Story of Brother in Marathi

Story of Brother in Marathi : भाऊ गोष्ट.

2 min read

Story of Brother in Marathi : दुपारी बाराची टळटळीत वेळ. सकाळचे पेशंट्स बघून झाले होते. डॉक्टरांच्या डिस्पेन्सरीमागेच त्यांचं छोटेखानी हॉस्पिटल होतं. तिथे एकदा राउन्ड मारून मग जेवायला वरती घरी जायचं असा डॉक्टरांचा विचार होता. एवढ्यात शिरू सांगत आला – “सदावर्ते आलाय.” डॉक्टरांच्या कपाळावर लहानशी आठी उमटली. सदावर्ते कसलं काम घेऊन आला असेल कोण जाणे! दंगलग्रस्तांच्या कॅम्पमध्ये मदतकार्य करणाऱ्या सदावर्तेची त्यांना थोडी भीतीच वाटायची.

“त्याला म्हणावं, मी-” एवढं ते म्हणतायेत तोवर सदावर्ते हजर. सदा उत्साही. हसतमुख. “बरे भेटलात!” आल्या आल्या तो गडबडीने म्हणाला- “म्हटलं, जेवायला गेला असलात तर पंचाईत !”

“अजून हॉस्पिटलची राउन्ड व्हायचीय माझी.” डॉक्टर म्हणाले आणि वळले. “थांबा, थांबा. आधी माझं काम तर ऐकून घ्या.” सदावर्ते म्हणाला.

“लवकर बोल.”

“कॅम्पात रोज एक फेरी मारायची. तुमच्या सोयीने कधीही. नाही म्हणूच नका. फार गरज आहे तिथे. लहान मुलं आहेत. बायका आहेत. कुणाला बरं नसेल त्याची तपासणी करायची. थोडी औषधं बरोबर ठेवा. वेगळी काही लागतील, ती नंतर हा शिरू घेऊन जात जाईल.”

“मी नाही जाणार. मला भीती वाटते!” शिरू म्हणाला.

“भीती कसली?”

“ते सगळे मुसलमान आहेत ना?”

“मग ते काय खातात तुला? अरे, आपल्यासारखीच माणसं आहेत ती. तुझ्यासारखी किती तरी मुलं आहेत तिथे. दयनीय परिस्थिती आहे त्यांची. धड खायला नाही, ल्यायला नाही. अंघोळीचे हाल. संडासाचे हाल. दीडदोनशे माणसं कशीबशी राहताहेत जुन्या शाळेमध्ये. त्यांना मदत करायला हवी आपण, तर तूच उलट घाबरतोस? मग डॉक्टर, कधी येता? आज संध्याकाळी ?”

also read : Two calendars and 11 day leaps

“संध्याकाळी ? – माझा दवाखाना कोण समाळेल?”

“हा शिरू आहे ना? तुम्ही नसलात की तुमच्या खुर्चीवरसुद्धा जाऊन बसतो तो!” सदावर्ते हसत हसत म्हणाला. “दवाखाना संपल्यावर या म्हटलं असतं; पण तिथे लाइटची पंचाईत आहे. चाळीस पॉवरचे फक्त चार बल्ब लावलेयत.”

“बरं, आज पाच वाजता येऊन जाईन. आणि रोज सकाळी येत जाईन नऊ वाजता.”

“थैंक यू, डॉक. मला माहीतच होतं, तुम्ही नाही म्हणणार नाही!”

“तुझं परोपकारावरचं लेक्बर ऐकण्यापेक्षा आधीच हो म्हटलेलं बरं! स्वतः नस्ते उद्योग करा न् आम्हाला त्यात गुंतवा.”

सदावर्ते मोठ्याने हसला आणि चालू पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना डॉक्टरांच्या मनात आलं- या सद्यासारखी नसती लचांडं अंगावर ओढवून घेणारी माणसं आहेत म्हणून जग चाललंय.

