Story of In the Idea of the City… in Marathi

Story of In the Idea of the City… in Marathi : नगरी कल्पनेतली… गोष्ट.

1 min read

Story of In the Idea of the City… : नगरी कल्पनेतली… गोष्ट.

Story of In the Idea of the City… : ‘कल्पनानगरी’ असे ठळक अक्षरात लिहिलेला बोर्ड घाटाच्या रस्त्यावर लावलेला होता. ज्या रम्य नगरीची सहल करायला शाळेतील विद्यार्थी निघाले होते ते जवळ आल्याचे भान त्यांना आले. ‘गाव आले गाव आले’चा गलका मुले करत असताना त्यांना शांत करेपर्यंत कल्पनानगरी आली पण. दूर डोंगराच्या पायथ्याला उंचच उंच झाडाच्या गर्दीत भल्या मोठ्या गर्दीत गाव पसरले होते. गाडी गावाच्या वेशीवर आली. एक एक करीत सारी विद्यार्थी उतरले.

खूप मोठ्या झाडाच्या वर्तुळात बसलेल्या गावाच्या प्रवेश द्वाराशी दोन्ही बाजूला दोन मोठे हत्ती आपले सुपाएवढे कान आणि मोठी सोंड हलवत उभे होते- येणाऱ्याच्या स्वागताला. हत्तींनी आपली सोंड उंचावत स्वागत केले. बाकी जागोजागी वर्तुळाकार सिंह डुलत होते. आता या झुलणाऱ्या हत्ती आणि सिंहाना चुकवत आत कसा प्रवेश मिळवायचा असा विचार कल्पेश सरांच्या मनात येतो ना येतो तोच आवाज आला, ‘सुस्वागतम… गुड मॉर्निंग… वेलकम !’

सगळ्यांनीच आवाजाच्या दिशेने पाहिले. चिटपाखरूही नव्हते. आवाज कोठून आला? सर्वजण घाबरले. समोर वडाचे खूपच मोठे झाड होते. त्याच्या विस्तीर्ण पारंब्या हलून तितकाच मोठा आवाज झाला.

‘परवानगीचे पत्र आणलेय ?’ कुणीतरी विचारले. सरांनी परवानगीचे पत्र काढले. इकडे तिकडे पाहिले.

‘नका शोधू मला… नाही दिसणार मी… पाठीमागे वळा. माझ्या ढोलीत तुमचे ते पत्र ठेवा.’

आणि जोरात हसण्याचा आवाज आला.

कल्पेश सरांनी पाहिले, समोर असलेले वडाचे झाड बोलत होते. झाडाला माणसासारखे तोंड, तसेच दोन डोळे, डाव्या उजव्या बाजूला हात होते. झिपऱ्या वाढाव्यात तसे केस होते.

सरांनी झाडाच्या ढोलीत पत्र ठेवले. मुला- मुलींची रांग केली. हळूहळू प्रवेशदारातून आत जाऊ लागले. ड्रायव्हर गाडी घेऊन बाजूला लावणार तोच दोन पोलिसांच्या वेशात कोल्हे समोर आले, तोंडातले पुस्तक हलवत म्हणाले, ‘आधी पार्किंगची पावती फाडा…’ ड्रायव्हरने पावती लिहिली. फाडली. ‘आता पैसे कुणाकडे द्यायचे?’ कोल्ह्याने मान हलवून सांगितले, ‘जावा आत. आत दोन हरणे आहेत. तुम्हाला पाहताच समोर येतील. दाखवतील सर्व गाव. ते गाईड आहेत.’

अगदी तसेच झाले. विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक आत चालू लागले. दोन्ही बाजूला दोन हरणे होती.

गावातल्या हिरव्यागार हिरवळीवरून गावात शिरताना सगळ्यांना खूप आनंद झाला. आसपास वाहणारे स्वच्छ पाण्याचे झुळू-झुळू पाट, भोवताली संपूर्ण गावभर छातीभर वाढलेल्या गोल्डन डुरांड्याची भिंत खूपच मनोहर दिसत होती. आंब्याची झाडे, त्यांना सोनेरी रंगाचे आंबे लगडलेले. सशाचा पांढरा शुभ्र पुंजका बागडत होता. त्याच्यापुढे ध्यानस्थ साधू वाटावेत अशा पुष्कळ बगळ्यांची माळच्या माळ मनाला मोहवीत होती. आकाशी फुलणारी बगळ्यांची माळ त्या गावात जमिनीवर फुललेली पाहून मुले बागडू लागली.

