Story of Testimony of The Vulture in Marathi

Story of Testimony of The Vulture in Marathi : गिधाडाची साक्ष गोष्ट.

1 min read

Story of Testimony of The Vulture in Marathi : गिधाडाची साक्ष गोष्ट.

फार वर्षांपूर्वी उत्तमापूर राज्यात शूरसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्याला संग्रामसेन नावाचा एक मुलगा होता. संग्रामसेन स्वभावाने फार भोळा होता. त्याला व्यावहारिक ज्ञान नव्हते. त्यामुळे शूरसेनने त्याच्या शिक्षणाची वेगळी सोय केली होती. संग्रामसेनने व्यवहारकुशल होऊन राज्यकारभारात लक्ष घालावे, म्हणून राजाने हरप्रकारे प्रयत्न केले; पण संग्रामसेनच्या स्वभावात काही फरक पडला नाही. अखेर शूरसेनने राजकुमार संग्रामसेनला बोलावले आणि त्याला म्हटले, ‘राजकुमार, आजपासून तुम्ही वेशांतर करून देश भ्रमण करायला बाहेर पडा. बाहेरचे जग पाहून तुम्हाला नवे नवे ज्ञान मिळेल. जगाची कल्पना येईल.’

वडिलांची आज्ञा शिरसावंद्य मानून राजकुमाराने वेषांतर केले आणि तो घोड्यावर बसून एकटाच देशभ्रमण करायला बाहेर पडला. एका जंगलातून जात असताना वाटेत संग्रामसेनला एक गिधाड दिसले. ते गिधाड त्याच्या वाटेत निवांत झोपले होते. त्याला असे वाट अडवून झोपलेले पाहून संग्रामसेन मोठ्या आवाजात म्हणाला, ‘गिधाडभाऊ, मला • जरा वाट देता का? तुम्ही जर बाजूला झालात, तर मला पुढे जाता येईल.’

‘अरे बाबा, का माझी झोपमोड करतोस? मला दूर व्हायला सांगण्याऐवजी तूच बाजूने निघून जा.’ गिधाडाने आळस देत म्हटले. गिधाडाच्या बोलण्याचा राजकुमार संग्रामसेनला राग आला; पण राग मनातल्या मनात गिळून तो दुसऱ्या बाजूने वाट काढत निघून गेला. जाता जाता राजकुमार गिधाडाकडे बघत मोठ्याने म्हणाला, ‘आता मी जातोय खरा; पण माघारी येताना तुझ्याकडे बघतो मी.’

यावर गिधाड हसत हसत त्याला म्हणाले, ‘कोण कोणाकडे बघणार, हे येणारा काळच ठरवेल.’

मग गिधाडाला काहीही न बोलता राजकुमार रागारागाने तेथून निघून गेला.

संध्याकाळ होता होता राजकुमार एका शहरात येऊन पोहोचला. मुक्कामासाठी तो एका जमीनदाराच्या घरासमोर येऊन थांबला. त्याने आपला घोडा अंगणातील एका आंब्याच्या झाडाखाली बांधला आणि जमीनदाराच्या घराचा दरवाजा ठोठावला. दाराचा आवाज ऐकून जमीनदार घरातून बाहेर आला. तसे राजकुमार संग्रामसेनने त्याला विचारले, ‘आजची रात्र मी तुमच्या इथे मुक्कामाला थांबलो तर चालेल का?’

राजकुमाराने वेषांतर केल्याने जमीनदाराने त्याला ओळखले नव्हते. तरी मोठ्या आनंदाने त्याने राजकुमाराला मुक्कामाला जागा दिली. त्याने राजकुमाराचे चांगले आदरातिथ्य केले. छान जेवण दिले. झोपायला मऊ बिछाना दिला. राजकुमार त्या मऊ उबदार बिछान्यावर गाढ झोपी गेला.

Also Read : Story of Crown of Dew in Marathi

सकाळ होताच जमीनदाराने राजकुमार संग्रामसेनला झोपेतून उठवले आणि आंब्याखाली बांधलेल्या घोड्याकडे बोट दाखवत म्हटले, ‘बघ ना, माझ्या आंब्याच्या झाडाने एका सुंदर घोड्याला जन्म दिलाय.’ जमीनदाराचे ते बोलणे ऐकताच राजकुमार चक्रावला आणि ताडकन उठत तो म्हणाला, ‘नाही रे दादा. तो तर माझा घोडा आहे. आणि आंब्याचे झाड कुठे घोड्याला जन्म देते का?’

‘काय म्हणतोस ? तो घोडा तुझा आहे? पण काल तुझ्याकडे घोडा आहे असे तू मला कुठे सांगितले होतेस? हे बघ, तो घोडा माझा आहे. आणि माझ्या आंब्याच्या झाडाने त्याला जन्म दिलाय.’ जमीनदार ठणकावून बोलला,

जमीनदार आणि राजकुमार यांच्यात घोड्याच्या मालकीवरून बराच वाद झाला. अखेर त्यांचे भांडण शहरातील न्यायाधीशाकडे पोहोचले. जमीनदार लबाड होता. त्याने साक्षीसाठी आपल्या विश्वासातल्या शेजाऱ्यांना न्यायाधीशासमोर उभे केले. शेजाऱ्यांनी न्यायाधीशांना नम्रपणे म्हटले, ‘न्यायाधीश महाराज, हा घोडा जमीनदाराचाच आहे. त्या घोड्याला आंब्याच्या झाडानेच जन्म दिलाय. आम्ही आमच्या डोळ्यांनी समक्ष पाहिलेय.