डॉक्टरांनी दिलेली औषधांची पिशवी घेऊन शिरू कॅम्पकडे चालला होता. याआधी डॉक्टर कॅम्पमध्ये दोनदा येऊन गेले होते. शिरू मात्र आज पहिल्यांदा जात होता. एकट्याने कॅम्पमध्ये जायचं म्हणजे थोडी धाकधूक वाटत होतीच, पण त्याबरोबर कुतूहलही होतं. सदावर्ते म्हणाला होता, तुझ्याच वयाची किती तरी मुलं तिथे आहेत. कशी असतील ती? मुसलमानांची मुलं! पण ती मुसलमानांची आहेत असं आपल्या कधीच लक्षात आलं नाही. या दंगलीनंतर, जाळपोळीनंतरच का आपल्याला ती वेगळी वाटू लागली ?

Story of Brother

कदाचित शिरूदेखील त्या मुलांना वेगळाच वाटला असेल. कारण त्याने शाळेत पाऊल ठेवलं तेव्हा तिथे पकडापकडी खेळणारी मुलं एकदम धावायची थांबली आणि त्याच्याकडे पाहत गप्प उभी राहिली. मग त्यातली दोन-तीन एकमेकांत कुजबुजली आणि सगळीच तिथून पळून गेली.

एक मुलगा मात्र आपणहून पुढे आला. त्याच्या अंगावरचा लेंगा-सदरा भयंकर मळला होता आणि चेहऱ्यावरही डाग पडले होते. केस भुरभुरीत झाले होते. त्याने शिरूला विचारलं,

“क्या चाहिये?”

“औषधं आणली आहेत.” शिरू म्हणाला.

त्या मुलाला चेहरा कोरा राहिला. कदाचित त्याला मराठी समजत नसावं. “दवाई दवाई लाया हूँ। किसको देनेका?”

“सकीना बेन के पास दो। चलो, मैं साथ में आता हूँ।”

शिरू त्या मुलाच्या बरोबर चालू लागला. सकीनाकडे पोहोचायच्या आत त्या मुलाने शिरूला आपली बरीच माहिती दिली. वयाने तो शिरूएवढाच होता. नाव हनीफ. त्याला गुजराती चांगलं बोलता येत असे. कारण दंगलीआधी त्याची बहुतेक मित्रमंडळी गुजरातीच होती. एकजण मराठीसुद्धा होता, पण त्याला मराठी फारसं येत नसे. बोललेलं समजायचं एवढंच. कॅम्पमध्ये हनीफची चाची तेवढी त्याच्याबरोबर होती. बाकी सगळे दंगलीत अल्लाघरी गेले होते. हे सगळं हनीफने डोळ्यांत पाण्याचा टिपूस न आणता सांगितलं. शिरूला त्याचं नवल वाटलं. आपली आई गेली तेव्हा आपण किती दिवस खाणंपिणं बंद करून नुसते रडत होतो ते त्याला आठवलं. त्याने आपलं आश्चर्य हनीफला बोलून दाखवलं. त्यावर हनीफ सहजपणे म्हणाला- “क्या रोनेका? यहाँ सबका ऐसाच है ना?”

also read : Two calendars and 11 day leaps

औषधं खरं तर कॅम्प-इन-चार्ज शेखसाहेबांकडे द्यायची होती; पण शेखने हे काम सकीनाबेन या मध्यमवयीन निर्वासित स्त्रीकडेच सोपवलं होतं. शिरूला पाहून ती क्षणभर स्तब्ध राहिली, पण त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली- “मैं तुझे मुत्रा कहूँ तो चलेगा ना?” शिरूला काय बोलावं ते सुचेना. “ऐसी ही सूरत थी उसकी, बिलकुल तुम्हारे जैसी!” शिरूला आपल्या आईच्या आठवणीने एकदम गलबलून आलं. त्याने विषय बदलला आणि तो औषधांविषयीच बोलू लागला.

औषधांची माहिती करून घेतल्यानंतर सकीनाने शिरूची विचारपूस केली. तो किती वर्षांचा आहे, कधीपासून डॉक्टरांकडे कामाला आहे, घरी कोण आहे… बरंच काही तिने विचारलं. त्याला आई नसल्याचं कळताच ती हळहळली. “लो, खुदा की भी क्या करनी है… कहीं बेटा है तो माँ खो गयी है- कहीं माँ है तो बेटा खो गया है..”

