलेल्या नागोबाचा फोटो सागरदादानं काढला.

‘फुला-फळांची बाग’ खरोखरच होती. खासगी अभयारण्य होतं ते. चंदूकाकानं ते राखीव जंगल राखलं होतं. चंदू मोहिते कोकणातला निसर्गभक्त होता. फुला-फळांच्या बागेत मुलांच्या सहली जायच्या. पर्यटक यायचे. तिथं राहायची इच्छा भुजंगानं आधीच स्वप्नात बोलून दाखवली होती.

त्यानं त्याचा फणा मिटला आणि तो शांत पडून राहिला. सळसळ वळवळ न करता, चावण्याचा प्रयत्न न करता. अनुप व सागरला त्यानं स्वतःला धरू दिलं ! नागराज कोकणातही आहे ही मोठी बातमी ठरली. यु ट्यूब चॅनेलवाले तर लगेच बातमी द्यायला आले. फुला-फळांच्या बागेत तो भुजंग आता आनंदात आहे. प्राण्यांना रानच मानवतं, असं नाही. बागही आवडते. मुलं नागराजाचं दर्शन घ्यायला बागेत येतात. तेजसची स्वप्नं व गुहेतला नाग हा योगायोग होता का ? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.