Story of Bicycle Man in Marathi

Story of Bicycle Man in Marathi : पक्चरवाला गोष्ट.

1 min read

Story of Bicycle Man in Marathi : पक्चरवाला गोष्ट.

एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं… आणि कळत गेलं की आमच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यालगत एका कोपऱ्यावर एक नवा पंक्चरवाला अवतरला आहे. आम्हा मित्रांसाठी ही मोठीच गुड न्यूज होती. कारण एरवी आम्हाला सायकलींचं पंक्चर काढायला बरंच दूर जावं लागायचं. सायकल पंक्चर होणं ही आमच्या आयुष्यातली अगदी नियमित घटना होती आणि त्यामुळे खेळण्याचा वगैरे अगदी मोलाचा वेळ सायकलचं पंक्चर काढण्यात वाया घालवावा लागत असे. त्यात पंक्चर झालेली सायकल प्राण गेल्यासारखी जड होत असे आणि तिला ओढत खेचत घेऊन जाणं हे भलतंच जिवावर येत असे.

त्यामुळे घराजवळ पंक्चरवाला येणं म्हणजे देवदूत आल्यासारखंच आम्हाला वाटलं होतं.

मित्राला म्हटलं, “चल, जाऊन येऊ यात पंक्चरवाल्याकडे. कोण आहे बघून येऊ. सकाळी तो केव्हा येतो, केव्हापर्यंत थांबतो वगैरे चौकशी करून ठेवू. नाही तर आपण याच्या भरवशावर राहायचो नि सायकल पंक्चर झाल्यावर ऐन वेळी हा गायब असायचा!”

आम्ही सायकली काढल्या. निघालो. पाच मिनिटं सायकल चालवली नसेल तर रस्त्याच्या कडेला पंक्चरवाला दिसलाच. जमिनीवर एक पोतं टाकून तो त्यावर बसला होता. ना त्याच्या डोक्यावर छत्री, ना छप्पर, ना झाडाची सावली. टळटळीत उन्हात तो एकटाच बसला होता. समोर पंक्चर जोडणीचं जुजबी सामान आणि बाजूला एक पत्र्याची जुनाट पेटी एवढाच त्याचा संसार होता. पेटीच्या पलीकडे पाण्याने भरलेलं एक घमेलं. गरीबडं दुकान होतं त्याचं.

आम्ही गेलो त्याच्याकडे. त्याच्याशी ओळख व्हावी म्हणून बळंच त्याला हवा भरायला सांगितलं. त्याने लगेच पंप काढला आणि हवा भरून दिली. खांद्यावर टाकलेलं फडकं घेऊन सायकलची रीम हातोहात साफ करून टाकली. एका बारीक नजरेने त्याने सायकलवर नजर टाकली आणि तो हलकासा हसला आमच्याकडे बघून. म्हणाला, “कुठे राहता रे पोरांनो?” आम्ही उत्तर दिलं, “इथेच. पलीकडे.” म्हणाला, “काही लागलं तर येत जा. मी असतो सकाळच्या वक्तापासनं. पार सांजपर्यंत.”

गडी बोलका होता. वयानेही खूप मोठा वगैरे नव्हता. आम्ही चौदा-पंधरा वर्षांचे असू, तर हा असेल पंचविशीचा. म्हटलं, “दादा, किती पैसे द्यायचे?” तर म्हणाला, “पक्या छोट्या कामाचं पैसं घेत नाय. सायकल पंक्चर झाली तर घेऊन या. मग घेतो तुमच्याकडून पैसं.”

Also Read : Story of In the Idea of the City… in Marathi

हा माणूस आवडून गेला एकदम. म्हटलं हा आपला दोस्त होणार. त्याला म्हटलं, “दादा, नाव काय?” तो म्हणाला, “सांगितलं ना… पक्या!” म्हटलं, “पक्या? पण खरं नाव काय?” तो म्हणाला, “पक्याच! सगळे मला पक्याच म्हणतात.” मी म्हटलं, “ते खरं; पण आई-बाबांनी नाव काय ठेवलंय?” तर म्हणाला, “बाबू, आई-बापाने नुस्ता जन्म दिला, बाकी काय दिलं नाही बघ. आपला आपलाच वाढलो मी. लोक पक्या म्हणतात म्हणून मी माझे नाव पक्याच सांगतो. तसं आपलं नाव परकास हाय म्हटलं..”

“परकास?” मी नकळत विचारलं. मित्राला मात्र कळलं होतं. तो म्हणाला, “प्रकाश रे!” मग माझ्याही डोक्यात प्रकाश पडला!