हनीफ शिरूला सोडायला रस्त्यापर्यंत आला, पण भीतभीतच. “आम्हाला कॅम्पच्या बाहेर पडायला मनाई आहे.” तो म्हणाला. “मदत करायला येणारे सांगतात- बाहेर पडायचं तर तुमच्या जबाबदारीवर पडा; नाही तर कोण कुठून येईल आणि तुमच्यावर हल्ला करील याचा नेम नाही.”

शिरूने त्याचा निरोप घेतला आणि तो चालू लागला. एवढ्यात मागून हनीफची हाक आली. “कल भी आओगे ना?” त्याने विचारलं. “जरूर!” शिरूने ओरडून सांगितलं आणि तो निघाला. चालताना त्याला एका विचाराने हसू येत होतं. आपण कॅम्पमधल्या माणसांना घाबरत का होतो? हनीफ तर किती चांगला मुलगा होता! आपणहून त्याने आपल्याशी मैत्री केली. घाबरण्यासारखं काही तर सोडाच, पण परकेपणादेखील त्याच्यात नव्हता.

दुसऱ्या दिवशी खरं तर न जाऊन चालण्यासारखं होतं. औषधांचा बऱ्यापैकी स्टॉक कॅम्पात दिलेला होता, तरीदेखील हनीफला भेटायला काही तरी निमित्त हवं म्हणून शिरूने डॉक्टरांना सांगितलं, “मलेरियाच्या केसेस वाढताहेत कॅम्पात. डास कमी व्हायचं चिन्ह नाही. सकीनाने सांगितलं, की गोळ्या जरा जास्त पाठवा, तशाच पोट बिघडल्यावर घ्यायच्या गोळ्यादेखील.”

also read : Two calendars and 11 day leaps

डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. सदावर्तेने दिलेल्या पैशांमधून त्यांनी औषधं घाऊक प्रमाणावर आणून ठेवली होती, तरीही ती कशी पुरवायची याची काळजी होतीच. मुंबईहून काही औषध कंपन्या औषधं पाठवणार असल्याचं सदावर्तेने सांगितलं होतं. तोवर तरी हा स्टॉक पुरवायला हवा होता. कारण सदावर्ते कितीही हसत हसत बोलला तरी नव्या स्टॉकसाठी पैसे उभे करणं सोपं नव्हतंच.

“औषधं काटकसरीने वापरा, असं सांग तुझ्या त्या सकीनाबेनला. पेपरमिंटांसारखी खाऊ नका म्हणावं, फुकट मिळताहेत म्हणून!” डॉक्टरांनी शिरूला बजावलं. मानेला जोराचा हेलकावा देऊन शिरू पिशवी सांभाळत पळाला.

आज मुलांच्या घोळक्यातून त्यानेच हनीफला शोधून काढलं. त्याला बघून हनीफला इतका आनंद झाला की त्याने ताबडतोब शिरूच्या गळ्यात हात टाकला. “चल, बॅटबॉल खेलते हैं।” तो म्हणाला.

“तेरे पास है बॅटबॉल?” शिरूने विचारलं.

“बॉल इकडेच मिळाला या शाळेत. मैदानाच्या कोपऱ्यात पडला होता. बॅट ढूँढ़ते हैं…”

दोघांनी शाळेच्या आवारात फिरून एक लाकडाची फळी मिळवली आणि क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हनीफने प्रेमाने बॅटिंग शिरूला दिली. (नाही तरी दोघांनी मिळूनच बॅट शोधलेली होती!) पहिलाच चेंडू शिरूने असा काही लगावला की एका बॅटच्या दोन झाल्या; पण फळी तुटल्याच्या आवाजाबरोबर आणखी एक तेवढाच मोठा आवाज झाला. तो होता हनीफच्या कानशिलात बसल्याचा !

“साले हरामी, काफर के साथ खेलता है?” हनीफचा दादा शोभेल एवढा एक पोरगा त्याच्याजवळ पाय फाकवून उभा होता.

“साले इन जल्लादोंने तेरा घर जला दिया- तेरे माँबाप को जलाया- और तू उनके साथ खेलता है? तुझे शरम नहीं आती?” त्याने परत परत हनीफला मारण्यासाठी हात उगारला. मग त्याने शिरूकडे मोर्चा वळवला आणि तो ओरडला- “पुन्हा इथे दिसलास तर बघ ! हड्डीपसली एक करीन! आमच्या पोराशी दोस्ती करतो? हरामखोर!”

