सूर्या आणि इंजिनकाका गोष्ट मराठीत.
Story of Surya and Enginekaka : सात वाजून गेले होते, पण अजून सूर्या शाळेतून घरी आला नव्हता. अंधार पडायला लागला होता. सूर्याची आई अस्वस्थपणे त्याची वाट बघत होती. सूर्याची शाळा खरं म्हणजे साडेपाचलाच सुटायची. त्यानंतर मित्रांबरोबर तो चालत चालत पावणेसहा-सहापर्यंत घरी यायचा. आज मात्र सात वाजून गेले तरी त्याचा काही पत्ता नव्हता. शाळेत उशीर होणार असेल तर तो आईला आधी सांगून जायचा. मग आज हा मुलगा गेला कुठे? आईला काही कळत नव्हतं. शाळेत काही अचानक ठरलं म्हणून थांबला का ? की मित्रांबरोबर गप्पा मारण्यात रमला ? शाळेतून येताना सूर्याला रेल्वेचे रूळ ओलांडून यावं लागायचं. तिथे त्याचा एक मित्र राहायचा. कदाचित त्याच्याकडे गेला असेल, असा विचार आईच्या मनात आला आणि तिला एकदम भीतीच वाटायला लागली. हा मुलगा अंधारात एकटा रूळ ओलांडून कसा येईल ? अरे देवा ! आईने विचार केला, असं घरात बसून वाट बघण्यात काही अर्थ नाही. दाराला कुलूप लावणार तेवढ्यात तिला सूर्या धावत येताना दिसला.
त्याला पळत येताना बघून आई अजूनच घाबरली. “काय रे, काय झालं? असा पळत का येतोयस?” “अगं… उशीर झाला ना… तू काळजी करशील… म्हणून पळत आलो…” सूर्या अजून धापाच टाकत होता. “अरे, पण उशीर का झाला ? कुठे पडलास का ? काही लागलं का?” आईच्या आवाजात अजूनही काळजीच होती. बोलत बोलत तिने घराचं कुलूप काढलं. सूर्याने घरात आल्या आल्या दप्तर खांद्यावरून खाली ठेवलं, पायांतले बूट काढले आणि तो म्हणाला,
“अगं, काही झालं नाही. ते इंजिन उशिरा आलं ना, त्याच्यासाठी थांबलो होतो…”
“इंजिन उशिरा आलं???”
“हो… अगं, ते नाही का माझं लाल इंजिन ? ते मला रोज टाटा करून जातं ना, ते आज आलंच नाही वेळेवर. त्याच्यासाठी थांबलो होतो.”
यावर सूर्याच्या आईला हसावं का रडावं तेच कळेना. त्यांच्या गावातून रेल्वेचा ट्रॅक जायचा आणि त्यावरून दिवसाला अनेक गाड्या जायच्या, पण ही एक गाडी संध्याकाळी पावणेसहा वाजता जायची. इतर सगळ्या आगगाड्यांची इंजिन्स काळी होती पण या गाडीचं इंजिन मात्र काळपट लाल रंगाचं होतं. आणि ते इंजिन सूर्याला जाम आवडायचं. रोज शाळा सुटली की घाईघाईने तो रेल्वे ट्रॅकपाशी जाऊन उभा राहायचा आणि लांबून इंजिन येताना दिसलं की खिशातला रुमाल काढून त्याला टाटा करायचा. आणि असं तो पार पाचवीत असल्यापासून करायचा. या इंजिनाची रोज वाट पाहणाऱ्या या मुलाची बहुधा त्या ड्रायव्हर आणि गार्डलाही मजा वाटत असावी. कारण तेही तिथे त्याच्यासाठी रुमाल बाहेर काढून धरायचे.
Story of Surya and Enginekaka in Marathi
ड्रायव्हरकाकांनी असा टाटा केलं की सूर्या खूष होऊन घरी परत यायचा. त्याला ते इंजिन इतकं आवडायचं की रविवारी शाळा नसली तरी तो संध्याकाळी तिथे जाऊन उभा राहायचाच. हे सगळं त्याच्या आईला चांगलंच माहिती होतं.
पण तरी, शाळा सुटल्यावर, भूक लागलेली असताना जड दप्तर खांद्यावर घेऊन हे पोरगं त्या आगगाडीची वाट बघत तासभर उभं होतं? आईला कळेना की त्याला रागवावं की हसावं ?
सूर्या हातपाय धुऊन खायला बसल्यावर आई त्याला म्हणाली,
“अरे सूर्या, पण आगगाडीला उशीर झाला तर निघून यायचं ना… थांबून कशाला राहायला हवं?”
“असं कसं आई? ते ड्रायव्हरकाका वाट बघत असतील ना माझी…”
“हो, पण तू नसलास तर ती ट्रेन थांबून राहणार आहे का?”
“थांबून तर नाही राहणार, पण म्हणतीलच ना, की हा मुलगा आज का बरं नाही आला?”