बगळ्या जवळून जाताना बरोबरच्या एक शिक्षिका मुलांना सांगू लागल्या, ‘संधीसाधू वाटला तरी बगळा मोठ्या धीराचा.’ पोरांना काय निमित्तच हवे होते काहीतरी प्रश्न विचारायला. एका मुलाने विचारले, ‘संधीसाधू म्हणजे काय?’

Also Read : Story on Dream of a Boy in Marathi

शिक्षिकेने मुलांना पटेल असे उत्तर दिले. त्या मुलाला त्या शिक्षिका म्हणाल्या, ‘आई अंघोळीला गेलेली पाहून त्या अवधीत तू फ्रीज उघडून चॉकोलेट फस्त करतोस ना त्याला म्हणतात संधी साधणे.’ खो खो करून मुले हसली.

चालता चालता एके ठिकाणी हरणे थांबली. एका झाडाखाली सशाची एक आणि कासवाची एक अशा दोन मूर्त्या होत्या. त्या मूर्तिपाशी असलेल्या पाटीपाशी जाऊन हरणे थांबली. पाटीकडे पाहून मान हलवून, आवाज करून ‘पाटी वाचा’ सांगू लागली. ससा रे ससा कापूस जसा, त्याने कासवाशी लावलेल्या शर्यतीचे स्मृतिस्थळ होते ते जपलेले. त्या स्थळाने सर्व मुलांना ‘ससा रे ससा’ कविता आठवली.

पुढे एक विहीर होती. विहिरीच्या सोनेरी कठड्यावर एक डेअरी मिल्क चॉकलेटने बनवलेली, दुसरी पारले जी बिस्किटातून घडवलेली आणि तिसरी श्रीखंड गोळ्यातून साकारलेली, अशा तीन कुन्हाडी असलेला लाकूडतोड्याचा फोटो होता. प्रसिद्ध लाकूडतोड्याच्या गोष्टीची आठवण करून देणारी ती विहीर होती. सगळ्यांच्या लगेच लक्षात आले, ‘प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून तीनही कुन्हाडी बक्षीस मिळाल्या तर’ मुलांच्या डोक्यात आले.

सहलीतले मुले पुढे पुढे चालत असताना समोर पुन्हा मोठेच मोठे झाड लागले. त्याला तोंड, डोळे हात, केसाच्या पारंब्या होत्या. अशी पाच एक झाडे तरी होती.

‘या आत. राजमहाल बिस्कीट राजाचा, चॉकलेट राणीचा बघायचा ना?’ झाडाने मोठ्ठा ‘आ’ केला. मोठ्ठा प्रकाशाचा कल्लोळ झाला. लख्खकन झोळ आला. बघता बघता झाडाने केलेल्या मोठ्या ‘आ’ मधून तोंडातून लांबच लांब शिडी उघडली गेली. त्या सरकत्या शिडीवर पाय ठेवले साऱ्यांनी. अलगद जाऊन सगळे पोहचले पलीकडे.

समोर पाहिले. वेगवेगळ्या, गोड-खाऱ्या बिस्कीटाचा गगनचुंबी मोठा महाल होता. त्याला दारे-खिडक्या जेम्सच्या रंगीत गोळ्यांतून बनलेली. महालाचा राजा वाघ पारले बिस्किटातून बनवलेल्या राजवस्त्रात आणि राणी कोकिळा डेअरी मिल्क चॉकलेटचा ब्लाउज आणि किटकॅट चॉकलेटची साडी नेसून स्वागताला आली होती. महालात शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल नोकर म्हणून राबत होते. फुलपाखरे स्वछंद लहरत होती. गोळ्यातून केलेल्या वेगवेगळ्या डिझाईनचे ड्रेस घालून, चित्रविचित्र कपडे लेवून, विविध प्राणी, त्यात डायनोसार उठून दिसत होते. कार्टून फिल्ममधल्या जनावरे, प्राणी यांची गर्दी जागोजागी. त्यात छोटा भीम, चुटकी दिसताच मुलांनी टाळ्या पिटून ओळख दिली.

