Story of And the Cat Conquered the Man in Marathi

Story of And the Cat Conquered the Man in Marathi : आणि मांजराने माणसाला जिंकलं गोष्ट.

1 min read

Story of And the Cat Conquered the Man in Marathi : आणि मांजराने माणसाला जिंकलं गोष्ट.

ही गोष्ट आहे फार फार पूर्वीची. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची. एक्का आणि दुक्का हे दोघं सख्खे मित्र होते. एक्का कुठे निघाला तर दुक्काला हाक मारायचा. दुक्का बाहेर पडला तर एक्काला बरोबर न्यायचा. सगळ्या टोळीला त्यांची ही मैत्री माहीत होती. हिमयुग नुकतंच ओसरून गेलं असलं तरी हवा बरीच गार होती. टोळीतले सगळे अंगाभोवती कातडी गुंडाळून घ्यायचे. गुंडाळलेली कातडी सुटू नये म्हणून एक्का-दुक्का युक्ती करायचे. दोघं लहान दगड घासून घासून अणकुचीदार बनवायचे आणि त्याने कातड्याच्या कडेला भोकं पाडायचे. भोकातून कातड्याच्याच वाद्या ओवून कातडी अंगाभोवती बांधता यायची. नुसती गुंडाळलेली कातडी सारखी सावरावी लागायची. मात्र अशी बांधली की सुटायची नाही. त्यामुळे विशेषतः शिकारीच्या धामधुमीत खूप सोय व्हायची. या युक्तीमुळे एक्का-दुक्काला टोळीत भाव मिळायला लागला होता.

त्यादिवशी ते दोघं असेच जंगलात फिरायला निघाले होते. सहज फिरत असले तरी त्यांचं जंगलात आसपास बारीक लक्ष असे. कुठला पक्षी कुठे घरटं बांधतो, तो अंडी कधी घालतो, हे त्यांना माहीत होतं. कावळ्यांनी झाडाच्या बुंध्याजवळ घरटी बांधली की त्यानंतरच्या पावसाळ्यात भरपूर पाऊस पडणार, हे त्यांना समजलं होतं. बुलबुलाची पिल्लं घरट्याबाहेर पडली की त्यानंतर साधारण एक-दोन महिन्यांनी पाऊस येणार हे गणित त्यांनी तयार केलं होतं. त्यांचे असे अनेक आडाखे टोळीच्या उपयोगी पडत असत.

त्यादिवशी हिंडत असताना त्यांना केविलवाण्या सुरात ‘म्याँव, म्याँव’ असा आवाज ऐकू आला. ते दोघं त्या आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. हातातली दांडकी त्यांनी सावरून धरली होती. तो आवाज छोट्या पिल्लांचा असावा, असा अंदाज त्यांनी बांधला. तसं असेल तर त्या पिल्लांची आई जवळपास असणार हे देखील त्यांच्या लक्षात आलं. कुठल्याही प्राण्याची मादी पिल्लांचं संरक्षण करताना किती आक्रमक बनते, याचा टोळीने अनेकदा अनुभव घेतला होता. त्यामुळे ते अगदी सावधपणे एक एक पाऊल पुढे टाकत होते.

दोघं त्या आवाजाच्या अगदी जवळ पोचले. खडकातल्या एका कपारीत आडोशाला दोन पिल्लं एकमेकांच्या पायात-पायात फिरत होती. त्यांचा आवाज केविलवाणा होता. त्यांचे डोळेही अजून उघडलेले नव्हते. पिल्लांच्या तोंडाची उघडझाप होत होती. त्यावरून त्यांना भूक लागलेली होती, हे कळत होतं. मात्र त्या पिल्लांची आई कुठेच दिसत नव्हती. एक्काने एक पिल्लू उचललं. दुक्काने दुसरं पिल्लू उचललं. त्यांना व्यवस्थित छातीशी कवटाळून घेऊन ते वस्तीकडे निघाले. वाटेत त्यांना पुन्हा एकदा अगदी बारीक ‘म्याँव, म्याँव’ असा केविलवाणा आवाज ऐकू आला. मात्र तो आवाज लहान पिल्लाचा नव्हता.