“अरे, पण तू गावाला जातोस तेव्हा किंवा कधी आजारी पडलास तर कुठे जातोस त्यांना टाटा करायला?”
“तेच तर ना! त्यांना असंच वाटलं असतं, की मी आजारी पडलोय किंवा गावाला गेलोय. पण तसं काही नाहीच आहे. म्हणूनच मी गेलो.”
सूर्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही हे लवकरच आईच्या लक्षात आलं. ती म्हणाली, “अरे, पण मला कसं समजणार तू कुठे थांबून राहिला आहेस ते? मला किती काळजी वाटत होती तुझी!”
अरेच्चा! हे तर सूर्याच्या लक्षातच आलं नव्हतं. तो म्हणाला, “ते माझ्या लक्षातच नाही आलं गं. इंजिन गेलं तेव्हा लक्षात आलं की अंधार झाला. म्हणून मी पळत आलो. पुढच्या वेळी नाही करणार असं. इंजिनसाठी थोडासाच वेळ थांबीन आणि आलं नाही तर मग मी घरी येऊन परत जाईन टाटा करायला…”
काही झालं तरी सूर्या इंजिनला टाटा करायला जाणार यात शंका नव्हती.
एकदा शनिवार असल्यामुळे सूर्याची शाळा सकाळीच होऊन गेली. त्यानंतर जेवून तो दुपारी मित्रांबरोबर खेळायला गेला. दोन दिवस तुफान पाऊस पडला होता. रात्री मोठं वादळसुद्धा येऊन गेलं होतं. दिवसभर ढगाळलेली हवा असल्यामुळे कधी नाही ते दिवसभर सगळ्यंना बाहेर खेळायला मिळालं. दुपारभर सगळ्धांनी मिळून खूप मस्ती केली, खूप दंगा केला आणि दुपारचे चार बाजून गेले तसं त्यांना बोअर व्हायला लागलं. आता काय करावं? लपाछपी खेळून झाली, झाडावर चढून झालं, क्रिकेटचा बॉल हरवला त्यामुळे क्रिकेट, लगोऱ्या सगळंच बंद पडलं आणि इतर काहीही खेळ सुरु केला तरी त्यात भांडणंच जास्त व्हायला लागली. शेवटी इशा म्हणाली, “आपण ना थोडा वेळ काहीच नको खेळायला.”
also read : Story of When I go for a walk! in Marathi
“पण मग करायचं काय?” या सगळ्यांच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, आपण रेल्वे ट्रॅकपाशी जाऊन बसू आणि आगगाड्या बघू.”
सूर्याच्या सगळ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं एक होतं. इतर बाबतीत कितीही भांडणं झाली तरी ट्रेन्स बघायला जाण्यात सगळ्यांचंच एकमत व्हायचं. फक्त आभाळ भरुन आलेलं असल्यामुळे रेल्वे रुळांपर्यंत जावं का नाही हा विचार सगळ्यांच्याच मनात येऊन गेला.
काय करायचं हे ठरवेठरवेपर्यंत पाऊस पडायला लागला. “आता कुठला रेल्वे ट्रॅक ! आता घरीच जायला लागेल…” असं इशा म्हणेपर्यंत पावसाचा जोर वाढला, जोरात वारं वहायला लागलं. आणि सगळेोण घराकडे पळत सुटले. ते अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले असतील, तेवढ्यात रेल्वे ट्रॅकच्या बाजूनं प्रचंड मोठा आवाज आला. सूर्या, इशा, राणू, शमीम सगळे घाबरुन जिथे होते तिथेच उभे राहिले. सगळ्यांनी क्षणभर एकमेकांकडे पाहिलं आणि काही न बोलता सगळे आवाजाच्या दिशेने धावत सुटले. ते तिथे पोचले तोवर तिथे इतर मोठी माणसंही आली होती. आणि सगळेजण डोळे विस्फारुन रेल्वे ट्रॅककडे बघत होते.
रेल्वे ट्रॅकवर एक प्रचंड मोठं वडाचं झाड पडलं होतं. शंभरेक वर्षं जुनं, प्रचंड मोठं खोड आणि तितकाच मोठा फांद्यांचा पसारा असलेलं हे झाड कसं काय पडलं असेल याबद्दल सगळेजण चर्चा करत होते. कोणी म्हणत होतं की त्याचं खोड आतून पोकळ झालं होतं, ते झाड आधीच पाडायला पाहिजे होतं. तरी बरं, त्यावेळी तिथे कोणी नव्हतं. हे झाड इथून काढायला पाहिजे. पण त्याला बराच वेळ लागणार…. अशी सगळी चर्चा चालली होती.
त्यातलं हे शेवटचं वाक्य ऐकल्यावर सूर्या एकदम ओरडला, “अरे ते इंजिन !”
सगळ्यांनी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं. मग एक काका म्हणाले, “कसलं इंजिन ? इथे झाड पडलंय मोठं आणि तुम्ही काय बोलताय?”
