Story of Draw a Picture of a Peacock in Marathi

Story of Draw a Picture of a Peacock in Marathi : काढू मोराचं चित्र गोष्ट.

1 min read

Story of Draw a Picture of a Peacock in Marathi : काढू मोराचं चित्र गोष्ट.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी. अतिशय सुंदर. विशेषतः त्याचा तो पिसारा सगळ्यांनाच भुरळ पाडणारा. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या चित्रांमध्ये मोरांचा वावर असतो. सगळीकडेच मोर. साडीवरच्या डिझाइनमध्ये मोर. भिंतींवरच्या चित्रांमध्ये मोर. देवळातील शिल्पांमध्ये मोर. सारवलेल्या जमिनीवरच्या रांगोळीतही मोर. मोरच मोर. मोर आणि त्याची मोरपिसं.

मी खेड्यातला. मलाही मोरपिसांची नवलाई होती. रानात फिरताना इकडे-तिकडे क्वचित पिसं पडलेली दिसायची. ती मी गोळा करून घरी आणायचो. मग कुणी ते देवाच्या आराशीत मांडायचे. मग मला धन्य वाटायचं. काही घरांमध्ये मोराच्या पिसांचा लांब पांढऱ्या देठासहित जुडगा बांधून वर अडकवलेला असायचा. त्याला कुंचा म्हणायचे. असे कुंचे फकिराकडे, देवऋषीकडे, मांत्रिकाकडे असायचे.

आमच्या लहानपणी ‘देवबाप्पा’ सिनेमा आणि त्यातलं ‘नाच रे मोरा’ हे गाणं फेमस झालं होतं. गॅदरिंगमध्ये ते गाणं असायचंच. शिवाय भेंड्यांच्या खेळात ‘न’ शब्द आला की पहिलं गाणं आठवायचं ते तेच.

लहानपणी हे मोरपीस न्याहाळून बघण्याचा छंदच जडायचा. विशेषतः त्याचा मधला भाग. आम्ही त्याला डोळा म्हणायचो. चकाकता निळा रंग. त्यातच तशीच हिरव्या चकाकत्या रंगाची उधळण. आमच्या गावी सगळे डल्ल, फिक्के रंग. त्यात असे चकाकते रंग म्हणजे नवलाई. मी मोर इकडून तिकडे जाताना पाहिले होते, पण नाचताना पाहिले नव्हते. एकदा पुण्याच्या पेशवे पार्कमधे नाचताना पाहिला. नाचत म्हणजे कथक वगैरे नव्हे बरं का. एरवी मोर कसा पिसारा जमिनीवर लोळवत चालत असतो ! पण त्या दिवशी पेशवे पार्कमध्ये पाहिलेला तो मोर कसा पंख फुलवून डौलात चालत होता! त्या पिसाऱ्याचं अर्धं वर्तुळ किंवा पाऊण वर्तुळ तयार झालेलं आणि ते त्याने हलक्या गतीने थरथरत ठेवलेलं. ते पाहून मी मंत्रमुग्ध की काय म्हणतात, ते होऊन गेलो.

Also Read : Story of Our Nightingale Chicks in Marathi

पुढे पुण्यात पत्रकारनगरमध्ये राहायला आलो. आमच्या घराच्या मागेच एक टेकडी आहे. तिथे मोरांचा वावर असतो. पहाटेपासून त्यांचं ओरडणं सुरू होतं. त्या टेकडीवर फिरायला गेलं की चार- पाच मोरांचा थवा इकडून तिकडे जाताना दिसतो. झाडावर चढताना मी त्यांना अजून पाहिलेलं नाही, पण झाडावर बसलेले मोर पाहिलेत. झाडावरून डौलदार झेप घेऊन झप्पकन पिसारा जरासा फुलवून ते जमिनीवर अलगद खाली उतरताना अनेकदा पाहिले आहेत. तेव्हा लक्षात आलं, या पक्ष्याची लांबी आपल्याला वाटते त्यापेक्षा बरीच जास्त आहे. कशासाठी ती एवढी लांबी ? त्याचा उपयोग काय ? त्याचा उपयोग फक्त मादीला आकर्षित करण्यासाठी. माझी लांबी बघ केवढी आहे अन् माझा पिसारा केवढा ! मी त्यासह डौलाने नाचू शकतो. मी धष्टपुष्ट आहे, त्यामुळे माझ्यावर भरवसा ठेव, असं तो तिला सांगत असतो. पण बाकी त्या पिसाऱ्याच्या लांबीचे धोकेच जास्त. जंगलात एखादा शिकारी प्राणी मागे लागला तर त्या पिसांसह पळता भुई थोडी होणार त्याची.

