Story of Too Much Soil in Marathi

Story of Too Much Soil in Marathi : अति तिथे माती गोष्ट.

1 min read

Story of Too Much Soil in Marathi : अति तिथे माती गोष्ट.

साफल्य सोसायटीत विक्रम काळे आणि त्यांचे कुटुंब राहत होते. पत्नी रश्मी नोकरी करत असे. मुले विराज आणि पार्थ शाळेत जात. विराज उत्तम क्रिकेट खेळत असे. क्रिकेटची मोठी ट्रॉफी त्यांच्या संघाने जिंकली होती. या रविवारी घरी पार्टी ठरली होती.

पार्थ शाळेच्या शिबिरातून सहा दिवस एका खेड्यात गेला होता. शेतकरी जीवन मुलांना अनुभवायचे होते. तिथली कामे बघायची होती. तिथे कामही करायचे होते. शहरातील मुले चार दिवस इतके काम करून दमली. त्यातले शेवटचे दोन दिवस पावसात काम केले. त्यामुळे बरीच मुले सर्दी-तापाने आजारी पडली. रविवारीच पार्थला आणायला जायचे होते.

पार्थ आला त्याच वेळी विराजची पार्टी चालू होती. पावभाजी, आइस्क्रीमचा घमघमाट पसरला होता. पावभाजी, आइस्क्रीम त्याचा जीव की प्राण. ते पाहताच तो खूश झाला. खरेतर एकीकडे त्याचा ताप वाढत चालला होता. पदार्थ पाहूनच तो ओरडला, ‘मी पण खाणार पावभाजी, आइस्क्रीम.’ आईने खरेतर डॉक्टरांना बोलवले होते. अंग चांगलेच तापले होते. तपासताच डॉक्टर म्हणाले, ‘गोळ्या, औषधे लिहून देतो; पण गार, तेलकट काही देऊ नका.’ हे ऐकताच पार्थ खूप चिडला. थयथयाट करू लागला. मला काही झाले नाही, मी सगळे खाणारच. रागाने सैरभैर झाला होता. बळेबळे त्याला रश्मीने दुसऱ्या खोलीत नेऊन झोपवले. रागाने त्याची विचारशक्ती कमकुवत झाली होती. एकीकडे मुसमुसत होता. तापाने थोडीशी ग्लानीही येत होती.

पार्थ, हॅलो, एक गोड मंजुळ आवाज त्याला ऐकू आला. त्याची गोष्टीतली आवडती नीलपरी मंद पावले टाकत येत होती. तिने पार्थच्या पाठीवर हात ठेवला. काय झाले? असा का चिडून, रुसून बसला आहेस? पार्थ गहीवरला. परीताई, माझ्या घरातील लोक दुष्ट आहेत. मला पावभाजी, आइस्क्रीम इतके आवडते पण देत नाहीत गं ! गोड हसून नीलपरी म्हणाली, पण मी देते ना तुला ! येतोस माझ्या राज्यात? पार्थ म्हणाला, तू नेशील? चल आपण दोघं जाऊ. भरपूर पावभाजी, आइस्क्रीम खाऊ.

तेवढ्यात फुलांनी सजलेली दोन हरणांची नक्षीदार गाडी आली. निळ्या ढगांतून, सुगंधी वाऱ्याच्या लाटांबरोबर गाडी मजेत निघाली. मस्त वाटत होते. नीलपरी म्हणाली, पण तुला बरे नसताना असे खाणे तुला बरोबर वाटते का? त्रास नाही का होणार? पार्थ म्हणाला, मला या पदार्थांनी काही त्रास होत नाही. कितीही दिले तरी आवडते. ती म्हणाली, असे वेडे हट्ट करणारा एक मनुष्य होता. त्याची फजिती तुला माहीत नाही का? ऐक.

Also Read : Story of Testimony of The Vulture in Marathi

त्या मनुष्याला सोन्याचे खूप वेड होते. त्याने देवाकडे वर मागितला, की मी हात लावीन ती गोष्ट सोने होऊ दे. देवाने तथास्तु म्हटले. आता हात लावले की सोने होतेय हे पाहून तो आनंदाने जोरात याहू म्हणून ओरडला. त्याचा छोटा मुलगा तिथे झोपला होता. आवाजाने घाबरून तो रडू लागला. आवाज ऐकून मनुष्याने आपला वर विसरून मुलाला उचलून घेतले, तर क्षणात मुलगा सोन्याचा झाला. पार्थचे गोष्टीत लक्षच नव्हते. कारण पावभाजी, आइस्क्रीम दुसरे काही सुचून देत नव्हते.

लवकरच छान तारका चमचमणारा सुंदर राजवाडा दिसला. परीताईने हळूच पार्थला उतरवले. तो बघतच राहिला. ती म्हणाली, हे आमचे परीराज्य, लांब सिंहासन दिसतेय ना, तिथे आमची राणी बसते. तिला लहान मुले खूप आवडतात. ती प्रेमळ आहे. आपण तिला आपली इच्छा सांगायची. राणी ती लगेच पूर्ण करते.