एक्का, दुक्का दोघं त्या आवाजाच्या दिशेला सरकले. त्यांनी छातीशी धरलेली पिल्लं त्या आवाजामुळे अस्वस्थ होऊन चुळबूळ करू लागली. आणि तेवढ्यात एकदम फिस्करण्याचा आवाज ऐकू आला. या आवाजातही तसा फारसा जोर नव्हताच. त्यांना दिसलं, की एक मांजरी तिथे खूप जखमी होऊन पडली होती. त्याही अवस्थेत ती यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होती. या प्राण्याची नखं फार तीक्ष्ण असतात, तसंच हा प्राणी चावला की फार त्रास होतो, असं टोळीतली मोठी माणसं सांगायची. हा प्राणी फार चपळ असतो, त्यामुळे त्याची शिकार करायला फार कष्ट पडतात, आणि इतके कष्ट करून त्यामानाने खायला फार काही मिळत नाही, हे टोळीला समजलं होतं. त्यामुळे त्याची शिकार करायच्या भानगडीत कुणी पडत नसे.

Also Read : Story of Bicycle Man in Marathi

इतरवेळी एक्का-दुक्काने मांजरीकडे दुर्लक्ष केलंही असतं. पण इथे ती जखमी होऊन पडलेली दिसत होती. शिवाय ती त्या दोन पिल्लांची आई असावी, असंही त्यांना वाटलं. मग त्यांनी त्यांच्या हातातली पिल्लं त्या मांजरीसमोर ठेवली. पिल्लांना पाहून ती मांजरी धडपडत धडपडत त्यांच्या जवळ आली आणि त्यांना चाटायला लागली. ती दोन छोटुलीही आईचं दूध प्यायला पुढं सरसावली. मात्र तेवढ्याशा हालचालीने ती मांजरी बेशुद्ध झाली.

मग एक्काने आपल्या छातीवरचं कातडं उतरवलं. त्यात त्या मांजरीला गुंडाळलं. दुक्काने दोन्ही पिल्लं उचलून छातीशी अलगद कवटाळून धरली. ती पिल्लंही तिथे लगेच आरामात डोळे मिटून बसली. ते दोघं त्यांच्या वस्तीच्या दिशेने चालू लागले. ते वस्तीजवळ पोचायच्या आधीच वस्तीतली कुत्री त्यांच्या दिशेने भुंकत आली. त्या कुत्र्यांना मांजरांचा वास दुरूनच आला असणार. एक्का आणि दुक्का दोघांनीही एका आवाजात त्या कुत्र्यांना शांत केलं.

कुत्री शांत झाली खरी, पण त्यांच्या भुंकण्यामुळे टोळीतले काहीजण काय झालं ते बघायला जमले. इकडे एक्का-दुक्कानी ती जखमी मांजरी आणि तिची पिल्लं त्यांच्या झोपडीसमोरच्या मोकळ्या जागेत ठेवली. दोघांच्या झोपड्या शेजारी शेजारीच होत्या. मध्ये एक मोठं अंगण होतं. त्यात त्यांच्या वाट्याचा शेतमाल रचून ठेवलेला असे. सगळे आता त्या अंगणात जमले. त्यांच्यात एक्का-दुक्काचा राग राग करणारे दोघं तिघं होते. ते त्या दोघांच्या विरुद्ध बोलायची एकही संधी सोडत नसत. त्या जखमी मांजराकडे बोट दाखवत त्यांच्यापैकीच एकजण म्हणाला- “यांना कशाला उचलून आणलं इथे?”

“तुम्ही कशाला चिडताय? आम्ही दोघं यांची काळजी घेऊ.” एक्का म्हणाला.

“आधीच वस्तीत कटकटी कमी का आहेत ? त्यात ही नवी भर कशाला?”

“तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. ती जबाबदारी आमची.” दुक्का म्हणाला.

बराच वेळ अशी वादावादी झाली. तोपर्यंत ही बातमी वस्तीतल्या मोठ्या लोकांपर्यंत गेली. त्यांनी या सर्वांना बोलवून घेतलं आणि वादाचं कारण विचारलं. आधी त्या मांजरांविरोधातील लोकांनी त्यांचं म्हणणं सांगितलं- ‘हा प्राणी वस्तीला कुठल्याही उपयोगाचा नाही, उलट त्याचा त्रासच होईल. आधीही बरेच वेळा हा प्राणी वस्तीत शिरला आहे. तो झोपडीत शिरला तरी पत्ता लागत नाही. अंधारात त्याचे डोळे चकाकतात, त्याची भीती वाटते.’

