Story on Dream of a Boy in Marathi

Story on Dream of a Boy in Marathi : एका मुलाच्या स्वप्नावरची गोष्ट.

1 min read

Story on Dream of a Boy in Marathi : एका मुलाच्या स्वप्नावरची गोष्ट.

लक्ष्मी विलास रो हौसिंग सोसायटीमध्ये पीयूषच्या बाबांचाही बंगला होता. पीयुष विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकत होता. बाकी मुले स्कूल व्हॅनमधून शाळेत जात असत; पण पीयूषला त्याचे वडील कारमधून शाळेत सोडत. त्यांच्या कंपनीच्या मार्गावरच शाळा असल्यामुळे दोघे एकदमच घरातून बाहेर पडत. प्रकाश सोहनी साहेब म्हणजे एक प्रस्थ होते. ते कोणातही मिक्स होत नसत. पीयूषच्या सोसायटीत तसे फारसे कोणीच कोणाशी बोलत नसे. मुलेही एकत्र खेळत नसत. पीयूषची आई प्रतिभाताई स्वभावाने साध्या होत्या. पीयूषलाही आईसारखीच माणसांची आवड होती; पण सोहनी साहेब त्यांना कोणासोबत बोलू देत नसत.

‘लक्ष्मी विलास’च्या शेजारी एक सरस्वती हौसिंग नावाची सोसायटी होती. मध्यमवर्गीय संस्कृतीची माणसे तेथे राहत होती. तेथील माणसे कष्टकरी, एकमेकांशी मिसळून वागणारी होती. मुले मराठी माध्यमाच्या शाळेत जाणारी होती; पण पीयूषला मात्र ती फार आवडायची. सोहन, चिन्मय, स्प्नील, सागर, मोहन हे त्याचे दोस्त झाले होते. सोहनी साहेब कामानिमित्त बाहेरगावी गेले की पीयूष तिकडे त्यांच्यासोबत खेळायला जायचा. ती मुले अनेक प्रकारचे मैदानी खेळ आनंदाने खेळत असत. कधी गोष्टी, विनोद सांगत, भेंड्या लावत. असेही बैठे खेळ ते खेळत असत. कारण त्यांच्यातच एक शैलेश नावाचा अंध मुलगा होता. त्याला बाकीचे खेळ खेळता येत नसत. त्यासाठी बाकीची मुले त्याचा विचार करून बैठे खेळ, गंमत करत असत.

पीयूषला शैलेश फार आवडायचा. कारण तो हुशार होता तसाच स्वभावाने शांत, समजूतदार होता. कोणाची भांडणे होऊ लागली की मध्ये पडून छान समजावून ती सोडवायचा. शैलेशला वडील नव्हते, एक छोटी बहीण आणि आई होती. शैलेश अंध शाळेत जायचा. ब्रेल लिपीतून अभ्यास करायचा. त्याचा आवाज चांगला होता आणि जात्याच गाण्याची समज होती. त्यामुळे छान गाणी म्हणायचा. शाळेत एकटाच काठीच्या अंदाजाने जायचा. पीयूषला या गोष्टीचे वाईट वाटायचे. त्याच्या मनात कितीदा तरी विचार यायचा, की बाबांनी आपल्यासोबतच त्यालाही शाळेत सोडावे. माझ्या आधीच त्याच रस्त्यावर त्याची शाळा आहे; पण ते केवळ अशक्य आणि अवघडच होते याची त्याला पूर्ण कल्पना होती. पीयूषला शाळेतून घरी येण्यासाठी स्वतंत्र रिक्षा होती. त्या वेळी आपण शैलेशला बरोबर आणावे, असेही त्याला वाटे; पण बाबांना हे विचारण्याचे धाडसच होत नसे.

Also Read : The Story on Magic and Education in Marathi

बिचारा पीयूष रोज याच विचारांत मग्न असे. काय बरे करावे? कसा सोडवावा हा प्रश्न ? एके दिवशी पीयूष शांत झोपला होता. उद्या रविवारची सुट्टी असल्याने लवकर उठण्याची घाई नव्हती. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या म्हणीप्रमाणे त्या दिवशी त्याला एक सुंदर स्वप्न पडले. स्वप्न कसले ते, ते सर्व खरेच घडत आहे, अशा भ्रमात होता तो ! त्याच्या स्वप्नात एक माणूस आला. पीयूषने त्याला विचारले, कोण आहात तुम्ही?

