मी फिरायला जाते तेव्हा ! गोष्ट मराठीत.
Story of When I go for a walk! : ..तर मागच्या रविवारी आम्ही आमची कार घेऊन मस्त फिरायला गेलो होतो. आई, बाबा, मी आणि माझा भाऊ. पाऊस पडून गेल्याने सगळे डोंगर हिरवेगार वगैरे झाले होते. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. वातावरण एकदम रिफ्रेशिंग होतं. मजा आली. एरवी मी आणि माझा बाबा एवढेच फिरायला जात असतो – बाइकवरून. पाऊस पडायला लागला की भिजायला जातो. उन्हाळा असेल तर हवा खायला नि हिवाळ्यात दातांचे आवाज ऐकायला. पण जातो म्हणजे जातोच. आमची बाइक म्हणजेही भारीच. ती एवढी मोठीच्या मोठी आणि ऐटबाज आहे की येणारे-जाणारे तिच्याकडे बघत बसतात.
Story of When I go for a walk! in Marathi
तिचं दिसणं, तिचा भ्रम भ्रम आवाज सारंच मस्त. आम्ही रात्री जातो फिरायला, तर रस्त्यावर कुत्रीही फिरत असतात, टोळक्या-टोळक्याने. तीही बाइककडे बघत राहतात. बिचकतातही. मी नेहमी बघते – रात्री कुणाकुणाच्या मागे धावत जाऊन कुत्री त्यांना घाबरवून टाकत असतात; पण आमच्या बाबतीत असं होत नाही. आम्ही जायला लागलो की जणू रांगेने उभी राहून आमच्या बाइकला सलामीच देतात. अशा गोंधळलेल्या कुत्र्यांकडे बघायला मला भारी मजा येते. कारण कुत्र्यांच्या दोनच प्रतिक्रिया आपल्याला नेहमी दिसतात. एक तर ती घाबरून पळून जाताना दिसतात किंवा रागावून अंगावर धावून येताना दिसतात. मात्र, आमची बाइक बघितली की ती घाबरतात पण पळून जात नाहीत आणि रागावतात पण मागे लागत नाहीत. मुळात मला कुत्री फार आवडतात. त्यामानाने मांजरी वगैरे अजिबात आवडत नाहीत.
त्यांच्याशी फार लाडीगोडी लावावी लागते. फुसफुस करा, गोंजारा, खायला-प्यायला द्या, त्यांच्या चोऱ्या सहन करा… आणि शिवाय त्या कधी नखं काढून बोचकारतील याचा काही नेम नाही. माझी एक मैत्रीण आहे, ती सारखी तिची मांजर घेऊन बसलेली असते. ती इतकी मांजर-मांजर करत असते की तीही मांजरासारखीच बनली आहे. मध्येच फिस्कारते, मध्येच पायापायांत करते. अशा मुली मला अजिबात आवडत नाहीत. पण मी एक बघितलंय, की माझ्या वर्गातली किंवा सोसायटीतली मुलं अशी नसतात. मुलांचं (म्हणजे मुलग्यांचं) वागणं बऱ्यापैकी सरळसोट असतं. दोस्ती तर दोस्ती, खुन्नस तर खुन्नस. हे मला आवडतं. म्हणजे त्यांचीही भांडणंबिंडणं होतात, पण सर्व मामला खुल्लम खुल्ला असतो. वेळ आली तर दोन देतात नि दोन घेतात पण फिस्कारत बसत नाहीत, मांजरीसारखी नि मांजर घेऊन बसणाऱ्या मैत्रिणीसारखी. खरं तर मुलं मला कुत्र्यांसारखीच वाटतात. कदाचित त्यामुळेच मला मुलं जास्त बरी वाटत असणार. मला अजून मुलांचं माहीत नाही पण कुत्री खूप वर्षं आपली ओळख ठेवतात, भेटीगाठी होत नसल्या तरी, हे मला नक्की माहीत आहे. आपला नुसता आवाज ऐकला तरी ती ओळखतात कोण आलंय ते. मी माझ्या आत्याकडे जाते कधी कधी सुटीला, तर तिच्याकडचा कुत्रा माझ्याशी असाच वागतो. त्या कुत्र्याची आई असते आत्याच्या शेतावर, पण माझं तिच्याशी तेवढंसं जमत नाही. कारण शेतावर गेलं, की खेळायला, फिरायला, मजा करायला एवढ्या गोष्टी असतात की मी तिकडेच गुंतते.
