Beauty of Lonar Sarovar in Marathi

Beauty of Lonar Sarovar in Marathi : लोणार सरोवर चे सौंदर्य.

1 min read

Beauty of Lonar Sarovar in Marathi : लोणार सरोवर चे सौंदर्य.

विदर्भामधले लोणार सरोवर म्हणजे पर्यटकांचे एक मुख्य आकर्षण, हे लोणार सरोवर पाहायचे, तिथली मंदिरे विशेषतः कमलजा देवीचे मंदिर पाहायचे होते. तिथे पोहोचल्यावर लोणार सरोवराकडे कसे जाता येईल, याची चौकशी करून सरोवराच्या दिशेने निघालो. लोणार सरोवराचा हा परिसर दण्डकारण्याचा भाग मानला जातो.

बरोबर सात-आठ मैत्रिणी होत्या. मूळ सरोवराजवळ तर साडेचारशे फूट खाली उतरून ते सरोवर पाहावे लागणार होते आणि परत साडेचारशे फूट वर चढून यावे लागणार होते. सरोवराचे आकर्षण तर होतेच; पण त्या परिसरात असलेले कमलजा देवीचे मंदिर पाहण्याची खूप इच्छा होती. लोणारहून तासाभराच्या अंतरावर मेहेकर गाव आहे. इथल्या शारंगधराचे देऊळ आणि तिथली काळ्या पाषाणातली शारंगधराची मूर्ती खूप सुंदर आहे, असे समजले होते. म्हणून तेही पाहायचे होते आणि कंचनीचा महाल !

लोणार सरोवर आणि मेहेकर यांचे उल्लेख पुराणांतही आहेत. सत्य युगात लोणार सरोवर बैरजतीर्थ म्हणून ओळखले जाई. या गावाविषयीची एक आख्यायिका म्हणा अद्भुत कथाही समजली होती. लोणार सरोवर आहे खारट पाण्याचे. ५०- ६० हजार वर्षांपूर्वीच्या उल्काघाताने जो खड्डा तयार झाला, त्यात पाणी साठत गेले आणि त्याचे रूपांतर सरोवरात झाले.

या सरोवरच्या परिसरात शुक्राचार्यांची पाठशाळा होती, असे समजले. भस्मटेकडी, सीतान्हाणी, पापदरेश्वर मंदिर, रामगया मंदिर, कुमारेश्वर ही सारी मंदिरे पाहत असताना लागले कमलजा देवीचे मंदिर. पांढऱ्या शुभ्र रंगाचे. एरवी वरून सरोवर दिसत होते.

हे कमलजा देवीचे मंदिर आणि मेहेकमध्ये असलेल्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या वास्तूविषयी एक अद्भुत कथा ऐकायला मिळते. म्हणून हा परिसर जसा पाहिला तसेच मेहेकरच्या उत्तरेला असलेल्या पैनगंगेच्या अर्धगोल टेकडीच्या भागात असलेली ही वास्तू ‘कंचनीचा महाल’ म्हणून ओळखली जाते. ती पाहायची होती. सरोवर पाहून मेहेकरकडे जाताना ही वास्तू दूरवर दिसत होती. खूप जुनी पडीक अशी. या वास्तूच्या पश्चिमेला पैनगंगा नदी आहे. जवळ जाऊन पाहिल्यावर लक्षात येते, की अगदी मोडकळीस आलेली भग्नावस्थेत असलेली ही वास्तू आहे. एकेकाळी नृत्यविद्येत पारंगत असलेल्या एका नर्तिकेचा महाल इथे होता. दोन मजली अतिशय सुंदर, भव्य अशा या वास्तूत ती राहत होती.

एकदा तिला वाटले- लोणार सरोवराकाठी असलेल्या कमलजा देवीचा दिवा पाहायचा. तिला गर्व झाला होता की काय, तिला वाटलं मी देवीच्या मंदिरापर्यंत जाणार नाही. मी इथूनच, माझ्या महालातूनच, देवीच्या मंदिरातील देवीपुढे लावलेला दिवा पाहीन. म्हणून मंदिर पाहण्यासाठी तिने आपल्या महालाला मजले बांधले. त्या पाच मजली वास्तूला तिने सजवले. महालात उंची हंड्या, झुंबरे लावली. आता शेवटच्या मजल्यावरून मी कमलजा देवीच्या मंदिरातील दिवा पाहीन, अशा तोऱ्यात ती होती. पाचव्या मजल्यावरून कमलजा देवीचे मंदिर दिसेल आणि देवळातल्या दिव्याचे दर्शन होईल; पण तिथून तिला दर्शन झाले नाही. म्हणून तिने आणखी एक मजला चढवला; पण याही मजल्यावरून तिला दिवा दिसेना. नर्तकीच ती. तिच्याजवळ पैशाला काही कमी नव्हते. तिची जिद्द होती की याच जागेवरून मी देवीच्या देवळातला दिवा पाहीनच पाहीन. मग तिने आणखी एक म्हणजे सातवा मजला चढवला. आता तरी मला कमलजी देवीचा दिवा दिसेल, अशी तिची मनोमन खात्री झाली. इतकी उंच वास्तू ती आता दिसत होश, आता नक्की इच्छा पूर्ण होईल, म्हणून महालाचे सन मजले ती चढली. सातव्या नवीन बांधलेल्य मजल्यावर ती आली. आता इथून तरी देवीच्या देवळातला दिवा दिसेल. ती महालाच्या दक्षिण दिशेला आली. तिने तिथून पाहिले आणि काय आश्चर्य ! आजपर्यंत तिच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण होण्याची वेळ आली. सातव्या मजल्यावरून तिला कमलजा देवीचे मंदिर आणि तिच्या देवळात लावलेला दिवा दिसला. ती आनंदून गेली. ‘माझ्या महालातून कमलजा देवीच्या मंदिरातील दिवा पाहीन.’ ही तिची इच्छा पूर्ण झाली. मंदिरातला तो दिवा दिसला; मात्र त्याच क्षणी ती शिळा होऊन धरतीवर पडली. त्याच क्षणी आकाशात वीज कडाडली. आसमंत कंपित झाला. सुंदर अशा त्या नर्तिकेला झालेला गर्व, तिचा तोरा क्षणात विरला. तिच्या तनूला काठिण्य आले आणि आता वर्षानुवर्षे ती शिळा होऊन तिथेच पडली आहे. कमलजा देवीपर्यंत न जाता तिने जो तोरा दाखवला, त्याची ही शिक्षा. काळ लोटला. वरचे बांधलेले सगळे मजले पडून गेले. आता भग्नावस्थेतले दोन मजले दिसतात आणि जवळच दक्षिण दिशेला पडलेली ती मोठी शिळा. कधी या भागात गेलात, तर पैनगंगेच्या पश्चिमेला अर्धगोल टेकडीच्या गढीत ती भग्न वास्तू आणि शिळा पाहायला मिळेल. हे सारेच अ‌द्भुत आहे. या भन्न वास्तूवर विदर्भातील प्रसिद्ध कवी ना. घ. देशपांडे यांनी दीर्घ कविता लिहिली आहे. ती वाचताना घडलेली, दंतकथा होऊन राहिलेली नर्तकीची कथा आपल्या मनात घर करते.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.