शिरू मागे न बघता तिथून पळत सुटला.

दोन दिवस तो कॅम्पवर गेलाच नाही. पण तिसऱ्या दिवशी मात्र डॉक्टरांनी दिलेली औषधं पोहोचवणं भागच होतं. शिवाय मनातून जरी त्या दांडगट मुलाची भीती वाटत असली, तरी हनीफला भेटण्याची ओढ होतीच.

दबकत दबकत तो कॅम्पमध्ये शिरला. तडक सकीनाबेनकडे गेला. त्याने औषधं तिच्या स्वाधीन केली. तिने डॉक्टरांची चौकशी केली. शिरूच्या डोक्यावरून हात फिरवला. मग ओढणीने डोळे टिपले. शिरू आजूबाजूला पाहून तो दांडगट मुलगा कुठे दिसत नाहीये ना याचा अंदाज घेत होता.

Story of Brother

एवढ्यात हनीफ कुठूनसा आला आणि कानात कुजबुजला, “चल लौकर, बाहेर चल!” आणि शिरूला ओढतच बाहेर घेऊन गेला… “तू मनावर नको घेऊस अक्रमचं.” बाहेर जाताच हनीफ म्हणाला.

अक्रम त्याचं नाव ? तो चक्रम वाटला !

“मला म्हणत होता, काफिर लोकांशी बोलायचं नाही. त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत आपल्या जवळच्या माणसांना मारून टाकलं कापरासारखं जाळून टाकलं… घरंदारं पेटवून देऊन आपल्याला निराधार केलं… आता संधी मिळेल तेव्हा आपणही त्यांना मारून, जाळून टाकायला हवं…”

“तू मला मारून जाळून टाकशील?”

“मी नाही रे… अक्रम काय म्हणत होता हे सांगितलं. पण मी ऐकणार नाहीच त्याचं. आपण आता दोस्त झालो आहोत. मी कसा राहीन तुझ्याशी बोलल्याशिवाय ?”

यावर शिरू काही तरी बोलणार होता- पण बोलूच शकला नाही… कारण त्याच क्षणी त्याच्या डोक्यावर एक जोराचा फटका बसला. त्याच्या डोळ्यांसमोर तारे चमकले आणि तो खाली कोसळला.

हातातल्या लाकडी फळकुटाने अक्रम त्याला मारतच सुटला होता. हनीफने मध्ये पडायचा प्रयत्न केला; पण अक्रमच्या बरोबरच्या मुलांनी त्याला खेचून दूर ढकलून दिलं. एवढ्यात सकीना रडत ओरडत आली आणि तिने स्वतःला शिरूच्या अंगावर लोटून दिलं. मग अक्रमला हात आवरता घ्यावा लागला. सदावर्ते आणि त्याचे मित्र याच वेळी रिक्षातून उतरत होते. काही तरी गोंधळ चालला आहे असं दिसताच दंगलखोर कॅम्पात शिरले असं वाटून ते घाबरले नि धावत-पळत येऊन पोहोचले, तो त्यांना दिसले, हात उगारलेला अक्रम आणि खाली पडलेला शिरू…

also read : Two calendars and 11 day leaps

सदावर्ते शिरूला घेऊन दवाखान्यात आला, तेव्हा डॉक्टर पुन्हा दंगल सुरू झाली की काय, अशा शंकेने चरकले.

शिरूच्या जखमा तशा किरकोळ होत्या. खाली पडताना एक-दोन ठिकाणी मुका मार लागला होता. मुख्य जखम होती ती डोक्याला. लोकल अॅनेस्थेशिया देऊन डॉक्टरांनी त्या जखमेला चार टाके घातले.

संध्याकाळपर्यंत शिरूला हुशारी वाटू लागली. त्याने डोळे उघडले. सदावर्ते त्याच्या बिछान्याशी बसून होता. बहुधा तो दिवसभरच तिथे बसून असावा. पलिकडेच डॉक्टर तावातावाने बोलत होते- “यासाठी मी पहिल्यापासून शिरूला कॅम्पवर पाठवायला तयार नव्हतो. तर तुझा आग्रह पडला! म्हणे त्यांना मदतीची फार गरज आहे! घ्या! आता आम्हाला मदत कोण करणार?”

