Story of Lesson in Marathi

Story of Lesson in Marathi

1 min read

धडा गोष्ट मराठीत.

Story of Lesson : विदर्भातले मे महिन्यातले दिवस. दुपारचे बारा बाजले की सूर्य अगदी आग ओकायचा. उन्हाळा इतका जहाल की गावातले सारे रस्ते ओस पडायचे. दुपारी बारा ते पाच जणू कर्फ्यूच असायचा. सूर्य असा तापलेला असे की अंगाची लाही लाही होई.

रस्त्यावरचं डांबर वितळून त्याचा काळा चिकट चिवट चिखल होई. त्यावरून चालण्याचा प्रयत्न केला तर त्यात चपला फसत. सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर नेहमीपेक्षा तिप्पट शक्ती लावावी लागे. गरम गरम झळा अशा वाहत की प्रत्येकजण डोक्याला फडकं किंवा पागोटं बांधल्याशिवाय घराबाहेर पडण्याचा विचारही करू शकत नसे.

Story of Lesson in Marathi

अशा जीवघेण्या उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असे. सुट्टी असूनही हुंदडायला मिळणार नसेल, दिवस- दिवस मित्रांबरोबर खेळायला मिळणार नसेल तर अशा सुट्टीचा काय उपयोग? त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक वैतागच वाटे. कुणाचेच आई-वडील मुलांना दुपारी घराबाहेर पडू देत नसत. मग अशा टळटळीत दुपारी करणार काय ?

अशाच एका वैतागवाण्या दुपारी मी आणि माझा भाऊ घराबाहेरच्या झाडाखाली दुपार उतरण्याची वाट बघत बसलो होतो. माझा भाऊ असेल तेरा-चौदा वर्षांचा, आठवीत वगैरे जाणारा, आणि मी त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान म्हणजे आठ-नऊ वर्षांचा. डोक्यावरचं झाड होतं सीताफळाचं. या झाडाची सावली अशी कितीशी मोठी असणार? ते काही वडाचं, पिंपळाचं किंवा चिंचेचं झाड नव्हतं, त्यामुळे सावलीखाली ऐसपैस खेळावं तर तेही शक्य नव्हतं. त्यामुळे अगदी कंटाळा कंटाळा आला होता. त्यातल्या त्यात हाताला चाळा होता झाडाखाली पडलेल्या बारीकसारीक दगड-गोट्यांचा. एखादी आठ-दहा फुटांवरची खूण धरायची आणि त्याला दगड मारत बसायचं, असं काहीसं आमचं चाललं होतं. भाऊ नेम धरत असेल तर मी गप्प बसून असे आणि मी नेम धरत असे तेव्हा भाऊ. असं आळीपाळीने खेळणं चालू होतं. भाऊ नेम धरत असे तेव्हा त्याचा नेम लागणार का याचं कुतूहल वाटत असे. त्यामुळे नेम धरताना तो जरा श्वास धरून असे तसाच माझाही श्वास रोखून धरला जाई. पण हळूहळू या खेळाचाही कंटाळा येई.

असाच कंटाळा येऊन वैताग आलेला असताना हातातला एक दगड मी हलकेच वर उंचावला, वर फेकला आणि झेलला. मग भावानेही एक दगड वर फेकला आणि झेलला. डोक्यावरच्या कोणत्याही फांदीला दगड लागू द्यायचा नाही इतका तो अलगद फेकायचा आणि तो झेलायचा, असा एक खेळ आम्ही शोधून काढला. हा खेळ थोडा वेळ खेळायला बरा होता. पण कोणास ठाऊक कसा, माझा एक दगड जास्त उंच गेला आणि एका फांदीला लागला. खिजवल्यासारखा भाऊ माझ्याकडे पाहून हसला. मी माझ्यावर वैतागणारच; पण तेवढ्यात लक्षात आलं, की फांदीला लागून खाली पडणाऱ्या दगडासोबत एक छोटंसं चिमणीचं पिलूही जमिनीवर पडलंय..

