Story of Messenger of Light in Marathi

Story of Messenger of Light in Marathi : प्रकाशाचे दूत गोष्ट.

1 min read

Story of Messenger of Light in Marathi : प्रकाशाचे दूत गोष्ट.

आडरानातली वाट होती ती ! फारसे कुणी त्या वाटेने जात नसे. उंच वाढलेली राक्षसी झाडे. त्यांच्या त्या काळ्याकभिन्न सावल्या. एका बाजूने चढत गेलेला खडा डोंगर आणि पावसापाण्याने, आल्या-गेल्या वादळाने उंच गुळगुळीत झालेले त्या डोंगरातले कडे… कधी कधी हिंस्र जनावरांच्या गर्जना… कधी विषारी अजगरांची वळवळ, तर कधीतरी कुणीतरी पाहिलेले दाट झाडीतून चमकणारे काचेरी डोळे.

अशा या हिरव्या रंगाच्या पसाऱ्यात होते एक लहानसे तळे, टिकलीएवढे. पावसात भरायचे. एरवी आपले जेमतेम पाणी मुश्किलीने जपायचे. उन्हाळ्यात जर कोणी वाटसरू त्या वाटेने गेलाच आणि जाता जाता रात्र झालीच, तर त्याला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळे आणि ते म्हणजे चमचमणारे असंख्य काजवे ! इकडून तिकडे उडणारे… कधी कधी एखाद्या झाडावर त्यांची सभा भरे आणि मग बघणाऱ्याला वाटे की एक संपूर्ण दीपमाळच कोणीतरी इथे आणून उभी केली आहे. असेही वाटे की मशालीसारखे हे झाड हातात धरून चालता आले तर काय बरे होईल. या अंधारवेळ: ही काळोखी वाट या प्रकाशाने उजळून जाईल. है. रान ओलांडून जाणे सोपे होईल. मनातल्या भीतीचाही एक दिवा होऊन जाईल.

अशा एखाद्या काळोख्या रात्री जेव्हा एखाद नाइलाज झालेला वाटसरू त्या वाटेने जाऊ लागे, तेव्हा काजवे त्याच्या बाजूबाजूने उड राहायचे. प्रकाश पाठीवर घेऊन आपल्या चिमुकल्या प्रकाशाची त्याला सोबत करायचे आणि ते रान पार केले की उडत उडत मागे परतायचे. अशाच एका रात्रीची ही गोष्ट. आकाशातून रमत गमत चाललेल्या चंद्राचे लक्ष खाली गेले. लक्ष लक्ष चांदण्याच जणू चमकत होत्या. तो चपापला. घाबरून त्याने पटापट आपल्या चांदण्या मोजल्या आणि मग कुठे समाधान झाले त्याचे ! समाधान झाले; पण मन आश्चर्याने काठोकाठ भरून गेले. कोण आहेत हे चमचमणारे कण? या पृथ्वीवरच्या चांदण्या? चंद्राला आपल्या मनातले हे गुपित लपवता येईना. काय करावे बरे? खूप विचार केला आणि मग तो हळूहळू तळ्यातल्या पाण्यातच उतरला. तळ्याचे पाणी दचकले. थरथरले. एखाद्या हिऱ्याच्या पदकासारखे झगमगू लागले.

also read : Beauty of Lonar Sarovar in Marathi

चंद्र रात्रीचा राजा ! अंधार त्याला मिऊन पळायचा आणि ढग त्याला मुजरा करायला धावायचे. चांदण्या त्याच्या मागे-पुढे लगबगायच्या. पण काजवे आपले आपल्याच नादात ! लगबग करत धावताहेत आपल्या वाटेच्या आजूबाजूने ! एवढा मोठा रात्रीचा राजा समोर आहे, त्याला ना नमस्कार, ना मुजरा ! दखलसुद्धा नाही त्याच्या आगमनाची!

चंद्र भयंकर संतापला. हा अपमान त्याला सहन होईना. संतापून संतापून तो अधिकच चमकू लागला. तळ्यातले पाणी डचमळू लागले. तळ्याकाठच्या एका काजव्याला त्याने गुर्मीतच हाक मारली- ‘ए, ये इकडे.’

एक काजवा जरासा दचकूनच समोर उभा राहिला.

‘काय रे, ओळखलेस की नाही मला?’

‘आपल्याला कोण ओळखत नाही रजनीनाथ? आपण तर रात्रीचे राजे ! पण आपण इथे कसे?’

‘हा प्रश्न आत्ता विचारतोयस?’

‘काही चूक झाली असल्यास क्षमा !’

‘चूक? घोडचूक म्हण घोडचूक ! काय रे, कशाला धावताय असे इकडून तिकडे?’

‘महाराज, वाट अंधारी आहे. रात्र काळोखी ! येणारे-जाणारे घाबरतात. म्हणून त्यांना प्रकाशाची थोडीशी मदत !’ काजवा शांतपणे म्हणाला.

‘मदत ? तुम्ही करणार, आणि मी असताना?’ खो खो हसत चंद्र म्हणाला.

‘महाराज, छोटे जीव आम्ही ! तुम्ही कुठे, आम्ही कुठे ! आमच्या आमच्या परीने अंधाराशी लढतो एवढेच.’

‘क्षुद्र कीटका, या बढाया बंद कर. तुझ्या सगळ्या भाईबंदांना जाऊन सांग. म्हणावे, ‘गप्प बसा एका जागी. काही गरज नाही तुमची. कोण समजता रे स्वतःला ? कशाचा अभिमान आहे एवढा ? कोण आहात तुम्ही?’ ‘

प्रकाशाचे दूत ! परमेश्वराने कणभर प्रकाश दिलाय आम्हाला आणि सांगितलेय, उपयोग करा त्याचा. आम्हाला याची जाणीव आहे. अहंकार नाही.’ किंचित हसत काजवा पुढे झुकला आणि चमचमत म्हणाला, ‘पण हो, अभिमान मात्र आहे तो या गोष्टीचा की आमचे तेज, आमचा प्रकाश हा आमचा आहे. सूर्याकडून उधार घेतलेला नाही.’

एवढे म्हणून काजवा उडाला. झाडावरच्या असंख्य काजव्यांत जाऊन मिसळला. प्रकाशाची ती दीपमाळ लखलखू लागली आणि वाटेने जाणारा एक वाटसरू तिकडे चकित होऊन पाहतच राहिला. अगदी तळ्यातल्या चंद्रासारखाच !!

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.