Story of Mesolea in Marathi

Story of Mesolea in Marathi : मेसोलिया गोष्ट.

2 min read

Story of Mesolea : “काय… खरंच वाटत नाही ना?” चिन्मयी चित्कारली. “आपण चक्क येऊन पोचलोय या मेसोलियामध्ये. प्रत्यक्ष मेसोझोईक काळात !” आजुबाजूचा हिरवागार प्रदेश पाहताना तिच्या अंगातून एक शिरशिरी गेली.

“खरं न वाटायला काय झालं? गेले तीन महिने याच्याचसाठी तर आपलं ट्रेनिंग चाललं होतं!” पीटरने वैतागून तिच्याकडे बघितलं.

“हो सर. बरोबर आहे तुमचं. पण हे प्रत्यक्ष घडतंय तेव्हा मला खरंच वाटत नाहीये. फारच भारी आहे हे.” पीटरच्या वयाला मान देत चिन्मयीने आपला उत्साहाचा झरा आटवला. “हो ना, हारूतो?”

“हो.” नम्रपणे वाकल्यावर हारूतो आणखीच चिटुकला वाटायला लागला. ट्रेनिंगच्या वेळी कधी कधी त्याचे हावभाव बघून चिन्मयीला हसूच यायचं. प्रश्न विचारायला उभा राहिला की तो एकदम हळू बोलायचा. नीट ऐकायला आलं नाही, की सुजा मॅडम भयंकर वैतागायच्या.

“मेसोलिया हे त्या टाइम मशिनवाल्यांनी दिलेलं नाव. मेसोझोईक काळातला एक प्रदेश. त्यात काय एवढं उड्या मारण्यासारखं? लवकर सुरुवात कर चिन्मयी, एकच दिवस आहे आपल्याकडे.” पीटर दरडावून म्हणाला, तशी चिन्मयीने आपली बॅग उघडून सगळी उपकरणं बाहेर काढायला सुरुवात केली.

Story of Mesolea in Marathi

शास्त्रज्ञांनी टाइम मशिन बनवलं ते केवळ एक आव्हान म्हणून. आपण ठरवून भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाऊ शकतो का, हे पाहायचा त्यांचा उद्देश होता. एकदा त्यांची खात्री पटल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मग त्यांनी ठरवलं, की या टाइम मशिनचा उपयोग फक्त संशोधनासाठी करायचा. त्यातून भूतकाळात जाऊन शास्त्रज्ञ काही आगळी माहिती आणू शकतील अशा अभ्यासाला परवानगी द्यायची.

अर्थात अशी घोषणा झाल्यावर टाइम मशिनसाठी शास्त्रज्ञांच्या रांगाच्या रांगा लागल्या. एका ट्रीपमध्ये तिघेचजण जाऊ शकत. त्यामुळे एका काळात जाणाऱ्या तिघांची टीम जुळली, की मगच त्यांना अशी संधी मिळायची. चिन्मयीला टाइम मशिनमधून दहा-पंधरा कोटी वर्षांइतकं मागे मेसोझोईक काळात जायचं होतं. ज्या काळात अजून माणूसच काय, माणसाचा पूर्वजही जन्माला आला नव्हता, त्या काळात. म्हणजे डायनासोरच्या काळात.

अर्ज केल्यावर तिला तब्बल दोन वर्षं वाट पाहायला लागली होती. पीटर आणि हारूतोचे अर्ज जवळजवळ एकाच वेळी आले, तिच्या काळाबरोबर जुळले, तेव्हा कुठे तिचं स्वप्न प्रत्यक्षात उतरायची वेळ आली.

त्या अनोख्या प्रदेशात आणि अनोख्या काळात हवं ते शोधताना दिवस कसा निघून गेला तिघांनाही कळलं नाही. अंधार पडायला लागल्यावर परत येऊन काय सांगू नि काय नको झालं होतं चिन्मयीला.