जडावलेल्या डोक्याने, अर्धमिटल्या डोळ्यांनी, बधीर झालेल्या कानांनी शिरू ऐकत होता. जे ऐकू येत होतं ते खरं असूनही स्वप्नातल्यासारखं वाटत होतं.

“मी माहिती काढलीय त्या मुलाची.” सदावर्ते म्हणाला. “अक्रम त्याचं नाव. त्याची अम्मी, त्याचे अब्बा, त्याचे दोन भाऊ, बहीण अशा सगळ्या कुटुंबाला गल्लीमधल्या कोरड्या विहिरीत फेकलं गेलं. वरून पेट्रोल ओतून जळते बोळे टाकून त्या जिवंत माणसांना पेटवण्यात आलं. आणि हे कोणी केलं- तर त्यांच्या शेजारच्या हिंदू कुटुंबाने – तुम्हाला आसऱ्याला नेतो, असं सांगत घराबाहेर काढून. त्या गर्दीगोंधळात अक्रम कसाबसा वाचला; पण काय झालं ते त्याने झुडुपाआड लपून आपल्या डोळ्यांनी पाहिलं. कोणी केलं तेही पाहिलं. तेव्हापासून तो असा सैरभैर झालाय. अगदी एकटाच उरलाय तो. अनाथ, निराधार ! दुःख आणि संताप याशिवाय दुसरं काहीच उरलं नाहीये त्याचं स्वतःचं असं.”

“अरे, पण म्हणून काय त्याने आपल्यासाठी औषध घेऊन आलेल्या पोरांच्या अंगावर हात टाकायचा?”

“बिलकूल नाही. ते त्याचं चुकलंच. अगदीच चुकलं. कारण एकमेकांचा सूड घेत राहून काहीच साधणार नाही… पण हे त्याला कुठे समजतंय? आधीच पोरवय आहे त्याचं. त्यातून त्याच्या शेजारातल्या, त्याच्या दोस्तांनीच त्याच्या कुटुंबाचा घात केलाय. म्हणून सूडाच्या भावनेने पेटलाय तो… पण आपण त्याला शांत केलं पाहिजे. त्याचा राग धरता कामा नये. कारण तो लहान आहे. आता काळजी घेतली पाहिजे ती या मुलांची. त्यांच्या मनात सूड घेण्याची, अत्याचार-अन्याय करण्याची भावना रुजता कामा नये. उगवली असेल तर ती आत्ताच उपटून काढून टाकायला हवी…”

शिरू ऐकत होता. त्यातलं सगळंच त्याच्या कानांत शिरत होतं असं नाही. शिरत होतं त्यातलंही सगळं समजत होतं, असं नाही. पण थोडंफार कळत होतं. विचार करता करता त्याच्या डोळ्यांवर गुंगी येत होती.

तो गुंगीत असतानाच कधी तरी डॉक्टर निघून गेले.

एका चमत्कारिक स्वप्नातून तो जागा झाला आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा सदावर्ते निघण्याच्या गडबडीत होता. त्याला थांबवून घेत शिरू म्हणाला- “काका, आपण इतके वाईट आहेत का हो?”

“नाही बेटा. असं का म्हणतोस तू?” सदावर्तने विचारलं.

अक्रमच्या कुटुंबाला विहिरीत ढकलून पेटवून देणारे आपले लोक होते… कॅम्पमधल्या सगळ्याच मुलांचं कोणी ना कोणी गेलंय ते आपल्याच माणसांनी केलेल्या जाळपोळीत, भोसकाभोसकीत. म्हणाजे हा आपल्याच लोकांचा क्रूरपणा झाला, नाही का?”

also read : Two calendars and 11 day leaps

“नाही बेटा. माणसं म्हणून आपण क्रूर नाही. तेही क्रूर नाहीत. इतकी वर्ष आपल्या या शहरातून या दोन्ही जमाती एकत्र राहत आहेतच ना? एकमेकांकडे जाताहेत, जेवताहेत, एकमेकांच्या अडचणीला उपयोगी पडताहेत, एकमेकांशी दोस्तीने वागताहेत.. मग आताच ते एकमेकांच्या जिवावर कसे उठले? त्यांची डोकी अशी एकदम कशी भडकली? ती भडकली नाहीत, भडकवली गेली… ज्यांचा त्यात फायदा आहे अशा माणसांनी, या देशात आपलाच धर्म टिकायला हवा असं ज्यांना वाटतं त्यांनी.”

