Story of The Tree of Money

Story of The Tree of Money : पैशाचे झाड गोष्ट.

1 min read

Story of The Tree of Money : पैशाचे झाड गोष्ट.

सकाळपासून झिब्राने गॅलरीत भांड्याचा डाव मांडला होता. ती खेळ खेळण्यात दंग होती. थोड्या वेळाने तिने गॅलरीतील कुंड्यांकडे पाहिले. एका कुंडीतले झाड सुकले होते. तिने लगेच त्या झाडाला पाणी घातले. मात्र झिब्राने या झाडाला पाणी घालूनही हे झाड दिवसेंदिवस सुकतच होते. आठवडाभरानी हे झाड वाळले. झिब्राच्या मम्मीने वाळलेले झाड काढून टाकले. त्यामुळे गॅलरीतली एक कुंडी रिकामी झाली. झाड वाळल्याने त्या कुंडीत मातीच शिल्लक होती. झिब्रा कुंडीतल्या मातीशी कायम खेळत होती. झिब्रा मातीशी काय करत असावी हे मला पहायचे होते. म्हणून मी गॅलरीकडे गेलो. मात्र माझी चाहूल लागताच झिब्रा कुंडीपासून बाजूला झाली. दुसऱ्या दिवशी पुन्हा झिब्रा मातीशी काही तरी करत होती. मी पायाचा आवाज न करता गॅलरीत डोकावून पाहिले. झिब्रा कुंडीतली माती खालीवर करत होती. काहीतरी त्यात शोधत होती. थोड्या वेळाने तिने मातीतून एक रूपयाचे नाणे काढले. त्या नाण्याला ती निरखून पहात होती. चेहऱ्यावर काहीशी निराशा आणून तिने पुन्हा ते नाणे मातीत ठेवले. मी पायाचा आवाज न करता सोफ्यावर जाऊन बसलो. झिब्रा मातीने भरलेले हात पाठीमागे करून बेसिनमध्ये हात धुवायला गेली. हात पुसून ती सोफ्यावर येऊन बसली आणि म्हणाली, ‘आता मी तुमच्याकडे खाऊला पैसे मागणार नाही?’

मी म्हणालो, ‘का पैसे मागणार नाही बाळा?’

तशी झिब्रा म्हणाली, ‘पपुली काही वेळा खाऊसाठी तुमच्याकडे पैसे नसतात ना. म्हणून मी आयडिया केली आहे.’

‘कसली आयडिया बाळा’

‘पपुली ते माझे सिक्रेट आहे. तुम्हाला नाही सांगणार’

‘सांग ना बाळा, नाही तर मी तुझ्याशी कट्टी धरेन’

तशी झिब्रा म्हणाली, ‘नाही नाही पपुली कट्टी धरायची नाही. मी ना आपल्या गॅलरीतल्या कुंडीत पैशाचे झाड लावले आहे. लवकरच त्या झाडाला पैसे लागतील. त्या पैशातून मी माझा खाऊ घेणार आहे.’

‘अंग बाळा, पण तूच तर म्हणते ना झाडांची पाने-फुले तोडायची नाही म्हणून, मग तू त्या झाडाचे पैसे कसे तोडणार?’

‘पपुली त्या झाडाला मी रोज पाणी घालणार आहे. त्याच्याशी मी रोज बोलणार आहे. मग आमची मैत्री होईल. मी त्या झाडाला विचारेन, आणि रोज खाऊला पैसे घेईन.’

‘पण बाळा पैशांचे झाड असते असे तुला कोणी सांगितले.’

‘पपुली तुमीच कुंडीत ‘बी’ टाकता ना. त्यास पाणी घातले की त्याचे झाड होते. म्हणून मी कुंडीत पैसे ठेवले आहेत. त्याचे आता झाड होईल.’

‘अंग पण पैसे कोठून आणले ?’

