Story of There was a king and… in Marathi

Story of There was a king and… in Marathi : एक होता राजा आणि…. गोष्ट.

1 min read

Story of There was a king and… in Marathi : एक होता राजा आणि…. गोष्ट.

साधारण एकशेसत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यावेळी ब्रिटिश अधिकारी जसे राज्यकारभार चालवण्यासाठी आपल्या देशात यायचे, तसेच आपल्याकडच्या प्राणी-पक्षी- वृक्ष-वनस्पती-भाषा-कला यांचा अभ्यास करण्यासाठीही यायचे. आपल्याकडे पूर्वीपासून वनस्पतींच्या अभ्यासाची परंपरा होती. पण ब्रिटिश आल्यानंतर जगात मान्य असलेल्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास सुरू झाला. नोंदी सुरू झाल्या.

या नोंदणीमुळे ब्रिटिशांना भारतीय वनस्पतींची माहिती मिळाली आणि अशा प्रकारच्या अभ्यासकांसाठी भारतीय वनस्पतींचं ज्ञान खुलं झालं. या दस्तऐवजाच्या कामासाठी ब्रिटिश शास्त्रज्ञ सर जे. डी. हूकर यांनी हिमालय पर्वतात पुष्कळ भ्रमंती केली. तिथली थंड हवा त्यांना त्यांच्या देशाची आठवण करून देणारी होती. तिथले बुरास किंवा होडोडेंड्रोन बघून ते त्या परिसराच्या प्रेमात पडले. तिथल्या वनस्पतींची माहिती गोळा करत असताना एक वेगळीच घटना घडली. ईशान्येकडच्या सिक्कीम या राज्याच्या राजाने त्यांना काही काळासाठी अटक केली. या घटनेच्या फारशा नोंदी इतिहासात नाहीत. आता तुम्ही जी गोष्ट वाचणार आहात ती जशीच्या तशी घडली असेल असं नाही. पण या अटकेच्या घटनेनंतर सिक्कीमच्या राजाच्या हातून त्याच्या राज्याचा काही भाग निसटला. तो ब्रिटिशांच्या ताब्यात आला.

काय संबंध होता या दोन घटनांचा ? इतिहासातल्या एका खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारित काल्पनिक गोष्ट.

‘नमस्ते’

सिक्कीमचे राजे नामग्याल अतिथिनिवासाच्या व्हरांड्यात उभे होते. त्यांच्याबरोबर आलेले लेपचा जमातीतले भालदार बाहेर उभे होते. सकाळची वेळ होती. स्वच्छ कोवळं ऊन पसरलं होतं. समोर टी- पॉयवर बह्यांची चळत दिसत होती. शेजारी वेगवेगळी पानं कागदावर चिकटवलेली होती. जे. डी. हूकर म्हणून कोणी वनस्पती अभ्यासक त्या वह्यांमधे गर्क होऊन गेले होते. शेजारी एक लेपचा साथीदार नाम्चू त्यांना एकेका पानाकडे बघून त्याची माहिती सांगत होता. त्याचं स्थानिक नाव, उपयोग आणि असं काय काय तो जमेल तशा इंग्रजीत समजावून सांगत होता.

‘काय या माणसाला पानाफुलांचं वेड आहे!’ -राजाजींच्या मनात आलं. इतक्या लांब येऊन यांना इथे काय पाहायचंय, तर इथले सानो चिमलचे वृक्ष, बांबू आणि तेरडे. यासाठी का कुणी एवढी जोखीम पत्करतं? या झाडांसाठीच हा माणूस इथे आलाय की त्यामागे त्याचा वेगळा काही हेतू आहे? आज या शंकेचा निचरा करायलाच ते जातीने इथवर आले होते. राजे साक्षात आलेले बघून नाम्चू तटकन उठला. राजाजींनी त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. नाम्बू थिजलाच. त्याने घाईघाईने गोऱ्या पाहुण्याला अतिथी कोण आहेत त्याची माहिती दिली. प्रत्यक्ष महाराज भेटीला आले आहेत, हे कळल्यावर हूकर उठून उभे राहिले.

