Story of Brave on a Bicycle

Story of Brave on a Bicycle in Marathi : सायकलवरचे बहाद्दर गोष्ट.

1 min read

Story of Brave on a Bicycle : बहिणीसोबतची त्या दिवशीची सायकल ट्रिप माझ्या कायमची लक्षात राहील असं आधी डोक्यातही आलं नव्हतं.

त्या दिवशी रविवार होता. आधीचे दोन दिवस सुट्टी आल्यामुळे मी घरी बसून कंटाळलो होतो. पाऊस तीन-चार दिवसांपासून वेड्यासारखा कोसळत होता. सगळ्या मैदानात चिखल झाला होता, नाही तर आत्तापर्यंत मी अर्ध्या वर्गाला ग्राऊंडवर खेळायला जमा केलं असतं.

मी अवनीला, म्हणजे बहिणीला म्हटलं, “अवू, पाऊस थांबलाय. सायकलींवर भटकायला जाऊ या?”

अवनी जरा घरकोंबडी टाइपची आहे. त्यामुळे ती उलटसुलट प्रश्न विचारणार हे मला माहीत होतं.

“का?” तिने विचारलंच.

“कारण घरात बसून कंटाळा आलाय.”

“टेरेसवर जाऊन बस मग.”

“माझ्या पायांना हालचाल करायची आहे.”

“माकडउड्या मार!”

“उड्या नाही, पायडल मारणार. चल चुपचाप…” असं म्हणून मी तिला ओढत घराबाहेर काढलं.

बाहेर आल्यावर मात्र तिची कळी खुलली. आम्ही सायकली घेतल्या आणि गेट उघडून निमुळत्या रस्त्यावरून खाली सोडल्या. उतार असल्यामुळे थोडा वेळ पायडल मारायचं काम नव्हतं. रस्त्यावर जागोजागी खड्डे होते अन् त्यांत पाणी साचून डबकी बनली होती. ती चुकवत जायला मजा येत होती.

Story of Brave on a Bicycle

थोडा वेळ असंच नुसतं भटकल्यावर अवनी म्हणाली, “अर्णऽव, कॅनॉलवर जाऊन बघायचं का? पाणी आलं असेल तर?”

“तो कोरडाच तर असतो नेहमी.”

“जाऊन तर बघू…”

“बरं, चल.”

आम्ही कॅनॉलच्या दिशेने सायकली वळवल्या. वातावरण मस्त होतं. ओल्याचिब रस्त्यावरून आमच्या सायकली गरगर धावत होत्या. हवा भरभर वाहत होती, कानांत सरसर घुसत होती. नजर जाईल तिकडे हिरवंगार दिसत होतं. सगळीकडे गारेगार झालं होतं.

Also Read : Story of Same Breakfast Again!

“अवू, तुला माहीत आहे का, की पावसाचा पहिला थेंब शिंपल्यात पडला तर त्याचा मोती बनतो.”

“म्हणतात असं, पण सायंटिफिक प्रूफ नाही याला.”

“आभाळ गडगड करतं तेव्हा आजीबाई पीठ दळते असं म्हणतात.” मी

“हो.” अवनी हसून म्हणाली, “छोटा पाऊस गुदगुल्या करतो आणि मोठा टोचतो !”

“ते कसं काय?” मी विचारलं.

“अरे, धुकं असतं ना, ते सॉफ्ट असतं आणि जोरात पाऊस आला की थेंब टोचतात.”

“बरोबर. पण असं का होतं?”

“धुकं दमटपणा वाढल्यामुळे तयार होतं. मग त्याचे थेंब खूप छोटे बनतात. त्यांचा वेगही खूप कमी असतो. पावसाच्या थेंबांचा वेग त्यापेक्षा दुपटीहून जास्त असतो, प्रति तास ५ ते १५ मैल, म्हणून होतं असं…”

“जय हो ज्युनिअर आइन्स्टाईन!” मी हात जोडायला सायकलचं हॅन्डल सोडलं. तोल जाऊ लागला म्हणून पटकन पकडलं. अवनी खीः खीः करत हसली.