..तर आता मोराची चर्चा पुरे झाली. आपण बोलतोय ते चित्रं काढण्याबद्दल. लहानपणी मीही सगळ्या मुलांसारखा मोरपिसाची चित्रं काढत असे. कधीमधी अख्खा मोरही काढत असे. पण मला मोराचं वेड लागलं ते बऱ्याच उशिरा. तोवर मी माणसांची, हत्तींची चित्रं काढू लागलो होतो. समोरून मोर काढायला आवडायचे नाहीत, कारण त्यामुळे मोरामधलं सौंदर्य हरवून जायचं. मग वेगवेगळ्या कोनांतून त्याची चित्रं काढू बघायचो. पण नंतर लक्षात आलं, की मोराचं सौंदर्य जर त्याच्या पिसाऱ्यात असेल तर त्याकडेच लक्ष देऊ यात की आपण. आणि पिसाऱ्याची चित्रंही काही हुबेहूब काढायला हवीत असंही नाही. मग मी पिसारा काढण्याचे प्रयोग सुरू केले. माझ्या पिसाऱ्यात पानं आली, फुलं आली. आणि मग हा पाना-फुलांचा पिसारा असलेला मोर मला माझा मोर वाटू लागला.

मग मी मोराची इतकी चित्रं काढू लागलो की बास. माझ्या मुली तुमच्या वयाच्या होत्या तेव्हा मला म्हणायच्या, “बाबा, नो मोअर मोर प्लीज!” एकदा तर धाकटी मुलगी तिच्या मैत्रिणीला सांगताना मी ऐकलं, “माझ्या बाबाला किनई मोराशिवाय दुसर काहीही काढता येत नाही.” पण कुणी काही म्हटले तरी मोर काढण्याची माझी आवड काही कमी झाली नाही. हं, तर हा मोर कसा काढायचा?

मोर काढताना सुरुवातीलाच येतं ते त्याच्या डौलदार मानेचं वळण, डोक्यावरचा ऐटबाज तुरा आणि मागे पसरून गेलेला आकार. मला तो दोन रेषांमध्ये दिसला. एकमेकांना छेद देणाऱ्या दोन रेषा. वरच्या टोकाला जरा झोका दिला की डोकं, तुरे, चोच सगळं आलं आणि बाकी पिसारा मागच्या दोन रेषांमध्ये आला. बघा बरं, अगदी कमीत कमी रेषांत दिसायला लागला की नाही मोर? मग त्याला उभ करण्यासाठी पायांच्या दोन रेघा काढल्या आणि मग लागला की तो नाचायला. असं म्हणतात, की मोराचे पाय कुरूप असतात. आपल्याला तर बुवा तसं काही वाटत नाही. आपल्या चित्रातल्या मोराचे पाय थोडे वेडेबागडे येऊ शकतात; पण म्हणून तर ते चित्र आपलं असतं.

आता ही पुढची चित्रं बघा. पिसाऱ्याच्या जागी पानं काढण्यात एक वेगळीच मजा आहे. कुठलाही आकार आपण परत परत काढला की त्यातून एक डिझाइन तयार होतं. आपल्यापाशी चित्राचा सांगाडा आहेच. दोन रेषा एकमेकांना छेदतात त्या आकाराचा. आता त्याच लयीत मागे पानं-फुलं काढायची. फुलं-पानंच काय, त्या काहीही गच्च भरलं की ते आकर्षक दिसू लागतं. पानं म्हणजे काय, तर एक मधली रेघ आणि भोवतीचे वक्राकार. मग तुम्ही पिंपळाचं पान काढा की चिंचेचं पान काढा.

या पिसाऱ्यात तुम्ही आणखी काहीही काढू शकता. आपल्या मोराला सगळं चालतं. कागद तुमचा, पेन तुमचं, मोर तुमचा आणि चित्रही पूर्णपणे तुमचंच !

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.