“गुड मॉर्निंग. हा आमचा सन्मान आहे, आपण आलात. किती दिवस पाहुणचार घेतोय मी तुमचा. इथून निघण्यापूर्वी एकदा भेट व्हावी असं मलाही वाटत होतं.” भाषांतर करून सांगताना नाम्चूचा जीव आनंदाने आणि उत्साहाने भरून गेला होता. दोन एवढी मोठी माणसं भेटत होती आणि तो त्या क्षणाचा साक्षीदार होता.. फक्त तो !

“इथून निघण्यापूर्वी?” राजाजींनी बसून घेण्याचा इशारा केला तसे हकरसाहेब खाली बसले. नाम्चू मात्र अवघडून उभाच होता. “.. मी अजून तुम्हाला निघण्याची अनुमती नाही दिली.”

भाषांतर करताना नाम्चू अवघडून गेला. कसंबसं त्याने आपलं काम केलं.

“अनुमती? हाहाहा! राजाजी, आमचे अधिकारी आणि तुमच्यात काय चालू आहे यात मला फार रस नाही, पण मी एवढं जाणतो की शांततापूर्ण मार्गाने घडामोडी व्हाव्यात यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न चालू आहेत. त्याला खीळ नाही घातली तर गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील.” हूकरसाहेब म्हणाले.

“अगदी शांततापूर्ण मार्गान आमच्या हातून आमची भूमी निसटते आहे.” राजाजींनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.

“तुम्हाला त्याचा मोबदलाही मिळतो आहे.”

“माझ्यासाठीही हे कोडं आहे, मान्यवर. तुम्ही आमचे पर्वत मागता काय आणि त्या बदल्यात आम्हाला वार्षिक मोबदला देता काय, आम्हाला हे सगळं नवीन आहे. तुम्ही म्हटलं तर त्यांच्यापैकी, आणि तरीही तुम्ही कुणी शासकीय अधिकारी नाही. तुमच्या हातातली ही भिंगं, हत्यारं आणि अजून किती तरी न ओळखू येणारी उपकरणं बघून कुतूहल वाटतं. तुमच्याबद्दल उत्सुकता वाटते. कदाचित तुमच्याकडून तुमच्या लोकांविषयी अजून काही समजेल.” समोर पडलेलं एक भिंग उचलून त्याच्याशी खेळत राजाजी हूकर महोदयांना बोलतं करत होते.

Also Read : Story of Draw a Picture of a Peacock in Marathi

“हं. मी स्वतःविषयी बोलू शकतो. मला भारतात येण्याच्या माझ्या निर्णयाने अनेकदा आनंद झालेला आहे. अंटार्क्टिकाहून मी परत आलो तेव्हाच पुढच्या मोहिमेचे विचार डोक्यात रुंजी घालू लागले होते. मला शक्य होईल तेवढं जग बघायचंय. निसर्गाची किती तरी रहस्यं जाणून घ्यायची आहेत. एवढा फिरलो, समुद्र ओलांडले, हत्ती-घोडे वाटेल त्या प्राण्यांच्या पाठीवरून हिंडलो पण निसर्ग अजून मला तृप्त करत नाही. मी रोज उठतो तोच मुळी नवं काही बघण्याच्या ईष्र्येने, पाहिलेलं साठवण्याच्या, साठवलेलं अभ्यासण्याच्या इच्छेने. मला भारतात हे सुख भरपूर मिळालं.”

“ही पानं, फुलं, या वह्या… तुम्हाला इथे येऊन आमची झाडंझुडपं बघायची होती, सर हूकर?”

“इथे यायचं की अँडीजमधे, असे पर्याय होते माझ्यासमोर. मी हिमालयात आलो याचा मला अतिशय आनंद आहे.”

“महोदय, आम्ही जग तुमच्याएवढं पाहिलेल नाही. आम्हाला आमची भूमी मात्र इंच इंच ठाऊके आहे. इथला हर एक ओढा, झरा, तळं आमरस वारसा आहे.”