Story of Brave on a Bicycle

आम्ही बाजारातील फळांची अन् भाज्यांची दुकानं मागे टाकत चाललो होतो. सगळी दुकानं प्लास्टिकच्या कापडांनी झाकलेली होती. काही दुकानं नुकतीच उघडली होती. रस्त्याने धावणाऱ्या गाड्या सगळीकडे पाणीच पाणी उडवत होत्या; पण त्याआधीच आम्ही बाजूला झालेलो असायचो.

गावाबाहेर पडल्यावर थोड्या अंतरावर जुना कालवा होता. दूरवरूनच दिसलं की बरीचशी माणसं आणि छोटी मुलं कालव्याच्या काठावरून खाली बघताहेत. आम्ही भुर्रकन तिथे पोहोचलो. कालव्यात पाणी आलं होतं, पण ते जास्त खोल नव्हतं.

also read : Story of Same Breakfast Again!

“अवू, हे पाणी कुठून आलं असेल?” मी विचारलं.

“नदीतून. मी एकदा सोनूसोबत…”

“सोनू… म्हणजे ती कार्टून नेटवर्क का?”

“हो, तीच. तिच्यासोबत कोरड्या कालव्यातून लांबपर्यंत भटकून आले होते.”

“खरंच?”

“हो. पण कालव्याचं टोक बंद केलेलं आहे. नदी जर काठाच्या बाहेर ओसंडून वाहू लागली तरच पाणी कालव्यात येऊ शकतं.”

म्हणजे आज नदीला पूर आल्यामुळे कोरड्या कालव्यातही पाणी आलं होतं तर!

पावसाची पुन्हा भुरभुर सुरू झाली होती, पण आम्ही कुरबूर केली नाही. कालव्यावरच्या पुलाच्या कठड्यावर रेलून आम्ही खालच्या पाण्याकडे बघत उभे होतो. पाणी हळूहळू वाढत होतं. ते किती वाढणार हे बघण्यासाठी तिथे जमलेल्या इतरांसारखे आम्ही पण उत्सुक होतो.

बऱ्याच वर्षांपूर्वी नदीतील पाणी शेतात आणण्यासाठी हा काँक्रीटचा मोठा कालवा बांधला गेला. पुढे तो जुना झाला, त्यामुळे पाण्याची दुसरीकडून व्यवस्था केली गेली. गाव वाढलं तेव्हा कालव्यातून मोठमोठे पाइप्स टाकले गेले. त्यावर भराव टाकून इकडून तिकडे जायला तात्पुरते रस्ते तयार केले गेले.

काही मुलं पाण्यात काड्या फेकत होती. त्या काड्या हेलकावे घेत, गोल गोल फिरत दूरवर निघून जात होत्या. बघायला मजा येत होती. पुराच्या पाण्याने बराच कचरा आणि दूरवरून काहीबाही वस्तूही वाहत आणल्या होत्या. पाणी वरवर चढत होतं. त्याचा वेग हळूहळू वाढत चालला होता. कालव्यातले मोठमोठे पाइप आता पाण्याखाली गेले होते. पाइपांवरचे कच्चे रस्ते तर केव्हाच वाहून गेले होते.

आम्ही हे सगळं बघत होतो तोच कसला तरी गोंधळ ऐकू आला. आम्ही वळून पाहिलं. लोक धावत होते. आम्ही पण सायकली वळवल्या आणि पुढे गेलो. नजर कालव्यावरच खिळलेली होती. आणि एक क्षण ते मला दिसलं. ते बघताच मला धक्काच बसला. गरगरत वाहणाऱ्या त्या पाण्यात मधूनच एका छोट्या मुलाचं तोंड पाण्याबाहेर आलं आणि परत गटांगळ्या खात पुढे निघून गेलं. थोडा वेळ पाण्याखाली जाऊन त्याचं तोंड परत वर येत होतं. तो मुलगा वेगाने वाहत पुढे चालला होता.

अवनीने पटकन काही तरी विचार केला. तिने भरभर पायडल मारलं. धावणाऱ्या लोकांना बघता बघता मागे टाकून ती कालव्याच्या कडेकडेने पुढे जाऊ लागली. बहुतेक तिला त्या मळकट पाण्यात वाहणाऱ्या मुलाच्या पुढे जायचं होतं. पण याचा काय फायदा होता? मला कळेना. पण तरी मीसुद्धा वेडंवाकडं धावणाऱ्या लोकांमधून कशीबशी वाट काढत तिच्या मागे गेलो.