राजवाड्यात जी झाडे होती ती बहुतेक जेम्सच्या निळ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या गोळ्यांनी लागडलेली. इतरत्र वेलीला बडीशेपच्या गोळ्या होत्या. कॅडबरी, डेअरी मिल्क, किटकॅट, मेरी बिस्कीट, पारले जीची झाडे उभी होती. कॅडबरी डेअरी मिल्क तोडून पोटभर खावीत असे शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांना वाटत होते. पण कुठल्याही झाडाला, बिस्किटाला, झाडाला स्पर्श करू नका. तुमचे चॉकलेट होईल, बिस्कीट होईल. अशा जागोजागच्या पाट्या वाचून भीती जागी झाली. आपलेच चॉकोलेट झाले तर, आपलेच बिस्कीट किंवा गोळी झाली तर? सगळ्यांचे हात जागीच थांबले.

गावात सारी गर्दी- मांजर, पोपट, सिंह, हत्ती, शेळ्या, मेंढ्या, कबुतर, पोपट, चिमणी या सारख्यांचीच. साप, नाग यांची घरे राज्यात होती पण बाजूला. राज्यातले सर्व प्राणी, जनावरे, कीटक यांना ‘वाचा शक्ती’ प्राप्त असल्याने कोकिळा शास्त्रीय नाट्यगीत गाताना पाहून सर्च चकित झाले. ‘कुहू कुह’ आवाज झाला. अरे ही तर कोकिळा. सर्वजण ओरडले, ‘फार चतुर नार.. सदा शृंगार करून गात असते.’ कोणीतरी संगितले. तिथल्या एक कोकीळन गाणे म्हण म्हणताच ‘कर हा करी धरला शुभांगी’ गाणे म्हटले, पोपटाने गोड आवाजात ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय’ गाणे म्हणून कमाल केली. प्राणी माणसासारखे बोलतात, गातात या अनुभवाने मुले आश्चर्यचकित झाली. घारीच घारी चहूकडे फिरताना दिसल्या. त्यातली एक घार खाली उतरत पंख पसरवून त्यावर मुलांना बसवून गावाभोवती फेरफटका झाला. अगदी सगळ्या मुलांना. गरुडही खूप राजाच्या ठसक्यात बसलेले. गरुडांनी पण मुलांना पंखावर घेत गावभरच्या आकाशात फिरवून आणले. आकाशातली सैर थोडी पोटात गोळा आणणारी पण मनभावक. गावात तळे होते सरबताचे. सरबत पिण्याची सोय होती. सहलीला आलेल्या मुलांनी सरबत ओंजळीत घेऊन खूप प्यायले.

जाताना गावातल्या प्राण्यांनी त्यांच्या वतीने जेवण दिले. श्रीखंडाच्या वड्या, बिस्कीटाची गोड चटणी, चॉकलेटची कोशिंबीर, बडीशेपच्या गोळ्यांचा भात, कीटकॅट पेरून केलेले डेअरी मिल्कच्या पोळ्या. व्वा! काय मस्त बेत होता!

सारे गाव हिंडून सहलीतले शिक्षक बाहेर आले. परत जाण्यासाठी गाडीत चढत असताना एक जख्ख म्हातारा गाडीपाशी आला. त्याने विचारले, ‘कुठे आला होता?’

कल्पेशसरांनी उत्तर दिले, ‘या बिस्कीटच्या राजवाड्यात… कल्पना नगरीत गावात.’ त्यांनी… सरांनी बोटं केले. पाहिले. जागेवर तर काहीच नव्हते. अगदी तो प्रश्न विचारणारा जख्ख म्हातारासुद्धा.

‘अरे, उठ! किती वेळ झोपणार? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला कविता पाठ करत करत झोपलास तो झोपलासच. उठ जायचे ना शाळेत.’

त्याची आई त्याला उठवत होती.

अरेच्या मग हे सारे मी पहिले, तो राजवाडा, ते बिस्कीट गोळ्याचे गाव, कोठे गेले सगळं ?’

‘ते स्वप्न होते तर, सगळे’ असे पुटपुटत तो उठला. आवरायला गेला. शाळेची वेळ होत आली होती.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.