“आणि त्याविषयी तुम्हाला अभिमान असायरन हवा. दार्जिलिंगसारखी जागा कलकत्त्याच्या जवळ आहे याने आमच्या लोकांना किती बरं वाटत असेल तुम्हाला कल्पना नाही करता येणार, राजाजी. तिथल्या दमट हवेने आणि उकाड्याने हैराण होऊन घरची आठवण आम्हाला असह्य करते तेव्हा दार्जिलिंग आम्हाला स्वर्ग भासतो. ‘तिस्ता’ आणि ‘रंगीत’ बघून माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. माझ्या देशात एवढ्या मोठ्या नद्या नाहीत.”

“दुसरीकडचे नद्या आणि पर्वत बघून तुम्हाला सुख वाटत असेलही, पण मला अजून हे पुरतं समजत नाही. तुम्ही आमची जिवंत पानं फुलं या कागदांवर चिकटवून घेऊन जात आहात. तुम्ही त्यांचं काय करणार आहात?””

“मला सांगायला अभिमान वाटतो की मी जर्नल्स लिहितो आहे. हिमालयातल्या हरेक झाडाझुडपाची नोंद असलेला दस्तावेज. माझं काम संपतच आलंय..”

“आणि असा दस्तावेज झाला की आमचं वन समजेल तुम्हाला? इथे देवदारातून वाहणारा वारा किती सुगंधित होऊन वाहतो हे कळेल त्या जर्नलमध्ये? सानोचिमलची फुलं पडून रंगीत आणि सुगंधित झालेली माती आमच्या भात खाचरांत उभ्या असलेल्या भातात कसा सुगंध भरते सांगता येईल तुमच्या फ्लोराला? इथले जीवघेणे पर्वत उतार सांभाळणारी आमची जंगलं मावतील तुमच्या वह्यांत ?”

“ही फक्त नोंद आहे प्रजातींची.”

“फक्त नोंद. थोडी नोंद आमचीही घ्या, महोदय. आपण हे जाणता, की ब्रिटिशांनी ज्या तन्हेने आमच्या भूमीत पाय रोवला आहे ते आम्हाला रुचत नाही.”

नाम्बूची नजर हे भाषांतर करताना खाली झुकली. पण राजाजी म्हणत होते त्यात काय चुकीचं होतं? अनेकदा त्याच्याही मनात हा विचार नव्हता का आलेला ? त्याला झाडापानांतलं कळतं आणि पर्वतातली हरेक वाट त्याच्या ओळखीची आहे म्हणून त्याला दार्जीलिंगमधे बरोबर घेण्यात आलं होतं. त्यालाही आधी पुरेशी कल्पना नव्हती की आपण कुणाबरोबर आणि कशासाठी चाललोय. दार्जिलिंगमधे तो नशीब काढायलाच आला होता. ब्रिटिश लोक तिथे राहायला आल्यापासून तिथे बरकत होती. आपलं गावाकडचं खाचर आणि किडूकमिडूक उत्पन्न यापेक्षा इथे काही वेगळं मिळेल अशा आशेने तो तिथे आला होता. आपण पुन्हा डोंगरात फिरू आणि त्याचे आपल्याला पैसे मिळतील याचा त्याने विचारच नव्हता केला. त्या आनंदात जणू काही त्याच्या पाठीवरचं ओझं अजून हलकं झालं होतं. तो हलकी पावलं टाकत डोंगर बघता बघता चढत असे. त्याचा दमसास बघून साहेबाने त्याची स्तुती केली होती. त्याला हळूहळू इंग्रजीदेखील चांगलं समजू लागलं होतं, थोडं थोडं बोलतादेखील येऊ लागले होते. लवकरच तो साहेबाचा उजवा हात बनला.