“म्हणजे कोणी?”

“राजकारण्यांनी. पण ते तुला इतक्यात समजायचं नाही. फार गुंतागुंतीचं असतं राजकारण. ते तुला मोठं झाल्यावरच समजेल. मोठं झाल्यावरही समजेलच असं नाही. म्हणून आता तू एवढंच लक्षात ठेव, की हनीफ, अक्रम ही तुझ्यासारखीच मुलं आहेत; पण अचानकपणे सर्वस्व गेल्यामुळे चिडलेली, भांबावलेली. त्यांना शांत करण्याचं काम आपलं आहे. त्यांच्याशी दोस्ती करून त्यांचा गेलेला विश्वास परत मिळवण्याचं काम आपलं आहे….”

“हनीफची माझ्याशी दोस्ती झालीये, पण अक्रम त्याला माझ्याशी खेळू देत नाही. पाहिलं ना किती मारलं त्याने मला ? चक्रमच आहे तो !”

सदावर्ते नुसता हसला आणि निघून गेला. दोन-तीन दिवसांनी शिरूचं अंग दुखणं थांबलं. डाव्या डोळ्याभोवतीचं काळंही कमी झालं. डोक्याची जखम भरून वेऊ लागली. दवाखान्यातली कामंही तो हळूहळू करू लागला. या दिवसांत त्याला हनीफची फार आठवण यायची. चार-दोन भेटीतच तो त्याचा अगदी जवळचा मित्र होऊन गेला होता. अर्थात या मैत्रीची किंमत दोघांनाही चुकती करावी लागली होती, तरीदेखील हनीफला भेटावं असं शिरूच्या मनात येई. पण कॅम्पमध्ये जायचं कसं? अक्रमच्या आठवणीनेही त्याला धडकी भरत असे. मग हनीफ तरी मुद्दाम इथे येऊन भेटण्याचे धाडस कसं करील? त्यातून त्यांनी तर कॅम्पबाहेर पडणंच धोक्याचं होतं म्हणे….

आणि एके रात्री चमत्कारिकच प्रकार घडला. अकराचा सुमार होता. दवाखान्यातील सगळं काही जागच्या जागी आहे का, कपाटं बंद आहेत ना बगैरे बघून शिरूने तिथेच पधारी टाकली आणि तो आता उशीवर डोकं ठेवणार एवढ्यात बेल वाजली. पाठोपाठ सदावर्तेचा घाबराघुबरा आवाज आला “डॉक्टर- लौकर दार उघडा. इमर्जन्सी आहे…”

शिरूने घाईघाईने दार उघडलं. दारात सदावर्ते आणि त्याचा एक सहकारी उभा होता. पाठीमागे रिक्षा होती. तिच्यातही कुणी तरी असावं. सदावर्ते म्हणाला, “आधी डॉक्टरांना उठव. म्हणावं, फुड पॉयझनिंगची केस आहे. तोवर आम्ही त्या तिघांना हॉस्पिटलमध्ये हलवतो… किल्ल्या कुठायत ते मला माहितेय. तू आधी पळ.”

शिरू एका वेळी दोन पायऱ्या ओलांडत बर पळाला. डॉक्टरांना उठवून घेऊन आला. तोवर सदावर्तेने हॉस्पिटल उघडून तीन खाटांवर तिघांना झोपवलं होतं. सदावर्तेला पाहताच डॉक्टर ओरडले “कॅम्पातली आहेत ना ही पोरं? आधी त्यांना बाहेर काढा! मला नसती भानगड नकोय!”

“बाहेर काढून ती जाणार कुठे?” सदावर्ते म्हणाला. बिचारी उलट्या-जुलाबांनी हैराण झाली आहेत.. कॅम्पात काहीतरी खाई- त्याचा त्रास झालाय बऱ्याच लोकाना. त्यात या तिघांची परिस्थिती फारच बाईट आहे. म्हणून त्यांना घेऊन आलो.. पोटात पाणीसुद्धा ठरत नाहीये त्यांच्या. शुद्ध जात चाललीय. हाच दवाखाना त्यातल्यात्यात जवळ म्हणून-“

“सरकारी दवाखाना-“

“तिथे त्यांना उभंसुद्धा करणार नाहीत!”