क्षणभर काही कळलंच नाही. मग लगेच लक्षात आलं- आपला दगड याला लागला असणार. जमिनीवर पडलेलं पिलू चोच उघडी टाकून पडलं होतं. अशा वेळी काय करायचं असतं माहिती नव्हतं. पक्ष्याला माणसाने हात लावला तर अन्य पक्षी त्याला मारून टाकतात, पुन्हा आपल्यात घेत नाहीत, असं काहीसं आम्ही ऐकून होतो. पण त्या पक्ष्याला मदतीची गरज होती. आपसूकच भावाने त्या पिलाला हातात घेतलं. मला झटपट पाणी आणायला धाडलं. अर्ध्या मिनिटात मी पाणी घेऊन आलो. भावाने थेंब थेंब पाणी त्या पिलाच्या उघड्या चोचीत टाकायला सुरुवात केली; पण पिलू काही हालचाल करेना. स्वतःहून पाणीही पिईना. मग भावाने पाण्याच्या भांड्यात पिलाची चोच बुडवून पाहिली – पिलू आपलं आपलं पाणी पिईल या आशेने; पण पिलाने प्राण सोडलेले होते. पिलू मरून गेलं होतं.

पाचच मिनिटांत हे सारं घडलं. जे घडलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्यामुळे आम्ही दोघंही अपराधी मनाने तिथेच बसून राहिलो. आमच्यासमोर आकाशाकडे चोच उघडी करुन मरून पडलेलं पिलू होतं. भावाने मग झाडाखालीच एक वीतभर खोलीचा एक छोटासा खड्डा तयार केला आणि त्यात ते पिलू पुरून टाकलं.

also read : Story of Circle of Wonderful Things in Marathi

त्याही नंतर आम्ही बराच वेळ तिथेच बसून राहिलो. आपल्या हातून एका चिमण्या पक्ष्याचा जीव गेला याबद्दल मूकपणे स्वतःला कोसत बसलो. आम्ही ज्या फांदीखाली बसलो होतो त्याच फांदीवर हे पिलू बसलं होतं अन् माझ्या दगडाच्या एका फटक्याने ते धारातीर्थी पडलं, या कल्पनेने मन कळवळत होतं.

फांदीपर्यंत दगड उडवण्याचा खेळ आम्ही कुठून शोधून काढला असं आम्हाला होऊन गेलं. संध्याकाळ झाली, उन्हं उतरली, मित्रांबरोबर खेळण्याची वेळ झाली तरी तिथून उठावसंच वाटेना. मजेत उड्या मारत खेळावंसंच वाटेना.

बिघडलेला मूड बघून आईने ‘काय झालं’ विचारलं. कसनुसा होत मी तिला काय घडलं ते सांगितलं. तिने मला हलकंच जवळ घेतलं. ती म्हणाली, “ते पिलू तुझ्या दगडानेच मेलं असं तुला वाटतंय. कदाचित तसं नसेलही.” वडील म्हणाले, “उन्हाळ्यात उष्णतेने माणसंही मरतात, तर पक्ष्यांचं काय घेऊन बसलास. ते पिलू तहानेनेही मेलं असेल. तुझा दगड फांदीला लागणं आणि पिलू आपलं आपलं मरून पडणं या दोन गोष्टी कदाचित एकदमच घडल्या असतील.” आई-वडील दोघंही मला समजावू पाहत होते, माझ्यातला अपराधभाव कमी करू पाहत होते.

त्यांचं म्हणणं मला पटत नव्हतं पण ते पटवून घ्यावं असं वाटतही होतं. कारण त्यांचा तर्क स्वीकारला तर ‘आपल्यामुळे पिलू मेलं’ या भावनेतून माझी सुटका होणार होती. मी आई-वडिलांना म्हटलं “असेल तसंच.”

पण तरीही पुढे कित्येक दिवस मनाला झालेली जखम बरी झाली नाही. आपल्या हातून एक पिलू हकनाक मेलं, ही जाणीव मनाच्या तळाशी खोल जाऊन बसली ती बसलीच.