मी बघितलं, तर पाण्यातला मुलगा मोठ्ठ्या पाइप्समध्ये गडप झाला आणि मी कच्च्या रस्त्याला लागेपर्यंत दुसऱ्या बाजूने बाहेर आला… फिरत, गरगरत. पाऊस आत्ता वाढला होता. अवनीच्या शब्दांत सांगायचं, तर टोचू लागला होता. थोड्या वेळापूर्वी घरातून बाहेर पडायला तयार नसणारी अवनी आता बरीच पुढे निघून गेली होती. माझ्या पुढे आणि पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या मुलाच्याही पुढे. ती चिखललेल्या रस्त्यावरून जास्तीत जास्त वेगात सायकल पळवत होती. तिचा काय करायचा विचार होता कळत नव्हतं.

also read : Story of Same Breakfast Again!

आम्ही दोघांनी मुख्य रस्ता केव्हाच सोडला होता. पाण्याने भरून वाहणारा कालवा दूरपर्यंत गेलेला दिसत होता. चिखलमाखल्या कच्च्या रस्त्याने आम्ही सुसाटत निघालो होतो. हा जुना रस्ता मुख्य रस्त्याच्या खालून वळसे घालून गेला होता. कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज आता अधिक जोरात येऊ लागला. पावसाने आणखी जोर धरला. अवनी अजूनही माझ्या पुढेच होती. तिचा वेग आणखी वाढला. अचानक तिने सायकल रस्त्याच्या बाजूला वळवली. तिथे रस्ता नव्हताच. तिची सायकल उतारावरील दगडाधोंड्यांवर ठेचकाळत खाली उतरायला लागली. मी मोठ्याने आवाज दिला, पण ती थांबली नाही. थोडं पुढे गेल्यावर एक लहान नाला लागला. अवनी सायकलच्या सीटवरून उठली आणि तिने हँडल वर उचललं. क्षणार्धात सायकलने नाल्यावरून पलीकडे झेप घेतली. आता समोर कालव्यावरचा जुना पूल होता. अवनीने जोरात ब्रेक मारला आणि उडी मारत आधी सायकल बाजूला फेकली. पाठोपाठ तिने सायकल उचलली आणि जुन्या पुलाच्या कठड्यावर वाकून पाण्यातून वाहत येणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्ठ्या ढिगावर फेकली. त्यामुळे पाण्यातून वाहणारा कचऱ्याचा ढीग किंचित दिशा बदलून सायकलसकट पाइपांच्या मध्ये अडकला. त्यानंतर दोन सेकंदांतच तो मुलगा वाहत आला आणि कचऱ्याचा ढीग व त्यात अडकलेल्या सायकलवर येऊन आदळला.

मी अवनीला आवाज देणार तेवढ्यात दुरून गर्दीचा आरडाओरडा ऐकू आला. ती आमच्या शाळेतलीच मुलं होती. काहीजण सायकलींवर तर काही पळत मोठ्यपिक्षा लवकर पोहोचले होते. सगळेजण कच्चा मला उतरून खाली धावत आले. मग आम्ही एकमेकांचा हात पकडून नाला पार केला आणि जुन्या लाजवळ पोहोचलो.

कालव्यातलं पाणी मोठ्याने आवाज करत आणि संकिदीने सायकलच्या अडथळ्यावर आदळत होतं. मृगु सगळ्यात तो मुलगा ओरडत होता, पाणी तोंडात गेल्यामुळे खोकत होता, कसाबसा श्वास घेत होता, मदतीसाठी हाका मारत होता.

आम्ही काय करू शकत होतो? कुणाकडेच दोर नव्हता. खाली उतरायचं म्हटलं तर पाइप बराच दूर होता. घाई करावी लागणार होती, कारण पाणी वाढत चाललं होतं. वेगाने वाहणाऱ्या पाण्यासमोर कचरा आणि सायकल फार वेळ टिकाव धरू शकले नसते.