सगळं चांगलं चालू असतानाही त्याला प्रश्न पडत नव्हते असं नाही. हरेक झाड थांबून बघणारा हा गोरा साहेब आपल्याला समजतच नाही असं त्याला अनेकदा वाटून गेलं होतं. इतकंच याचं काम ? आणि त्यासाठी त्याला एवढा सरंजाम? पण असला विचार आपण कशाला करा? आपण तो करणं योग्यही नाही. काय कळतं आपल्याला ? सोनं झालं आपलं साहेबासोबत राहून, एवढंच त्याला वाटे. स्वतःचं नशीब थेंबभर उजळल्याने कुणाचं नुकसान होणार होते ? पण आत्ता राजाजींचा प्रश्न ऐकून तो गोरामोरा झाला. आपण या साहेबाच्या बाजूने नाही, फक्त त्याला त्याच्या अभ्यासात मदत करतो आहोत हे राजेसाहेबांना कळेल ना?

“वेल, त्याविषयी काही बोलणारा मी कोण? मी एक साधा वनस्पती अभ्यासक आहे.”

“साधे वनस्पती अभ्यासक ! ते एवढे सात समुद्र ओलांडून, एवढा ताफा घेऊन सगळीकडे फिरू शकत नाहीत, महोदय. तुम्हाला तुमच्या देशाचं, तुमच्या राणीचं, तुमच्या सैन्याचं पाठबळ आहे हे विसरता आहात.”

“राजाजी, बरोबर बोललात. एखाद्या झाडाचं बीत लांबवर रुजायला ते कोणी तरी वाहून न्यावं लागतं, उंच उचलून घेणारा वारा लागतो, पाण्याचे शक्तिशाली प्रवाह लागतात. पण म्हणून ते बीज म्हणजे वारा किंवा पाणी नव्हे हे तुम्ही जाणता.”

“आणि तरीही तुम्हाला खात्री आहे, की तुमचा संरक्षक वारा येईल आणि तुम्हाला उचलून पुन्हा एखाद्या वाटेवर अलगद नेऊन सोडेल. ही खात्री कुठून येते, अभ्यासक महोदय?” राजाजींचा स्वर धारदार होता.

“हं, तुम्ही म्हणता ते मला कळतं. आमचा देश इथून खूप दूर आहे. तुमच्या देशापेक्षा खूप लहान आहे.”

“आमचा देश ? माफ करा सर, पण मला हे पर्वत आणि खालून वाहणारी नदी हा एवढाच प्रदेश समजतो. आमच्याही वर तिबेटची पवित्र भूमी आहे. आमचा धर्म तिथून येतो. आमची बांधिलकी इथे आहे. तुम्ही आमच्या परवानगीशिवाय आमच्या देवभूमीच्या सीमेला स्पर्श करून आलात. तिथेच तुम्ही धक्का लावलात तर..”

“आम्ही परवानगी विचारली होती.”

आम्ही ती नाकारली होती..’

” काही काळ अवघड शांततेत गेला. नाम्चूला तो काळ युगाप्रमाणे वाटला.

“एवढंसं राज्य आहे हे. हा हिंदुस्थान एवढा मोठा भूभाग आहे. इथे एवढी छोटी छोटी राज्यं आहेत
आणि एकमेकांना त्यांची फारशी माहिती नाही.”

हुकरसाहेब झाडांचे अभ्यासक खरेच; पण ते जे विचार बोलतात त्यात इंग्रज राजवट डोकावते, इंग्रज अधिकारी डोकावतात. राजाजी थोडे हसले.

“ते दूर पर्वताचे उतार दिसतात?” राजाजींनी बोट दाखवून विचारलं

हूकर बघू लागले. “

तिथलं जंगल दिसतं ?”

“जंगल तिथेही आहे आणि इथेही. आम्हाला सूर्यप्रकाश, पाणी, अन्न मुबलक आहे तोवर आम्ही आमच्यात सुखी आहोत, महोदय. याहून जास्त आम्ही कधी जाणलं नाही.”

“असेलही तुम्ही म्हणता तसं; पण तुम्हाला इथे टिकून राहण्यासाठी आमची मदत लागलेली आहे हे विसरू नका.” हूकरसाहेब म्हणाले.