“हेच मी इतके दिवस म्हणत होते. जीवाश्म मिळवताना एकेकदा खडकांचीच अडचण येते. काही वेळा खडकांची झीज होऊन जाते नि त्याच्यातले जीवाश्म नष्ट होऊन जातात. मग मागे मागे जाऊन बघितलं तर? जुन्या काळच्या खडकांमध्ये काही अद्भुत जीवाश्म मिळाले तर? आणि आज खरंच तसं झालं!”

also read : Story of Our time will come… in Marathi

हारूतोने उत्साहाने होकार भरला. एरवी गप्प गप्प राहणाऱ्या हारूतोच्या चेहऱ्यावर किंचित हसू बघून चिन्मयीला बरं वाटलं.

“दोन वर्ष थांबले, त्याचं आज चीज झालं! आहाहा! एकाच दिवसात इतके सारे नमुने मिळतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं !

“ती तुझी उपकरणं पॉसिबल खडक दाखवतात म्हणून झालं ते शक्य!” पीटरने कपाळाला आठ्या घालत तिची बडबड थांबवली.

“सर, मला ब्रॉन्टोसॉरसच्या विष्ठेचे नमुने मिळाले. हे महाकाय प्राणी पूर्ण शाकाहारी होते. ते नामशेष का झाले याचे पुरावे आता त्यातून खात्रीने मिळतील.” हारूतोचा चेहरा या शोधाने छान फुलून आला होता.

सर, तुम्हाला काय मिळालं ?”

“मला हव्या त्या वनस्पती मिळाल्या. पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या. आपण माणसांनी मूर्खपणाने त्या नष्ट केल्या होत्या, परत जाऊन मी त्यांची पुन्हा सुरुवात करून देणार आहे. “

“हे तर खूप छान झालं, सर!” चिन्मयी खुशीत येऊन म्हणाली.

“ठीक आहे. चला, लगेचच सिस्टीम चेक करायला घेऊ या.” पीटर जांभई देत म्हणाला.

“इथे अंधार होतोय. ते तुमचे कोणकोणते सॉरस प्राणी आले तर चट्टामट्टा करून टाकतील आपला.”

“मी कॉम्प्युटरची चेकलिस्ट बघतो.” हारूतो दुजोरा देत म्हणाला.

“हो. मी यांत्रिक तपासणी करायला घेते.” चिन्मयीचा उत्साह ओसंडून जात होता.

पीटरने आपल्याला नेमून दिलेलं काम सुरू केलं. ऑटोमॅटिक टेस्टिंग होतानाचे ‘बीप बीप’ आवाज तो लक्ष देऊन ऐकत होता.

“पीटर सर, तुमचं झालं की जरा इकडे बघाल का?” चिन्मयीने हाक दिली.

“मी काय बघणार? मला यंत्रांमधलं ओ का ठो कळत नाही, मी ट्रेनिंगच्या वेळेला सांगितलं होतं.”

“चिडू नका सर, साधंच आहे. हा इथला बोल्ट थोडा सैल झालाय. आणि माझ्या हाताने फिरत नाही.”

“ठीक आहे,” म्हणत पीटर तिच्याजवळ आला. जोर लावत त्याने बोल्ट पकडीने फिरवून घट्ट केला.

तेवढ्यात मागून येऊन हारूतोने रिपोर्ट दिला, “कॉम्प्युटरची चेकलिस्ट पूर्ण झाली.”

“माझे नमुने या इथे ठेवते आहे.” चिन्मयीने एका खोबणीकडे हात केला. टाइम मशिनमध्ये जागेचा पुरेपूर वापर करून घ्यायचा म्हणून मिळेल तिथे सामानासाठी बारीकसारीक खोबणी बनवलेल्या होत्या.

also read : Story of Our time will come… in Marathi

“मी इथे ठेवतो.” हारूतोने आपला कोपरा निवडला.

“चला लवकर” पीटर खेकसला. “गप्पा नका करू. मला कधी एकदा परत जातोय असं झालंय.”

“पण सर, तुम्हाला आपल्या काळातल प्रदूषणयुक्त जगणं आवडत नाही म्हणाला होतात ना? इथे तर किती छान शुद्ध हवा आहे” हारूतोने दीर्घ श्वास घेतला. इतकं मोठं वाक्य तो बहुधा पहिल्यांदाच बोलला असेल. चिन्मयी मनाशी म्हणाली, ‘या मेसोलियाने खुलवलाय अगदी त्याला!’