तेवढ्यात एकाला कल्पना सुचली. सर्वांनी आपापले शर्ट काढून एकमेकांना बांधले. त्याचा एक छोटा दोर तयार झाला. एक मुलगा हिंमत दाखवून पुलाच्या काँक्रीटच्या खांबाचा आधार घेत थोडं खाली उत्तरला. दुसऱ्याने त्याचा हात धरला आणि तो पण खाली उतरला. मग तिसरा पुढे झाला. असं करत करत बघता बघता मानवी साखळी तयार झाली. सर्वांत पुढे असलेल्या मुलाने कापडी दोर पाण्यात फेकला; पण पाण्यातल्या मुलाने दोन्ही हातांनी सायकलच्या स्पोकमध्ये अडकलेल्या झाडाच्या एका फांदीला पकडून ठेवलं होतं, ते सोडून चार-पाच हातांवर गटांगळ्या खाणाऱ्या दोरीला पकडण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तो खूप घाबरलेला होता. एकेक क्षण महत्त्वाचा होता. मी अवनीकडे पाहिलं. ती मुलाला दोर पकडण्यासाठी ओरडून सांगत होती; पण फायदा होत नव्हता.

also read : Story of Same Breakfast Again!

अखेर मीच निश्चय केला आणि बजरंगबलीचं नाव घेऊन पाण्यात उडी मारली. तीन-चार झेपांतच मी मुलाजवळ जाऊन पोहोचलो. मला बाबांनी पोहायला शिकवलं होतं. गावाकडच्या नदीमध्ये मी भर पावसात बऱ्याचदा पोहलो होतो. यामुळे काही वेळा मला बोलणीही खावी लागली होती. पण आत्ता त्याचा उपयोग झाला होता. मी मुलाला हाताला धरून ओढलं. एका हाताने त्याला पकडलं आणि दुसऱ्या हाताने दोरी. आतापर्यंत काठावर दोन-तीन मोठी माणसंही पोहोचली होती. त्यांनी पूर्ण ताकदीने आम्हाला बाहेर ओढायला सुरुवात केली. तो मुलगा अजूनही ओरडत होता. त्या आवाजाने माझ्या कानांचे पडदे फाटायची वेळ आली. लोक ओढत असले तरीही पाण्याला कापून पुढे सरकणं सोपं नव्हतं. पाण्याला जोर होता. झाडांच्या फांद्या, छोटामोठा कचरा येऊन अंगावर आदळत होता; पण हात-पाय मारत, झटापट करत कसाबसा मी पुढे सरकलो. एका माणसाने माझा हात पकडला अन् वर खेचलं. लवकरच आम्ही दोघं पाण्याबाहेर आलो.

कुणी तरी मुलाला गाडीवर बसवून दवाखान्यात नेलं. तो घाबरला होता आणि त्याला बरंच लागलं होतं. माझ्याही पाठीला थोडं खरचटलं होतं, पण मला त्याची चिंता नव्हती. सर्वांनी माझ्या अन् अवनीच्या नावाने जल्लोष करायला सुरुवात केली होती. टाळ्या आणि शिट्ट्या वाजू लागल्या. अवनी माझ्या शेजारी येऊन उभी राहली. थंडीने काकडत होती ती.

“चल अवनू, घरी जाऊ. गरमागरम पाण्याने अंघोळ केल्याशिवाय तुझी थंडी काही जाणार नाही. बैस मागे. डबलसीट जाऊ.” मी तिला म्हटलं.

“अर्र…” अवनी तिचं तोंड पुसत म्हणाली.

“काय?”

“माझी सायकल पाण्यात गेली. आता बाबा रागावतील का?”

“वेडी आहेस की काय? तू केलंस ते बाकी कुणालाही सुचलं नसतं. दुसऱ्याला वाचवण्यासाठी एवढं कोण करतं? हीच खरी सुपरपॉवर आहे. उलट, खूष होतील बाबा आणि याहून भारी सायकल घेऊन देतील तुला.”

also read : Story of Same Breakfast Again!

अवनी खुदकन हसली आणि टुणकन उडी मारून माझ्या सायकलवर मागे बसली. चिंब भिजलेले आम्ही दोन सायकलस्वार हसत-खिदळत, थंडीने कुडकुडत घराच्या दिशेने निघालो.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.