तो म्हणाला, ‘पीयूष, तू ओळखले नाहीस मला! मी जादूगार मनोहर.’

पण तुम्हाला माझे नाव कसे माहीत?’ ‘

‘अरे मी जादूनेच ते ओळखू शकलो ना? बोल, काय हवे आहे तुला? काय इच्छा आहे तुझी? मी सहज पूर्ण करू शकेन.’

‘खरेच !’

‘हो, अगदी खरेच.’

‘शेजारच्या सोसायटीत माझा शैलेश नावाचा मित्र आहे. तो अंध आहे. त्याला तुम्ही जादूने दृष्टी घाल का?’

‘नाही रे बाळा, ही जादू नाही करू शकत मी ! ही जादू तर फक्त देवच करू शकतो; पण तुम्हा मुलांना हवा असलेला कोणताही खाऊ मी जादूने माझ्या मुठीतून काढून देऊ शकेन, माणसे इकडची तिकडे करीन. त्यांच्या मनातले विचार बदलवू शकेन. मग सांग बर, काय करू मी तुझ्यासाठी?’

‘माझ्या बाबांचे विचार बदलू शकाल? त्यांचे मन ओळखून बदलवाल का?’

‘हत्तीच्या, एवढेच ना! हे तर तूही करू शकशील. तुला शिकवतो मी ती जादू, तुला एक मंत्र शिकवतो. तो तू ५ वेळा म्हण. म्हणजे ते तुझ्या मनाप्रमाणे वागतील.’

झाले. जादूगाराने मंत्र शिकवताक्षणीच पीयूषने तो ५ वेळा म्हटला आणि काय आश्चर्य! बाबांनी लगेचच आपण होऊन पीयूषला शैलेशला घरी बोलावण्यास पाठवले. शैलेशही लगेच घरी आला. बाबांनी त्याची सर्व चौकशी केली आणि म्हणाले, ‘ठीक आहे. उद्यापासून तू आमच्याच सोबत शाळेत यायचे. मी हॉर्न देईन. मग तू तयार होऊन पाच मिनिटांत रस्त्यात येऊन उभा राहा आणि बरे का, संध्याकाळीसुद्धा तू पीयूषसोबतच घरी ये. रिक्षावाले काकांशी मी बोलतो तसे.’ पीयूषला हे सारे ऐकून खूप आनंद झाला आणि आश्चर्याचा धक्काही बसला. त्याने बाबांचे मनोमन आभार मानले. जादूगारालाही खूप धन्यवाद दिले आणि म्हणाला, ‘जे आम्हाला जमले नाही, ते तुमच्यामुळे शक्य झाले. असेच मला वेळोवेळी मदत करा!’ जादूगारालाही आनंद झाला आणि तो अदृश्य झाला.

‘पीयूष, अरे १० वाजले. उठतोस ना राजा !’ आईच्या हाकेने पीयूष जागा झाला. जादूगाराला इकडे तिकडे शोधू लागला; पण जादूगार कुठे दिसेना. पाहतो तर काय, उशिरा उठल्याचा राग बाबांच्या चेहऱ्यावर दिसत होताच. अरेच्या, म्हणजे ते स्वप्न होते तर ! बिचारा हिरमुसला; पण मनात एक विचार नक्की केला की येताना तरी आपण शैलेशला खरेच बरोबर आणू या. आपल्या मनी बँकेत वाढदिवसाला भेट आलेले पैसे आपण साठवले आहेत, ते रिक्षावाले काकांना शैलेशसाठी देऊ. मी एवढे तरी नक्कीच करू शकेन; पण त्या काकांनी बाबांना सांगितले तर ! कल्पनेनेच पोटात गोळा आला. काही नाही. निदान उद्या एक दिवस तरी आपण शैलेशला गाठू आणि आपल्या सोबतच घरी आणून सोडू. निश्चय पक्का झाला आणि पीयूष वॉशरूमकडे पळतच गेला ब्रश करण्यासाठी !

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.