“नाहीच आवडत ते!” पीटर जोरात उद्‌गारला.

“पण मी थोडाच त्या प्रदूषित शहरांमध्ये राहतो ? मास्क घालून फिरायचं आणि हातावर प्रदूषणमापक पट्ट्या बाळगायच्या. हट् ! मला नाही आवडत ते. मी खेड्यात राहतो. तिथेच माझी प्रयोगशाळा आहे. जरूरीपुरतं शहरात येतो. पण हे सगळं आपण परत गेल्यावर बोलूया. आता चला लवकर।”

“हो सर. आता एक फायनल चेक, आणि मग टेक ऑफ, बाय बाय मेसोलिया!” चिन्मयीने हसून हात हलवला.

कम्प्युटरच्या अलर्टने तेवढ्यात त्यांचं लक्ष वेधून घेतलं, फायनल चेक करायला घ्यायचा होता. तिघांनी पुन्हा कामं वाटून घेतली. आपल्या काळात परत जायच्या ओढीने पटापट उरकायला सुरुवात केली.

टाइममशिनमध्ये शेकडो उपकरणं दाटीवाटीने बसवलेली होती. आपल्या काळाच्या मागे इतकी वर्ष येताना साहजिकच सगळी सुरक्षा पाहणारी गुंतागुंतीची यंत्रणा होती ती. त्याच्यावर शक्तिशाली कॉम्प्युटरचं नियंत्रण होतं, पण परत यायच्या वेळी सगळ्यांचं फायनल चेक करणं आवश्यक होत.

“चिन्मयी, सगळे नट-बोल्ट्स बरोबर आहेत ना?” पीटरने खोचकपणे विचारलं. “की मदत हवीय?”

“बघते मी.” म्हणत तिने टाइममशिनच्या चोहोबाजूंनी फिरायला सुरुवात केली.

नमुन्यांचं वजन. कॉम्प्युटरवर पुढची सूचना झळकली. टाइममशिनमधून भूतकाळात प्रवास करताना प्रत्येक वस्तूवर काही विशिष्ट प्रक्रिया करायला लागते. त्यामुळे भूतकाळातून फक्त ठराविक वजनाचे नमुने आणायला परवानगी होती. ट्रेनिंगच्या वेळी यावर खूप चर्चा झाली होती.

also read : Story of Our time will come… in Marathi

प्रत्येकाने आपापले नमुने बाहेर काढायला सुरुवात केली. पीटर मशिनच्या मागच्या बाजूला आपल्या खास वनस्पती आणायला गेला. त्यांची जुडी उचलताना ‘टन्न’ असा आवाज झाला. पीटरने वाकून खाली पडलेली वस्तू उचलली. सुमारे दोन इंच लांबीचा तो एक स्क्रू होता.

“चिन्मयी, इकडे ये बघायला.”

ती धावत आली. “काय झालं?”

“हा स्क्रू बघ. त्याचे आटे चक्क झिजून गेले आहेत.” पीटर आश्चर्याने म्हणाला.

“असं कसं होईल? या टाइम मशिनमधली एक न एक गोष्ट खास बनवून घेतलेली आहे असं आपल्याला ट्रेनिंगमध्ये सांगितलं होतं ना? आणि आपल्या आधी बरेच शास्त्रज्ञ या मशिनमधून प्रवास करून आलेले आहेत. मग?” स्क्रू निरखत चिन्मयीने आपलं मत मांडलं.

“ते मला काही माहीत नाही. हां, आलं लक्षात. माल पुरवणाऱ्या सप्लायरने गडबड केली असणार!”

“असं नका बोलू, पीटर सर. अख्ख्या जगात हे एकमेव टाइम मशिन आहे. ते घडवण्यात कितीतरी तज्ज्ञ मंडळींचा सहभाग आहे. हे असं कसं बोलता तुम्ही, सर?”

हारूतो तेवढ्यात तिथे येऊन पोचला. “आपल्याकडे स्पेअर स्क्रू आहेत ना?”