“अरे, पण हे लफड्याचं प्रकरण आहे.. उद्या मी त्यांच्यावर उपचार केल्याचं कळलं तर माझा दवाखाना जाळून टाकतील…”

“प्लीज डॉक्टर-” सदावर्ते गयावया करू लागला. “हा मुलगा क्रिटिकल आहे. दांडगटपणाने त्याने दोघांतिघांच्या वाटचे कबाब खाल्लेत.” ही तीन पोरं मेली तर तुमच्यावर हत्येचं पातक येईल… एक माणुसकी असलेला डॉक्टर म्हणून-“

“बरं बरं- जास्त नाटक करू नकोस… आता सिस्टर घरी गेली…”

“मी करीन सर सगळं-” शिरू म्हणाला. आणि एकदम एक गोष्ट लक्षात येऊन तो दचकला. त्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं.

“हा अक्रम आहे डॉक्टर ! मला मारणारा!” शिरू म्हणाला.

रात्र भयंकर गेली. पहाटेपहाटेपर्यंत दुसरी दोन मुलं गाढ झोपी गेली. अक्रम मात्र आचके देत होता. त्याचं अंगही मधून मधून थंड पडत होतं. त्याला अतिशय थकवा आला होता. डॉक्टरांनी त्याला सलाइन लावलं ‘आणि त्याच्यावर लक्ष ठेवा, काही कमीजास्त व्हायला लागलं तर मला हाक मारा,’ असं सांगून ते झोपण्यासाठी वर निघून गेले. सदावर्तेच्या बरोबरचा माणूस तिथेच एका बाकड्यावर आडवा झाला.

“तू झोप शिरू. मी ठेवतो त्यावर लक्ष.” डुलक्या देणाऱ्या शिरूला सदावर्ते म्हणाला.

“नको. मला नाही आली झोप.”

ते एवढं बोलताहेत तोच दारावर थापा ऐकू आल्या. दोघांनीही दचकून एकमेकांकडे पाहिलं.

पाठोपाठ शब्द आले- “दार उघडा. डॉक्टर आहेत का घरात?”

तोंडातून अवाक्षर न काढता शिरू जागचा उठला. झोपलेल्या दोघा मुलांना त्याने हलकेच उठवलं. त्यांना काहीच समजत नव्हतं. शिरूने त्यांना आपल्यामागून येण्यास सांगितलं. जवळजवळ झोपेतच चालत ती मुलं त्याच्या मागून गेली. शिरूने पाठीमागचं दार उघडलं. हळूच बाहेर डोकावून चाहूल घेतली. अजून उजाडलं नव्हतं. बाहेर माणसं नव्हती. तो मुलांना घेऊन बाहेर पडला. समोरच्या चाळीत गेला. तळमजल्यावर मेहतांचं घर होतं. त्याने हलकेच टकटक केलं. मंजूबेनने दरवाजा उघडला. ‘या दोघांना तुमच्याकडे झोपू द्या’ एवढंच सांगून त्याने मुलांना आत ढकललं आणि तो हॉस्पिटलमध्ये परतला.

also read : Two calendars and 11 day leaps

मंजूबेनला काहीच समजलं नव्हतं, पण तिने मुलांना आत घेतलं, दरवाजा लावला. शिरू कसल्या तरी अडचणीत आहे हे तिने जाणलं होतं. सध्याचे दिवसच असे होते, की अधिक स्पष्टीकरण द्यायला-घ्यायला सवडच नसायची.

शिरू परतला तेव्हा अक्रम एकटाच तळमळत पडला होता. डॉक्टर आणि सदावर्ते पुढच्या दाराशी गेले होते. त्यांच्या अंगावर वसावसा ओरडणाऱ्यांचे आवाज ऐकू येत होते. पण हे अजून बाहेरच कसे? बहुधा डॉक्टरांनी वरून खाली यायला जाणूनबुजून वेळ लावला असावा आणि सदावर्तेने तोवर खिंड लढवली असावी. दाराजवळच्या जाळीमधून बहुधा त्या माणसांच्या हातातल्या मशालींचा धगधगता उजेड दिसत होता.