“आमच्या आपापसातल्या लढायांचं भांडवल तुम्ही नाहीच केलंत तर बरं. परतफेड म्हणून राहा ना आमचे अतिथी होऊन अजून काही दिवस.” राजाजींनी हूकरसाहेबांकडे रोखून बघत विचारलं.

“चार आठवडे होऊन गेलेत. माझा महत्त्वाचा पत्रव्यवहार खोळंबलाय. या सगळ्या नोंदी इंग्लंडला पाठवायच्या आहेत. डार्विन, माझा मित्र किती आतुरतेने वाट बघत असेल माझ्या पत्राची !”

“वा! अगदी हेच ऐकायला आलो होतो मी. तुमच्या अगत्यात कोणतीही कसूर राहणार नाही. पण खोळंबा जरूर होऊ दे. कुणाचं तरी इकडे लक्ष वळू दे.”

राजाजी, ही कसली भलती इच्छा ? … नाम्चूच्या मनात आलं. राजेसाहेब सोडून का नाही देत साहेबांना? अशाने इंग्रज फौजांपर्यंत गोष्टी जायच्या. नको ते का ओढवून घेताहेत राजाजी ?

हुकरसाहेब हे ऐकून शांत होते. राजाजी पुढे आवेशाने म्हणाले, “जाऊ दे ही खबर दार्जिलिंगपर्यंत, त्याच्यापल्याड कलकत्त्यापर्यंत आणि त्याच्याही पलीकडे तुमच्या देशापर्यंत. आमचं दार्जिलिंग आत तुमच्या टाचेखाली आहे. तिथे हात-पाय पसरण्यापूर्व आम्हाला माहिती द्यावी असंही वाटलं नाही तुम्हाला. एवढी कळ तुम्हीही सोसा.”

नाम्चू हे ऐकून स्तब्ध झाला. आपलं आणि त्यांच यातली हद्द त्याला आत्ताच कुणी समजावून सांगितली होती. आपलं खाचर, आपलं गाव, आपलं सिक्कीम, आपला देश… आणि सातासमुद्रापार त्यांचा देश…? आणि तिथून ते सूत्रं हलवताहेत आपल्या देशातली, गावातली, उद्या आपल्या खाचरांतलीसुद्धा ! आजवर न जाणवलेलं काहीतरी नाम्चूला लख्खपणे कळलं. ते त्याला झेपेना. तो मागच्या खांबाला टेकला. त्याला भाषांतर सुचेना.

राजेसाहेब आले तसे परत गेले. हूकरसाहेबावर त्या भेटीचा फारसा परिणाम झाला नव्हता. त्यांनी केवळ एक चिठ्ठी तयार केली आणि नाम्चूला ते म्हणाले, “एवढी चिठ्ठी दार्जिलिंगला पाठवायची आहे..” नाम्चूने ती चिठ्ठी घेतली. चिठ्ठी हातात घेऊन दूरवर चमकणारं कांचनजंगा शिखर बघत तो अंगणात बराच वेळ नुसताच उभा होता. यानंतर ती चिठ्ठी आणि नाम्चू साहेबाला पुन्हा कधी दिसले नाहीत. हूकरसाहेब काय उमगायचं ते उमगले.

यथावकाश गोष्टी घडायच्या त्या घडल्या. ब्रिटिश सैन्याची तुकडी येऊन हूकर आणि त्याच्या साथीदारांना घेऊन निघून गेली. या वेळी कोणताही रक्तपात झाला नाही. यानंतर दार्जिलिंग मात्र सिक्कीमकडे राहिलं नाही, ते ब्रिटिश साम्राज्याचा भाग बनलं. सिक्कीम यापासून योग्य तो धडा घेईल असा विश्वास राज्यकर्त्यांना होता. त्यांना हे पाऊल उचलायचं होतंच. हूकर आणि त्याचा दस्तावेज त्यासाठी निमित्त ठरले.

आणि नाम्चू? त्याचं काय झालं? ते फक्त तो जाणतो आणि कांचनजंगा !

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.