“अरे हो, हारूतो. थैंक यू. उगीच वेळ घालवतोय आपण. चल, स्पेअर्सची बॅग बघूया.”

तिने चपळाईने बॅग उघडली. “कोणत्या साइजचा आहे स्क्रू, हारूतो?”

पीटरच्या हातून स्क्रू घेत हारूतोने उत्तर दिलं, “एम सिक्स.”

“सिक्स ? आणि लांबी ?”

“बघू, बघू,” पीटरने तो स्क्रू हारूतोच्या हातातून हिसकावून घेतला.

“सर, तो स्क्रू द्या ना. मी लांबी बघतो.” हारूतो नम्रपणे म्हणाला.

“द्या तो स्क्रू इकडे, सर. त्याला लावून दुसरा शोधते, मग तुम्हांला निरीक्षण करायला परत देते” म्हणत चिन्मयीने पीटरकडे हात पसरला.

शून्यात बघत पीटरने तो स्क्रू हातातून खाली टाकला. तिने घाईत उचलला, त्याच मापाचा दुसरा शोधला, आणि परत देताना म्हणाली, “आटे इतके झिजलेले कधीच पाहिले नव्हते. हो ना हारूतो? चल आपण बसवून टाकू.”

छिद्रात स्क्रू बसवताना अचानक ती ओरडली, “अरे बापरे ! यात तर स्क्रू सरळ वरखाली सरकतोय!”

हारूतोने टॉर्चचा झोत नेमका आत टाकला. “आतले आटे पण झिजून गेले आहेत.”

चिन्मयी चरकली, “मग आता?”

“एक मोठा साइज घेऊन बघूया?”

“चालेल”, म्हणत तिने मोठा स्क्रू शोधला. पण तोही आत घुसेना. हारूतोच्या चेहऱ्यावर शंका आणि भीती पसरली.

“एक ट्राय करूया? खालच्या बाजूने नट बसवायला चान्स आहे का बघूया? क्षणभराने तिने सुचवलं.

“बघतो.” हारूतोने त्या पट्टीखाली डोकं घातलं. “अं हं. खालून अजिबात जागा नाही.”

अस्वस्थपणे हात झटकत चिन्मयी उठली. पीटर जरा दूर डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्याजवळ गेली.

“काही सुचतंय का, सर? स्क्रू तिथे बसतच नाहीय. काहीतरी करायला हवं ना?” त्याने नकारार्थी मान हलवली.

तोवर हारूतोने ती धातूची पट्टी हलवून बघितली होती. “चिन्मयी, पीटर सर, ही पट्टी आणि बाजूची स्प्रिंग मिळून या टीएक्सआर लिहिलेल्या उपकरणाला बॅलन्स करतात.”

“म्हणजे? आता तो टीएक्सआर बॅलन्स होणार नाही?” चिन्मयीचा आवाज कापला. पूर्ण अंगातून एक थंडगार शिरशिरी गेली.

हारूतोने खेदाने मान हलवली. त्याच्याही पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली होती.

“कसं पण ? आणि आपण आता काय करायचं?” चिन्मयीचा हात आपोआप तोंडावर गेला. “आपण इथे या काळात आलो खरे, पण परत कसे जाणार?”

आई-बाबा, मैत्रिणी, आपले संशोधक सहकारी, सगळ्यांचे चेहरे तिला डोळ्यासमोर दिसायला लागले. किती उत्साहाने ते वाट पाहत असतील. स्वागत करायला किती जय्यत तयारीत असतील. त्यांना काही कळवता पण येणार नाही. हे टाइम मशिन पण असं, की या काळातून आपल्या काळातल्या कंट्रोल सेंटरशी संपर्कसुद्धा करता येत नाही. कोणताच मेसेज पाठवता येत नाही.

दाटत जाणाऱ्या अंधाराकडे बघताना चिन्मयीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहायला लागल्या. ती आशेने हारूतोकडे गेली. “बोल ना, हारूतो. या छिद्रातले आटे तर पार झिजलेत.