शेजारच्यांची साक्ष ऐकून न्यायाधीशांनी राजकुमाराला विचारले, ‘जमीनदारांच्या बाजूने साक्षीदारांनी साक्ष दिलीय. आता तुझा एखादा साक्षीदार आहे का? हा घोडा तुझ्या मालकीचा आहे हे पटवून देणारा कुणी आहे का तुझ्याकडे?’

‘न्यायाधीश महाराज, माझ्याकडे कोणताच साक्षीदार नाही.’

‘अरे मग साक्षीदाराशिवाय हा घोडा तुझ्या मालकीचा आहे, हे मी कसे मान्य करू? हा घोडा तुझा आहे याचा जर तुझ्याकडे पुरावाच नसेल, तर या घोड्याला आंब्याच्या झाडाने जन्म दिलाय, हे मला मान्य करावेच लागेल.’

‘न्यायाधीश महाराज, माझ्याकडे कुणी साक्षीदार नाही; पण रस्त्याने येताना एका गिधाडाने मला आणि माझ्या घोड्याला पाहिले होते. त्या वेळी मी घोड्यावर बसून त्याच्याशी बोललोसुद्धा होतो. घोडा माझ्या मालकीचा आहे, हे सांगणारे गिधाडाशिवाय माझ्याकडे दुसरे कुणी नाही.’

‘ठीक आहे. मग त्या गिधाडाला साक्ष द्यायला बोलाव.’ असे म्हणत न्यायाधीशाने साक्ष देण्यास गिधाडाला बोलावण्याचा आदेश संग्रामसेनला दिला. तसा राजकुमार लगोलग जंगलात गेला. त्याने गिधाडाला भेटून घडलेली सगळी हकीगत सांगितली आणि साक्ष देण्यासाठी आपल्या सोबत येण्याची गिधाडाला विनंती केली. त्यावर गिधाड राजकुमाराला म्हणाले, ‘ठीक आहे. मी साक्ष द्यायला येतो; पण आज नाही. मी उद्या येईल. आता तू जा. मी उद्या बरोबर वेळेत न्यायाधीशासमोर हजर होतो.’

दुसऱ्या दिवशी राजकुमार कोर्टात पोहोचला. बराच वेळ झाला पण गिधाड काही कोर्टात आले नाही. सगळेजण त्याची वाट पाहू लागले. संध्याकाळ होत आली तरी गिधाडाचा पत्ता नव्हता. अखेर कोर्टाची वेळ संपायला काही अवधी असताना गिधाड कोर्टात हजर झाले.

कोर्टात आलेल्या गिधाडाचा अवतार बघण्यासारखा होता. त्याच्या सर्वांगाला राख लागलेली होती. उशिरा आलेल्या गिधाडाकडे बघत न्यायाधीशांनी त्याला एक प्रश्न विचारला, ‘तुला इकडे यायला एवढा उशीर का झाला?’ त्यावर उत्तर देत गिधाड म्हणाले,

‘न्यायाधीश महाराज, मी वेळेवरच निघालो होतो. पण रस्त्यात मला एक नदी आडवी आली. आणि बघता बघता त्या नदीच्या पाण्याला आग लागली हो. आगीमुळे नदीतले मासे जळू लागले. मग आगीने होरपळणाऱ्या त्या नदीने मला विनंती करत म्हटले, गिधाडदादा, गिधाडदादा, माझ्या पाण्याला लागलेली आग विझव रे ! आता तुम्हीच सांगा, सगळ्यांच्या उपयोगी पडणाऱ्या नदीची विनंती मी कशी टाळणार? मग मी नदीच्या पाण्याला लागलेली आग विझवू लागलो. त्या प्रयत्नांत माझे सारे शरीर राखेने माखून गेले. माझ्या शरीराला लागलेली राख बघून तुमच्या ते लक्षात आले असेलच. महाराज, आग विझवायला थांबल्यामुळे मला इथे यायला उशीर झाला.’ गिधाडाने उशिरा येण्याचे कारण सविस्तर सांगितले.

त्यावर न्यायाधीश हसत हसत त्याला म्हणाले, ‘अरे, काय खोटे बोलतोस ! नदीच्या पाण्याला कधी आग लागते का?’

‘का नाही आग लागणार महाराज ? जर आंब्याचे झाड घोड्याला जन्म देत असेल, तर नदीच्या पाण्याला नक्कीच आग लागू शकते.’ गिधाडाने कावेबाजपणे उत्तर दिले.

गिधाडाचे उत्तर ऐकून न्यायाधीशाला आपली चूक समजली. त्याने राजकुमार संग्रामसेनला त्याचा घोडा परत मिळवून दिला आणि लबाड जमीनदाराला राजकुमाराची फसवणूक केली, त्याचा घोडा बळकावण्याचा प्रयत्न केला, म्हणून योग्य ती शिक्षा केली.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.