यावर एक्का आणि दुक्काने वस्तीतल्या इतर प्राण्यांची उदाहरणं दिली “शेळ्या पूर्वी शेतात शिरून पीक खायच्या. पण आता त्या आपल्यासोबत राहतात. त्यांचं दूध, मांस आपण खातो. कुत्रे राखण करतात, शिवाय शिकारीला मदत करतात. आपल्या पूर्वजांच्या काळात कुत्री पाळायला असाच विरोध झाला असणार. तेव्हाच्या टोळीवाल्यांनी त्यांचं ऐकलं असतं, तर आज कुत्र्याची अशी मदत आपल्याला झाली असती का? कदाचित हा प्राणीही पुढे आपल्या उपयोगी पडेल. नाही ठरला तर बघू काय करायचं ते..”

आता वस्तीतली मोठी माणसं काय निर्णय घेतात,

यावर सगळं अवलंबून होतं. त्यांनी आपापसात चर्चा केली. नंतर निकाल दिला ‘ते मांजर आणि त्यांची पिल्लं सध्या ठेवून घ्यावीत. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी एक्का आणि दुक्काची असेल. त्यांच्यामुळे वस्तीचं काही नुकसान झालं तर त्यांना शिक्षा केली जाईल.’ सर्वांना हा निर्णय मान्य करावा लागला.

काही दिवसांनी ती जखमी मांजरी बरी झाली आणि अचानक नाहीशी झाली. अधूनमधून ती वस्तीत यायची, पिल्लांबरोबर बसायची आणि आली तशी निघून जायची. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती उंदीर पकडायची आणि त्याला अर्धमेलं करून पिल्लांसमोर सोडायची. ती पिल्लं तो उंदीर पकडायचा प्रयत्न करायची. उंदीर त्यांच्या तावडीतून निसटलाच तर त्यांची आई उडी मारून त्याला परत पकडायची आणि पिल्लांसमोर टाकायची. वस्तीतल्या छोट्या मुलांना हा खेळ बघायला खूप मजा यायची.

एक्का-दुक्काने बघितलं, की छोटी मुलं मांजरांसोबत रमतात. टोळीतले पुरुष शिकारीला गेले आणि स्त्रिया अन्न वेचायला गेल्या की वस्तीत लहान मुलं, मांजरीची पिल्लं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवायला एक्का-दुक्का, अशी धमाल चालायची. एक्का-दुक्काने मुलांना आणखी एक खेळ शिकवला होता. मुलं पिल्लांसमोर चामड्याच्या वाद्या धरायची. पिल्लं वाद्या धरायला आली की मुलं त्याची टोकं हळूच ओढून पिल्लांपासून लांब न्यायची. की पिल्लं त्या दिशेला धावायची. पिल्लांशी खेळताना मुलांना मोठ्यांची आठवणही यायची नाही. मुलं दुपारी झोपली की पिल्लंही एखाद्या कोपऱ्यात झोपून टाकायची. त्यांनी कधीच लहान मुलांना बोचकारलं नाही, की चावा घेण्याचा प्रयत्न केला नाही. हां, कुणी व्रात्य पोराने एखाद्या पिल्लाची शेपूट ओढली तर मग मात्र ते पिल्लू झपकन वळून फिस्कारत त्या पोराला पंजा मारायचं. ही एक गोष्ट सोडली तर ती मांजरं आणि वस्तीतली पोरं यांची एकमेकांशी अगदी छान गट्टी झाली होती.

वस्तीत मांजरं आल्यापासून उंदीर कमी झाले होते. पूर्वी वस्तीतले लोक शिकारीवरून परतेपर्यंत इकडे उंदरांनी घरात साठवलेल्या अन्नधान्याची नासधूस केलेली असायची. आता अन्नाची नासाडी कमी झाली होती. उंदीर पारच नाहीसे झाले होते असं नाही, पण आता ते वस्तीत इकडे तिकडे फिरताना दिसत नव्हते.

पिल्लं आता बऱ्यापैकी मोठी झाली होती. आता ती मधूनच कधीतरी गायब व्हायची. काहीवेळा त्यांच्यातला नर जखमी होऊन यायचा. मग दोन- तीन दिवस गप्प पडून राहायचा. अधूनमधून जमेल तशा स्वतःच्या जखमा चाटायचा. एक्का आणि दुक्का त्याच्या जखमांवर झाडपाला वाटून लावायचे. त्याला खायला द्यायचे. बकरीचं दूध पाजायचे. तो बरा झाला की पाठीची कमान करून आपलं शरीर ताणायचा आणि परत दोन-चार दिवस परिसरातले उंदीर, चिमण्या पकडायचा उद्योग करायचा.