“आटे पाडायचं यंत्रही आपल्याकडे नाही.” त्याच्या तोंडातून जेमतेम शब्द फुटले.

“आणि या भयाण काळात ते कुठे मिळण्याचा प्रश्नच येत नाही.” कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला.

“बाकीचे चेक्स पूर्ण करून पाहूया का?” हारूतोने चाचरत एक मार्ग सुचवला. “कॉम्प्युटर कदाचित काही सांगेल.”

“चालेल” तिने मान्य केलं.

“हारूतो, चिन्मयी”, पीटरने तेवढ्यात हाक मारून दोघांचं लक्ष वेधून घेतलं. “या स्क्रूचा नीट वास घेऊन बघा.”

“वास?” चिन्मयी बुचकळ्यात पडली. पीटरजवळ जात तिने तो स्क्रू नाकापाशी नेला. “बाप रे! एखाद्या अॅसिडसारखा आहे.”

“करेक्ट! म्हणजे माझ्या नमुन्याच्या वस्तूंमधून अॅसिडसारखं काही पाझरतं. कोणतं रसायन आहे ते गेल्यावर टेस्ट करून बघायला लागेल. पण बघा- मूळ संशोधनाच्या जोडीने मला काय बोनस मिळालाय! एक विशिष्ट रसायन स्त्रवणाऱ्या वनस्पती. काय परिणाम होत असेल त्याचा पर्यावरणावर? आणि जमिनीवर? या वनस्पती नष्ट झाल्यावर प्रदूषण वेगाने वाढलं एवढाच माझ्या संशोधनाचा निष्कर्ष होता. पण, वर हा नवा शोध लागलाय!”

“अॅसिड बाहेर टाकणाऱ्या वनस्पती आणि त्याच्यामुळेच स्क्रूचे आटे झिजून विरघळून गेले. आणि त्याच्याचमुळे त्या छिद्राच्या आतले आटे देखील विरघळून गेले.” बधिरपणे चिन्मयीच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते.

“करेक्ट. अशा वनस्पती आजवर कोणालाच मिळाल्या नव्हत्या. आता परत गेल्यावर माझं संशोधन कसं गाजेल बघा!” आपण मेसोझोईक काळात अडकून पडलो आहोत, हे विसरून पीटर उत्तेजित होऊन बोलत होता.

“पीटर सर, तुमच्या लक्षात आहे ना, आपण अजून भूतकाळातच आहोत.” त्याला स्क्रू परत देत ती म्हणाली.

“हो, सर. आपण इथे मेसोलियामध्ये अडकलो आहोत. या झिजलेल्या स्क्रूमुळे टीएक्सआर बॅलन्स होत नाहीय. आपण नाही करू शकत टेकऑफ.”

“म्हणजे? मग आपण परत कसे जाणार आहोत?” झटकन उठून उभा राहताना पीटर धडपडला.

“हारूतो म्हणतोय तशा पुढच्या टेस्ट्स करून बघूया.” चित्मयीचा आवाज तिला स्वतःलाच ऐकू येत नव्हता.

थरथरत्या हातांनी आणि धडधडत्या हृदयाने त्यांनी सगळ्या टेस्ट्स पूर्ण केल्या. आता तिघांच्याही नजरा कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे लागल्या. ‘मिसमॅच. चेक टीएक्सआर.’ त्याच्यावर अक्षरं उमटली.

त्यांनी आणखी काही खुडबूड करून बघितली. दोन, चार, सहा, दहा वेळा. स्क्रीनवर पुन्हा पुन्हा तोच सदेश उमटत होता – ‘मिसमॅच. चेक टीएक्सआर.’

also read : Story of Our time will come… in Marathi

चिन्मयीने गळून जाऊन बसकण मारली. पीटर वेड्यासारखा की-बोर्डवर बोटं आपटत राहिला. हारूतोने काहीतरी पुटपुटत टाइम मशिनला एक फेरी मारली.

आणि मग केवळ एका स्क्रूमुळे मेसोलियात अडकून पडलेले तिघेजण हताशपणे फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. बाहेर डायनासोर्सचा आवाज वाढत चालला होता.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.