‘तुम्ही खाऊसाठी मला दोन पैसे दिले होते ना. त्यातील एका पैशाचा मी खाऊ खाल्ला. एक पैसा तसाच ठेवला होता. तोच पैसा मी आता कुंडीत लावला आहे.’

‘बाळा, पण पैशाचे झाड नसते.’

‘म्हणजे पपुली पैशाचे झाड येत नाही?’

‘नाही बाळा, पैशाचे झाड नसते.’

झिब्रा तशी नाराज झाली. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट जाणवत होती. नव्र्व्हस झालेल्या आवाजात ती म्हणाली, ‘तरीच म्हटलं पैसे मातीत ठेवले. रोज पाणी घातले, तरी झाड कसे येत नाही?’

झिब्राला मी जवळ घेतले. तिची नाराजी दूर करण्यासाठी तिला गुदगुल्या केल्या. ती ‘नको नको’ म्हणत जोरजोरात हसत होती. थोड्या वेळाने झिब्राला सांगितले, ‘बाळा ‘बी’ संजीव असते. पैसे हे निर्जीव असतात. त्यामुळे एखादे ‘बी’ मातीत रोवले, त्यास पाणी घातले की त्यास अंकुर फुटते. मग त्यांचे रोपटे होते. पैसे निर्जीव असतात. म्हणून त्याला मातीत पुरले किंवा पाणी घातले तरी त्यास कोंब फुटत नाही. त्याचे रोपटे होत नाही.’

Also Read : Story of Messenger of Light in Marathi.

‘पपुली खरंच पैशाचे झाड नसते?’

‘हो बाळा, खरेच पैशाचे झाड नसते.’

‘मग दुसऱ्या देशात किंवा दूरच्या जंगलातही नसते ?’

‘हो बाळा कुठे कुठेच पैशाचे झाड नसते.’

‘मग पपुली हे पैसे कोठून येतात?’

‘बाळा पैसे हे मशिनमध्ये छापले जातात. पैसे छापण्याचा कारखाना असतो.’

‘मग पपुली आपणही पैशाचा कारखाना सुरू करायचा. मग काय पैसेच पैसे? आणि खाऊच खाऊ.’

‘नाही बाळा, पैशाचा कारखाना कोणालाही टाकता येत नाही. तो फक्त सरकारचा असतो.’

‘पपुली आपल्याला का टाकता येत नाही.’

‘बाळा, मग कोणीही पैशाचा कारखाना टाकेल. तसे झाले की मग पैशाची किंमत रहात नाही.’

‘मग पपुली तुमच्याकडे पैसे कोठून येतात?’

‘बाळा, मी रोज ऑफिसला जाते ना. तेथे काम करत असतो. मग मी जे काम करतो ना त्याचे मला पैसे मिळत असतात.’

‘ अच्छा, म्हणजे पैसे मिळविण्यासाठी काम करावे लागते तर!’

‘हो बाळा पैसे मिळविण्यासाठी काम, नोकरी करावी लागते.’

‘आणि कामच केले नाही तर ?’

‘मग पैसेच मिळणार नाहीत. आणि पैसे मिळाले नाही की, मग खाऊ कशाने खायचा?’

‘आता मला कळाले पपुली. पैशाचे झाड येत नाही. पैसे कारखान्यात छापतात. आपण काम केले तरच आपल्याला पैसे मिळतात.’

असे म्हणत झिब्रा सोफ्यावरून उठली. गॅलरीत जाऊन तिने कुंडीतली माती खाली-वर करायला सुरुवात केली. मातीत चाचपून तिने एक रूपयाचे नाणे बाहेर काढले. नाणे धुतले आणि तेच नाणे मला दाखवत झिब्रा म्हणाली, ‘पपुली हे पैसे कुंडीत ठेवून उपयोग नाही. मी या पैशाचा खाऊ खाणार!’

झिब्रा मला बोलतच खेळण्यासाठी घराबाहेर पडली. मी मात्र सोफ्यावरच बसून ‘पैशांचे झाड’ या झिब्राच्या कल्पनेचा विचार करत होतो.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.