एक्का आणि दुक्काने त्या मांजरांना कुत्र्यांप्रमाणेच शकवायचा प्रयत्न करून बघितला. दोघं प्रयत्न करून करून कंटाळले, पण ती मांजरं काही शिकायला तयार होईनात. त्यांना काही गोष्टी मात्र न शिकवता बरोबर कळत होत्या. रोजची खायची वेळ त्यांना कळायची. थंडी-पावसात शेकोटीजवळची सगळ्यात आरामाची जागा नेमकी शोधता यायची. या गोष्टी समजतात, पण उठ आणि बस, या आज्ञा का कळत नाहीत, असा टोळीतल्या सर्वांना प्रश्न पडायचा. कारण त्यामुळे मांजरांना कुठलीही शिस्त लावता येत नव्हती.

कुत्र्याची मादी मानवी वस्तीतच पिल्लांना जन्म द्यायची. वस्तीतील छोटी मुलं त्या पिल्लांचे डोळे उघडायच्या आधीपासूनच त्यांना उचलून घ्यायची, कुरवाळायची. फक्त आईचं दूध पिताना त्या पिल्लांना कुणी हात लावायचा प्रयत्न केला तर ती मान उचलून थोडं गुरगुरल्यासारखं करायची, मग पडून राहायची. मांजरीला पिल्लं होणार हे तिच्या अवस्थेवरून कळायचं. एक दिवस तिला पिल्लं झाल्याचं लक्षात यायचं; पण ती कुठं व्यायली, हे कुणालाच समजायचं नाही. एवढंच काय, तिला किती पिल्लं झाली हेही कधी कळायचं नाही. अधूनमधून ती एखादं पिल्लू तोंडात धरून इकडून तिकडे जाताना दिसायची. ती पिल्लं चांगली मोठी झाल्यावरच वस्तीत यायची. स्वतःचं रक्षण करण्याइतपत मोठी होईपर्यंत वस्तीत राहायची.

मग पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’.

अशा या प्राण्याला वस्तीत कशासाठी राहू द्यायचं, यावरून वस्तीत अधूनमधून चर्चा व्हायची. मांजरांना वस्तीतून हाकलण्याबद्दल बोलणं झालं की लहान मुलं रडायला सुरुवात करत. तो गोंडस, गुबगुबीत प्राणी त्यांना आवडायचा. तो उचलून काखोटीला मारून त्याला कुठेही नेता यायचं. कुत्र्यांचं तसं नव्हतं. कुत्र्याची पिल्लं थोडी मोठी झाली की चांगलीच जड व्हायची. मुख्य म्हणजे त्यांना पिकाची राखण करणं आणि शिकारीस जाणं, ही कामं करायला जास्त आवडायचं. त्यामुळेही पोरांना ही मांजरं जास्त आवडली होती. त्यांच्या हट्टामुळे मोठी माणसंही त्यांना हाकलून देण्याबद्दल फार काही विचार करत नसत. पण मांजरांना वस्तीत राहू द्यायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर शेवटी एका मांजरानेच दिलं.

एका रात्री माणसं मांजराच्या ओरडण्याने जागी झाली. दिवट्या पेटवल्या गेल्या. सर्वात आधी एक्का आणि दुक्का त्या आवाजाच्या दिशेला धावले. पाहतात तो काय, मांजर एका नागाशी झटापट करत होतं. तो नाग फणा उभारून मांजराला दंश करायचा प्रयत्न करत होता. त्याने झडप मारली की मांजर पटकन उंच उडी मारून बाजूला व्हायचं. त्यामुळे नागाचा फणा जमिनीवर आपटायचा आणि मांजर त्यावर जोरात आपला पंजा मारायचं. नाग रक्तबंबाळ झाला होता. मांजराच्या चपळाईने हैराण झाला होता. त्याला माघार घेता येत नव्हती. आणि मांजर काही त्याच्यावर हल्ला करणं थांबवत नव्हतं. अखेर त्या थकलेल्या नागाला टोळीतल्या एकाने दांडकं मारून संपवलं. ते बघताच इतका वेळ अंग फुलवलेल्या मांजराने कोणाकडेही न बघता एक्काची झोपडी गाठली. मग आपलं अंग चाटून काढायला सुरुवात केली. हळूहळू ते शांत झालं.. कुणीतरी त्याच्यापुढे दूध ठेवलं, त्याचा त्याने चट्टामट्टा केला. आणि मग ते नाहीसं झालं.

त्या घटनेनंतर मांजर सर्वांनाच हवंहवंसं वाटायला लागलं. त्यामुळे आता वस्तीत मांजरं आली तरी कुणी काही म्हणत नव्हतं. मांजरांनाही काय, तेच तर हवं होतं. आपली एकही सवय न बदलता मांजरं आता माणसाबरोबर राहू लागली होती.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.