also read : Story of Strange mail of the post! in Marathi
हे शेत मस्त एका डोंगरावर आहे. तिथून आसपासचा भाग झकास दिसतो. वारा असा भन्नाट असतो ना, की पतंग नुसता धरला की भराभर आकाशात चढू लागतो. दोन-पाच मिनिटांत अख्खी चक्री रिकामी होते. पतंगाच्या दोऱ्याला असा काही ताण असतो, की मजाही वाटते नि भीतीही. पण काहीही म्हणा, पतांगाशी खेळायला मजा येते मला. तासन्तास उडवतो आम्ही पतंग तिथे. मग सगळे लोक म्हणायला लागतात, “पुरे झाला पतंग. आता जेवायला चला गरम गरम.” शेतावरचं जेवण तर काय एकदम भारी असतं ! चुलीवरच्या गरम गरम भाकरी, वांग्याची रस्सेदार भाजी आणि मिरचीचा ठसका येणारा ठेचा. पण खरं सांगते – शेतावरची भाकरी नुस्ती लोणी नि मीठ लावून खाल्ली ना, तरी मस्त लागते. नको ती भाजी नि नको तो ठेचा. पण तशीच भाकरी आपण घरी येऊन खाण्याचा प्रयत्न केला की मात्र अगदी नको वाटतं. असं का ? घरी असलं की वाटतं, वेफर्स खावेत, मॅगी खावी, पिझ्झा मागवावा, आइस्क्रीम खावं. आइस्क्रीम मला फक्त चॉकलेट फ्लेवरचं आवडतं.
कुठेही गेलं तरी मी आपलं चॉकलेट आइस्क्रीमच खाते. सगळेजण चिडवतात मला त्यावरून. वेगवेगळे फ्लेवर्स खाऊन बघावेत, असंही सांगतात. पण लहानपणापासून मला फक्त चॉकलेट आइस्क्रीमच आवडतं. मी मध्ये पेपरमध्ये वाचलेलं, की तुम्हाला आइस्क्रीमचा कोणता फ्लेवर आवडतो यावरून तुमचा स्वभाव ओळखता येतो. मला नक्कीच वाटतं, की चॉकलेटची चव आवडणारी माणसं नक्की मनाने चांगली, मनमिळाऊ, चांगलं चांगलं करावंसं वाटणारी असणार. आणि तो पेपरमध्ये आलेला अभ्यास असं सांगत नसेल, तर मी म्हणेन, की तो अभ्यास फ्रॉड असणार. मला माझी आई सांगत होती, की अमेरिकेत असे परस्परविरोधी निष्कर्ष सांगणारे अभ्यास सतत छापून येत असतात. ‘कॉफी चांगली कॉफी महावाईट’, आइस्क्रीम चांगलं – आइस्क्रीम महावाईट.’ तिकडे तर दारूही लिव्हरला चांगली असं सांगणारं संशोधन केलं जातंय म्हणे.
अमेरिकेचं मला काही कळतच नाही, की त्यांचं काय खरं असतं आणि काय खोटं असतं ! माझे आजोबा मला सांगत होते, की अमेरिकेने जंग जंग पछाडून ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याला शोधून काढलं, त्याला ठार मारलं आणि जगाला त्याच्या अतिरेकी कृत्यांपासून मुक्त केलं. पण आजोबाच मला सांगत होते, की हा ओसामा पूर्वी अमेरिकेचा मित्र होता आणि त्याला अमेरिकेनेच मोठा केला होता! हे सर्व कळल्यापासून मला अमेरिकेचं गौडबंगाल कळेनासं झालं आहे. माझा मामा असतो अमेरिकेत. त्याची नोकरीच अशी आहे की त्याला अमेरिकाभर फिरावं लागतं. मामीही कामात असते आपल्या-आपल्या. कामं करून करून ते कंटाळून जातात, पण कंटाळा घालवण्यासाठीही ते फिरायलाच जातात. असेच एका रविवारी ते आपली गाडी घेऊन फिरायला गेले, तर…
ईऽऽऽ! मी हे काय सांगत बसल्येय ? मी काय सांगत होते, की मी आई-बाबा आणि माझा भाऊ परवा मस्त फिरायला गेलो होतो, तेव्हा ना…
also read : Story of Strange mail of the post! in Marathi
Leave a Comment