पुढे चार-सहा वर्षांनी, कुणास ठाऊक कशी पण एक अजब सवय लागली मला. आमच्या भागात मोठ्या डोक्याचे चांगले फूटभर लांबीचे सरडे फार. दिसायला खरखरीत; मगरीसारखे. त्यांच्याकडे बघितलं की भीतीही वाटे आणि त्यामुळे चीडही येई. हात आपोआप जमिनीकडे ओढला जाई आणि हातात दगड घेऊन तो यांत्रिकपणे सरड्याच्या दिशेने फेकला जाई. पण चाहूल लागली की सरडा तिथून पसार होई. मग आम्ही मित्रही आपापल्या खेळात मश्गुल होत असू.

पण एकदा बागेत खेळताना असाच एक सरडा डोकं वर काढून बसला होता. सवयीने हातात दगड घेतला गेला आणि नेमही न धरता सरड्याच्या दिशेने भिरकावला गेला. आणि पाहतो तर काय.. जागच्या जागी सरडा मरून पडला होता. माझ्या दगडाने त्याचं डोकं रक्ताळलेलं होतं. मान पाडून सरड्याने प्राण सोडला होता. या वेळेस मागच्यासारखा ‘बेनिफिट ऑफ डाऊट’ मिळणार नव्हता. सरडा माझ्याच दगडाने मेलेला होता. काही क्षणांपूर्वी जिवंत असलेल्या आणि निव्वळ माझ्या खेळापोटी जीवाला मुकलेल्या त्या बिचाऱ्या प्राण्याकडे मी काही काळ नुसताच बघत बसलो. आपल्या हातून काय घडलंय हे मला हळूहळू जाणवत गेलं. ती जाणीव मला सुन्न करून गेली. त्या दिवसानंतर हातात दगड घेऊन भिरकावणं बंद झालं.

also read : Story of Circle of Wonderful Things in Marathi

नदीकाठी किंवा तळ्याकाठी गेलं की सर्वच मुलांचा आवडता खेळ म्हणजे ‘भाकऱ्या टाकणे’. काठावरचे चपटे दगड शोधायचे आणि पाण्याला समांतर पण पाण्याच्या अगदी जवळून ते सर्वशक्तीनिशी फेकायचे, असा हा खेळ. आपण फेकलेला दगड पाण्याच्या वरच्या थराला कापत उड्या मारत जातो तेव्हा केवढी गंमत येते ! या खेळात कुणाचे दगड दोन-चार उड्यांमध्ये बुडतात, तर कुणाचे आठ-दहा उड्याही मारतात. शक्ती आणि कौशल्य यांचा संगम असलेला हा खेळ माझ्याही खास आवडीचा. पूर्वी खूप खेळायचो हा खेळ मी, पण आता पाण्याकाठी गेल्यानंतर हात थरथरतो, थबकतो. आपण भिरकावलेल्या दगडाने पाण्यातला एखादा मासा विनाकारण प्राण गमावून बसेल असं वाटून जातं. दगड लागून मरून पडलेलं पिलू आणि सरडा आठवून जातो. हातातला दगड गळून पडतो.

मी माझ्या आसपास पाहतो, तर अनेकांना टेबलावरच्या किंवा आसपासच्या मुंग्या चिरडून मारण्याची सवय असते. मुंगी, तीही काळी असेल तर ती निश्चितच उपद्वव्यापी नसते; पण तरीही लोक सवयीने तिच्यावरून बोट फिरवतात नि चिरडून मारून टाकतात. तेव्हा वाटतं, कदाचित यांच्या हातून पक्ष्याचं एखादं छोटं पिलू किंवा सरड्यासारखा निरुपद्रवी जीव मारला गेलेला नसणार, नाही तर इतक्या सहजपणे त्यांनी मुंगीचा जीव घेतला नसता.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

आमच्या विषयी

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.