मग त्याच्याकडे येणं-जाणं सुरू झालं. पक्याभाऊ हवा मारून दे, पक्याभाऊ ब्रेक टाइट करून दे, पक्याभाऊं चेनमध्ये ऑइल सोडून दे, या आमच्या नेहमीच्या मागण्या. तो त्या प्रेमाने पूर्ण करे. शाळेत येता-जाताही तो दिसे. लक्ष असेल तर हसून हात दाखवे. लक्ष नसेल तर आम्ही त्याला हाक मारत असू. मग तो कामातून डोकं वर न काढता आवाजाच्या दिशेने हात वर करे.

आमच्या भागातले रस्ते पुरते खड्डेरी. जिकडे-तिकडे खड्डे आणि फुटलेले रस्ते. त्यामुळे सायकली पंक्चर होणार नाहीत तर काय! खराब रस्त्यांमुळे सायकली खिळखिळ्याही होत. सगळे पार्ट ढिले होत, आवाज करत. त्यामुळे सायकल रिपेअरी आमच्या पाचवीलाच पुजलेली. आधी ही फारच कटकट वाटायची; पण आता पक्याभाऊ अवतरल्यापास्नं त्याचं काही वाटेनासं झालं. मनात येईल तेव्हा उठायचं आणि पक्याभाऊकडून काम करून घ्यायचं, असं सुरू झालं. सततच्या येण्या जाण्यामुळे घसट वाढली, लळा लागला, दोस्ती झाली. किरकोळ कामाचे तो पैसे घेत नसल्याने हवा वगैरे भरण्यासारखी कामं आमची आम्हीच करायला बघायचो. तोही नाही म्हणायचा नाही. सायकलने मेजर फॉल्ट काढला की मात्र आम्ही त्याला शरण जात असू.

सायकलचं पंक्चर काढण्यापासून ते मेजर फॉल्ट दुरुस्त करण्यापर्यंत सर्व गोष्टी तो लीलया करत असे. कोणतंही काम करताना त्याची तंद्री लागत असे. पंक्चर दुरुस्त करताना तो जशी ट्यूब तपासे, तसंच टायरमध्ये हलकेच बोटं फिरवून तो कुठे खिळा वगैरे अडकलेला नाही ना तेही तपासत असे. बोटाला बारीकसंही काही लागलं की ते काढून टाके. तेव्हा तो हलकासा हसल्यासारखा वाटे आणि त्याचा एक गाल उंचावत असे. ‘शोधला का नाय लेका तुला’ असे तो त्या बारीकशा खिळ्याला म्हणतोय असं वाटे.

आम्ही कुठे धडपडलो आणि सायकलच्या मागच्या चाकातून घासल्यासारखा आवाज येऊ लागला की तो सायकल स्टँडवर उभी करे आणि हलक्या हातांनी चाक फिरवे. सगळे प्राण कानात आणल्यासारखा तो कानाने फॉल्ट शोधे, अशा वेळी बहुतेकदा त्याचे डोळे अगदी किलकिले झालेले असत. एरवी त्याच्या तोंडी हिंदी सिनेमांतली गाणी असत. इतरांना ऐकूही येणार नाही इतक्या बारीक आवाजात ती तो म्हणत असे. पण फॉल्ट शोधताना आवाज म्यूट! सगळं लक्ष फॉल्ट शोधण्यावर. दोन-तीनदा चाक फिरवून झालं, इकडे-तिकडे नजर फिरवून झाली, की पक्याभाऊ डॉक्टरच्या आविर्भावात फॉल्टबद्दलचं आपलं डायग्नोसिस सांगणार.. की लगेच ऑपरेशन सुरू.

मोठी माणसं छोट्या बाळांना जसं सहज उचलून कडेवर घेतात, तितक्याच सहजपणे पक्याभाऊ सायकली हाताळत असे. पुढच्या चाकात काही फॉल्ट असला तर तो हँडलचं बखोट पकडून सायकलला मागच्या चाकावर उभा करे आणि दुसऱ्या हाताने पुढचं चाक फिरवे, तपासे. कधी तो सायकलला पार उलटी सीटवर उभी करे आणि चेन, पायडल किंवा चाकांच्या स्पोक्सचं काम करे.

सुट्टीच्या वगैरे दिवशी त्याच्याकडे गिऱ्हाइकांची झुंबड उडे. प्रत्येकाचं काम वेगळं असे. आम्हाला वाटे, आता याची तारांबळ उडणार. कसा काय करेल हा? पण त्याची स्वतःची म्हणून कामाची एक पद्धत होती. तो पंक्चरच्या जेवढ्या सायकली असतील त्यांचं काम एका वेळी करे. बाकीच्यांना ‘तुम्ही दोन वाजता या’, ‘तुम्ही चार वाजता या’ म्हणून मोकळा करे. आणि मग दिवसभर शांतपणे निगुतीने काम करे. त्या दिवशी त्याला बहुतेक दोन घास खायलाही वेळ मिळत नसे. चहा-वडापाव ढकलला पोटात की तो लगेच कामाकडे वळे.