आजूबाजूला छोटी मुले खेळत होती. आनंद पसरला होता. ते दोघे हळूहळू राणीसमोर गेले. आधी एक मुलगा राणीला प्रणाम करत होता. तिने विचारले, ‘बाळ, काय हवे तुला?’ तो म्हणाला, ‘शाळा, अभ्यास नको. फक्त खेळ, सुट्टी. ती म्हणाली, पण मग जगात जगायला कसे शिकणार तुम्ही? ज्ञानाशिवाय सर्व शून्य आहे. मग तो मुलगा म्हणाला, निदान वर्षातून सहा महिने तरी द्या. तिने त्याला तथास्तु म्हटले व काही गोष्टी हळूहळू सांगितल्या.

आता पार्थचा नंबर होता. प्रणाम करून त्याने सांगितले, मला पावभाजी, आइस्क्रीम सारखे खायला आवडते. ते पाहिजे तेव्हा मिळू दे. तिने विचारलं, इतर काही? तो म्हणाला, बाकी काही नको. मग ती सांगू लागली, मी निळी अंगठी देते, ती घातली की हवे ते मिळेल. पुढे ती जे सांगत होती ते न ऐकताच पार्थने अंगठी ओढून घेतली. ते पुढचे ऐकणे महत्त्वाचे होते. दुसरी लाल अंगठी घातली की मागितलेले बंद होणार होते; पण नीलपरीने हळूच ती लाल अंगठी आपल्याजवळ लपवून ठेवली. प्रणाम करून दोघे घरी आले.

पार्थचा उतावीळपणा नीलपरीला आवडला नव्हता. तिने सूचना दिली, तुला काही मला सांगायचे असेल तर छोटा शंख घे. त्यातून बोल. आणि ती निघून गेली. पार्थ मजेत झोपला.

सकाळ झाली. तोंड धुताना पार्थला कालची गंमत आठवली. आईला तो म्हणाला, ‘मला आज दूध नको.’ खोलीत गेला, दार लावले. निळी अंगठी घातली. आइस्क्रीम मागितले. समोर बाऊल भरुन रंगतदार आइस्क्रीम. खूश झाला. शाळेत जाताना डबा नको, कँटीनमध्ये खाईन, असे सांगितले. सुट्टीत ग्राऊण्डच्या कोपऱ्यात गेला. पावभाजी मागितली, भरपूर खाल्ली. शाळेतून आल्यावर पुन्हा दुधाऐवजी आइस्क्रीम कोन. स्वारी खूश होती. स्वतःच्याच नादात होती.

दुसऱ्या दिवशी रश्मी म्हणाली, ‘मला कामासाठी बाहेरगावी जायचेय. सखुबाई जेवण करेल.’ आता तर रागवायला कोणी नव्हते. तो समोरच्या कुत्र्यांना जेवण देई. आपण पावभाजी, आइस्क्रीमवर ताव मारे. बाबांना काही लक्षात आले नाही. आज पाचवा दिवस. पार्थचा घसा सकाळपासून सुजला होता. आता काय आइस्क्रीम खाणे अशक्य होते. रश्मी गावाहून आली होती. तिने गरम दूध हळद-साखर घालून दिले. पण पार्थचा हात लागताच ते नाहीसे झाले. तो काही बोलत नव्हता पण आता पोटातून हळूहळू कळा येऊ लागल्या होत्या. चार दिवस हवी तशी पावभाजी खाल्याने पोट पूर्ण बिघडले होते. रश्मीने समोर वरण-भात ठेवला पण पार्थचा हात लागताच तो नाहीसा झाला. भूक तर लागली होती, आता रडू येऊ लागले. डोक्यात, मनात प्रकाश पडू लागला. आपल्याकडून फार मोठी चूक झाली आणि त्याबद्दल ही शिक्षा आहे ही जाणीव झाली आणि त्याने शंखातून परीताईची क्षमा मागितली. सर्व सांगितले. ती म्हणाली, ‘मी येते. रडू, घाबरू नकोस. माझ्याजवळ उपाय आहे राणीने सांगितलेला; पण तू मात्र तुझ्या हावरटपणापायी ऐकले नाहीस त्या वेळी अजिबात.’

पुन्हा हरणाच्या गाडीतून नीलपरी आली. हसत म्हणाली, ‘खा ना अजून पावभाजी, आइस्क्रीम.’ पार्थ हात जोडून म्हणाला, ‘खूप चुकलो. अशी चूक पुन्हा कधी करणार नाही. यातून सोडव.’ मग तिने लाल अंगठी घालून ही मागणी बंद करायला सांगितले. आता तो वरण-भात खाऊ शकणार होता.

बाय करून नीलपरी गेली. पार्थने निश्चय केला. आई-बाबा सांगतील तेच खायचे आणि त्या वेळी आईने त्याच्या कपाळावर हात ठेवल्याचे जाणवले. ती बाबांना सांगत होती, ‘अहो बघा, पार्थचा ताप उतरला. खूप घाम आला आहे.’

बाबा म्हणाले, ‘बरे झाले. आज त्याला पावभाजी व थोडसे आइस्क्रीम दे बरं का! काल बिचारा नाराज हिरमुसलेला झाला होता. पार्थने गादीतच उसळी मारली. तो ओरडला, ‘नको नको. हात जोडतो. त्या दोघांचे नावही काढू नका. मी वरण-भातच खाणार आहे. सगळे एकमेकांकडे बघू लागले. हा पावभाजी, आइस्क्रीमचा हट्ट करणारा कालचा मुलगा असे का म्हणतोय, हे मात्र कोणालाच कळेना.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.