मग ते एकदम आत घुसले. चौघेजण होते. त्यांचे चेहरे मशालींच्या उजेडात भयानक दिसत होते. “खेचून काढतो त्यांना हॉस्पिटलातून ! मुसलमानांना लपवता काय? कुठे फेडाल हे पाप?” वगैरे गर्जना ते करत होते. त्यांच्याबरोबर डॉक्टर आणि सदावर्ते ‘अहो, पण खरंच सांगतो तुम्हाला इथे कुणी आलं नाही की गेलं नाही.. उगाच संशय घेताय तुम्ही-‘ असं गयावया करत सांगत होते.

“इथे सापडूच देत ती पोरं- नाही हॉस्पिटल पेटवलं तर बघा!” ते ओरडले.

अक्रम भीतीने थरथर कापत होता. तो पूर्ण शुद्धीवर होता, पण डोळे उघडून बघायचं धैर्य त्यांच्यात नव्हतं. शिरू त्याच्या खाटेवर बसला होता आणि त्याचे दोन्ही थरथरणारे हात त्याने आपल्या हातांनी गच्च पकडून ठेवले होते.

त्या चौघांनी खोलीभर नजर टाकली. कोपऱ्यातल्य कॉटवर एक रोगी मुटकुळं करून पडला होता. बाकीच्या खाटा मोकळ्या होत्या.

“तिघं होते. असा रिपोर्ट आहे!” एकजण म्हणाला. “फुड पॉयझनिंग झालेले!”

“तुम्हाला काय सेवा करायची ती कॅम्पात जाऊन करा, समजलं?” दुसरा डॉक्टरांवर खेकसला. “इथे हॉस्पिटलमध्ये वगैरे आणून जास्त लाड केलेत न त्यांचे, तर आमच्याशी गाठ आहे!” डॉक्टर यावर काहीच बोलले नाहीत.

“हा कोण आहे?” अचानक अक्रमवर बोट रोखून एकाने विचारलं.

“ते तिघं आहेत.” दुसरा पुटपुटला.

“तू चूप! मी विचारतोय… हा कोण आहे?”

“माझा भाऊ.” शिरू म्हणाला. “पंढरपूरहून आलाय. मलेरिया झालाय त्याला. थरथरतोय बघा कसा… हीव भरलंय ना!” त्याचे हात अधिकच घट्ट पकडून ठेवत शिरू म्हणाला.

“हा पोरगा कोण आहे?”

“इथे वरच काम करतो.” डॉक्टर म्हणाले. “ड्रेसिंग-बिसिंगला पण मदत होते त्याची. श्रीकांत नाव त्याचं. आम्ही शिरू म्हणतो. दोन दिवसांपूर्वीच त्याचा हा भाऊ आला.”

“जगन त्याचं नाव.” शिरू म्हणाला. “आला न् लगेच आजारी पडला.”

“नक्की?” पहिला रोखून पाहत म्हणाला.

“आपलाच आहे रे तो.” दुसरा म्हणाला. “कपाळावर गंध आहे बघ.”

इथली खात्री झाल्यावर ती मंडळी दुसऱ्या खोल्या बघायला गेली. त्यांच्याबरोबर डॉक्टरदेखील.

सदावर्ते अजून घुटमळत होता. त्याला कसली तरी शंका आली होती. शिरूचा हात उचलून रक्ताळलेलं बोट पाहत त्याने विचारलं, “हेच जगनचं गंध ना?”

also read : Two calendars and 11 day leaps

शिरू हसला. सदावर्तने त्याच्या बोटाला बँडेड लावलं आणि बाजूला पडलेली ब्लेड गंजलेली नाही ना याची खात्री करून घेतली.

अक्रम खोल आवाजात पुटपुटत होता- “मुझे डर लगता है… बहुत डर…”

“डरायचं नाही भाऊ. आम्ही आहोत ना!…. शिरू त्याच्या कानाशी लागून बोलला.

अक्रमने त्याला एकदम मिठीच मारली. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.