अनेक सायकलींचं पंक्चरचं काम असेल तर त्याचं उघड्यावरचं दुकान पाहण्यासारखं असे. त्याच्या बसण्याच्या जागेभोवती पाच-सात सायकली आ वासून जमिनीवर पाडून ठेवलेल्या असत. त्यांच्या पोटातून आतडी काढून ठेवल्यासारख्या टायरमधून ट्युबा बाहेर पडलेल्या असत. एकाच वेळी सर्वांवर ट्रीटमेंट चाललेली असली तरी प्रत्येकीची स्टेज वेगवेगळी असे. कुठल्या ट्यूबमध्ये हवा भरून घमेल्यातल्या पाण्यात ती बुडवून पंक्चर शोधलं जात असताना, दुसऱ्या ट्यूबला व्हल्कनायझर सोल्युशन लावून ठेवलेलं असे. तिसरीचं सोल्युशन वाळलेलं असेल तर त्यावर पॅच लावण्याचं काम तो करत असे. तेव्हाच कुठल्या ट्यूबचा व्हॉल्व खराब झालेला असेल, तर तो बदलण्याच्या अवघड कामात गुंतलेला असे. कुठल्या सायकलची ट्यूबच बदलायची असेल किंवा टायर बदलायचा असेल तर मात्र तो ती सायकल मागे ठेवे. कारण याचं दुकान उघड्यावरचं; शिवाय गरीबडं. त्याच्याकडे कुठल्या आल्यात नव्या ट्यूब आणि टायर्स ! मग तो मध्येच आपल्या सायकलवर टांग मारून माल घेऊन येई. आला की फटाफट कामं संपवून टाके. ठरलेल्या वेळी ठरलेलं गिन्हाईक आलं, की घे पैसे आणि दे त्याची सायकल, असा सपाटा सुरू.

काम पंक्चरचं असो की सायकलच्या इतर दुरुस्तीचं, त्याचे हात मोठ्या सफाईने चालत. कंप्युटरच्या की-बोर्डकडे न बघता टाइप करणाऱ्याप्रमाणे त्याचे हात आपोआप त्याच्या पत्र्याच्या पेटीत जात आणि नुसत्या स्पर्शान त्याला हवं ते अवजार घेऊन येत. कधी कुठलं उपकरण पेटीत हाताला लागलं नाही तरच तो नजरेने तिकडे बघे.

खरं तर त्याची सामानाची पेटी ही काही साधीसुधी चीज नव्हती. जादूच्या पेटाऱ्यातून काहीही निघावं तसं पक्याभाऊच्या पेटीतूनही निघे. काय नव्हतं त्या पेटीत ? छोट्या-मोठ्या हातोड्या, पाच-पंचवीस प्रकारचे स्क्रू ड्रायव्हर, पकडी-चिमटे, पान्हे-पिंचेस, स्क्रू-नट, स्प्रिंगा, व्हॉल्व व्हॉल्व ट्यूब, स्पोक्स, ब्रेक वायरच्या गुंडाळ्या, ब्रेकचे रबरी ठोकळे, चेनचे एक-दोन सेट्स, छरें अशा एक ना अनेक वस्तू. शिवाय पंक्चरचे पॅचेस, व्हल्कनायझर सोल्युशनच्या बाटल्या, तेलाच्या बुदल्या, ग्रीसचं डबडं, रॉकेलची बाटली, फडकी, रिममधून टायर उचकटून काढण्याची हत्यारं, बत्ते असंही बरंच काही. एका पेटीत किती, काय काय !

आमचा पक्याभाऊ काटकसरी माणूस. तो गि-हाइकाला फार खर्चात टाकायला अनुत्सुक असे. कुणा गि-हाइकाचा टायर खिळा लागून दुखापतग्रस्त आलेला असला, तरी लगोलग टायर बदलला तर तो नावाचा पक्याभाऊ कसला! तो गि-हाइकाला म्हणे, “काका, काळजी करू नका. आत्ता मी टायरच्या पोटात गेटर घालून देतो. महिना-दोन महिने चालेल गाडी. नंतर बघू.” गि-हाइकाच्या संमतीची वाट न पाहता तो कामाला लागेही. टाकून दिलेल्या कुठल्या तरी टायरच्या आतल्या तारा तो काढून टाके आणि रबरी भाग गिऱ्हाइकाच्या टायरच्या पोटात फिट करून टाके. हे गेटर म्हणजे टायरचं न दिसणारं ठिगळच. पण पक्याभाऊ हे काम अशा कसबीने करे की असं काही जुगाड त्याने केलंय हे कुणाला कळूच शकणार नाही!

या असल्या जुन्या टायर्सप्रमाणेच जुनी, शिवून वगैरे ठाकठीक केलेली सीट कव्हर्स, नादुरुस्त घंट्या, पायडलचे रबरी ठोकळे असा सेकंडहँड मालही पक्याभाऊ बाळगून असे. पक्याभाऊची पेटी ही अशी अफलातून गोष्ट होती. गिऱ्हाईक नसे तेव्हा आम्ही त्या पेटीत डोकं घालून बसत असू आणि उचकपाचक करत असू, पण पक्याभाऊने आम्हाला कधी हटकलं नाही. रविवारी आम्ही रिकामटेकडे त्याच्या दुकानावर येऊन बसत असू, तेव्हा काम करता करता पक्या म्हणे, “बाबू, जरा फेसकस दे रे.” मग मी समजुतदारपणे त्याला स्क्रू ड्रायव्हर देणार. कधी तो म्हणणार, “बाबू, तीन नंबरचा फान्हा दे रे.” मग मी त्याला नट फिरवण्याचा पान्हा देणार. तो कुठलं अवजार मागतोय हे मला कळतं म्हणून तो माझ्यावर खूष असे. अर्थात आपण पेचकसला फेसकस आणि पान्ह्याला फान्हा म्हणतोय, हे त्याच्या गावीही नसायचं, पक्याभाऊचे भाषेबद्दल स्वतःचे नियम असल्याने तो अनेक शब्द आपल्या सोईने म्हणे. इस्क्रू, स्फोक, हॉल्व, चैन, टूब, चरें, डबर्ड, घमेलं, ग्याटर… अशी त्याची स्वतंत्र डिक्शनरी होती. एवढंच काय, पंक्चरचं दुकान चालवणाऱ्या या बाबाला ‘पंक्चर’ हा शब्दही म्हणता यायचा नाही. तो ‘पॉम्पचर’ म्हणायचा.

आम्ही त्याला म्हणायचो, “इस्क्रू नाही, स्क्रू म्हण. स्फोक नाही, स्पोक म्हण. हॉल्व नाही, व्हॉल्व म्हण. चैन-टूब नाही, चेन-ट्यूब म्हण.” पण हे शब्द त्याच्या जिभेला मान्यच नव्हते. तो म्हणायचा, “बाबू, आपल्याला आपलं नाव पण सांगता येत नाही. पण आपलं काम कसाय? कोणी तक्रार करू शकत नाय. त्यामुळे कुठला शब्द बरोबर आणि कोणता चूक ते तुमचं तुम्ही बघून घ्या. शाळेत जाणारी पोरं बाबा तुम्ही! आमचं काय…”

पक्याभाऊ अशा छोट्या गोष्टी मनाला लावून घेणारा नव्हता. पण कधी घरून आईने केलेला लाडू किंवा दुसरा एखादा पदार्थ त्याला नेऊन दिला की त्याच्या जिवाची घालमेल होई. त्याच्या डोळ्यांत पाणी तरळे. आमच्यासमोर खायला तो तयार नसे. आम्ही गेलो की कोपऱ्यात बसून आसवं ढाळत तो डब्यात हात घालून एकेक तुकडा चघळत बसे. कळायला लागल्यापासून तो रस्त्यावरच कुणाकुणाच्या आधाराने जगला होता. त्यामुळे घरच्या अन्नाचं मोल त्याच्या दृष्टीने मोठं होतं.

एकदा मी आणि माझी आई चालत चालत त्याच्या दुकानावरून जात होतो. तो लगेच आमच्याजवळ आला. मी आईला म्हटलं, “हा पक्याभाऊ.” त्याला म्हटलं, “ही माझी आई.” ऐकल्याक्षणी पक्याभाऊ वाकला आणि त्याने आईला झटकन वाकून नमस्कार केला. उभं राहून त्याने हात जोडले तेव्हा त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, चेहरा कसनुसा झाला होता. त्याला काही तरी बोलायचं होतं; पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. ‘आई’ एवढंच तो म्हणाला आणि क्षणात नजरेआड झाला.

नंतर तो मला एकटा भेटला. म्हणाला, “बाबू, ज़िंदगीभर पॉम्पचर काढत बसलोय. कामाला डरत नाय; पण आई-बापाची आठवण आली की मीच पॉम्पचर होतो. माझं पॉम्पचर कोण काढणार?”

मग तो आणि मी दोघंही गप्प बसून राहिलो.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.