सूर्या म्हणाला, “अहो काका… इंजिन… रेल्वेचं इंजिन ! इथून रोज संध्याकाळी पावणेसहाला एक ट्रेन जाते ना… ती आली तर केवढा मोठा अॅक्सिडेंट होईल.” सगळ्यांनाच ते पटलं. मोठ्या लोकांची धावपळ सुरू झाली. ते काका मुलांना म्हणाले, “तुम्ही मुलं आधी घरी जा बघू. मोठं वादळ होईल असं दिसतंय, तुम्ही बाहेर कशाला फिरताय?”
सूर्या म्हणाला, “आम्ही घरीच चाललो होतो काका, तेवढ्यात हा आवाज आला म्हणून बघायला आलो. पण आता त्या ट्रेनला कसं थांबवायचं आपण?”
“आपण काही नाही करायचं. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं. काय करायचं ते मोठी माणसं बघतील.” एवढं बोलून ते शेजारच्या माणसाकडे वळले. तो माणूस सतत कोणालातरी फोन लावायचा प्रयत्न करत होता. काका म्हणाले, “काय राजूदादा, फोन लागतोय का नाही रेल्वेला ?” राजूदादा म्हणाला, “नाय ना काका. फोनच लागत नाहीयेत. या कालच्या पावसाने फोन बंद पडलेत की काय कळेना.”
“इथे आहे तेवढा गोंधळ बास आहे. त्यात आणि लहान मुलांची भर नकोय.” असं म्हणून काकांनी या चौघांना तिकडून हुसकून दिलं. पण त्यांच्यापैकी कोणीच घरी जाणार नव्हतं. थोडं लांब गेल्यावर इशा म्हणाली,
“यांचा फोन लागला नाही तर रे?” शमीम म्हणाला, “नाहीच लागणार! आमच्या घरचा फोन तर कालपासून बंद पडलाय. आणि अब्बांच्या मोबाइलला पण सकाळपासून रेंज नाहीये.”
सूर्या म्हणाला, “आपण थांबवायची ट्रेन !”
राणू म्हणाली, “अरे पण कशी थांबवणार आगगाडी ? आपण तर कोणाला फोन करू शकत नाही आणि कुठे जाऊपण शकत नाही.”
सूर्या म्हणाला, “मी सांगतो काय करायचं ते. आपण थांबवू. कारण त्या ट्रेनचे ड्रायव्हरकाका माझ्या ओळखीचे आहेत.”
शमीम म्हणाला, “ओळखीचे म्हणजे काय ? ते काय तुला नावाने थोडीच ओळखतात ?”
सूर्या म्हणाला, “नावाने नाही ओळखत, पण मी रोज त्यांना टाटा करायला रस्त्यात थांबतो ना! ते रोज मला टाटा करतात. आज मला टाटा करायला येतील ना….” त्याने त्याचा प्लॅन सांगितला. तो सगळ्यांना पटला. मग सगळेजण मिळून धावत सूर्याच्या घरी गेले. सूर्याची आई घरी नव्हती. मग त्याने शेजारच्या काकूंकडून किल्ली आणली. एकीकडे पाऊस पडतच होता. त्यामुळे सगळेजण चांगलेच भिजले होते.
सूर्याने पलंगावर रात्री घालायची स्वच्छ पांढरी चादर ओढून काढली. आईच्या कपाटातून फॅब्रिक पेंटिंगचे सगळे रंग बाहेर काढले. ईशा आणि राणू ती चादर घेऊन हॉलमधे बसल्या. त्यांनी त्यावर लाल मोठ्या अक्षरांत लिहिलं, ‘थांबा ! धोका!’ आणि त्याच्या शेजारी कवटी आणि दोन हाडं असं ‘धोका’ दाखवणारं चित्र काढलं.
तोवर सूर्याने अजून एक पांढरी चादर शोधली. आईची काजळाची डबी, शाईची बाटली, स्केचपेन्स असं सगळं साहित्य गोळा करून तो आणि शमीम चित्र काढायला बसले. शमीमला चित्रकलेत कायम पहिलं बक्षीस मिळायचं. आत्तासुद्धा त्याने चादरीवर चित्र काढायला सुरुवात केली.
also read : Story of When I go for a walk! in Marathi
आधी दोन रूळ काढले आणि मग त्या रुळांवर आडवं पडलेलं झाड. चित्र काढून होईपर्यंत शमीम काळ्या- निळ्या रंगाने पूर्ण रंगून गेला होता. कारण इतका मोठा ब्रश किंवा असं काही साहित्य नसल्यामुळे जाड रेषा काढण्यासाठी तो सरळ बोटंच शाईत बुडवत होता. एकीकडे सूर्या या सगळ्यांना घाई करत होता. कारण पाच वाजून गेले होते. सूर्याने चादरी बांधण्यासाठी घरात सुतळी शोधायला सुरुवात केली. सुतळी सापडत नाही म्हटल्यावर त्याने कपडे वाळत घालायच्या दोऱ्या सोडल्या.
मच्छरदाणीच्या दोऱ्या, लोडाच्या कव्हरमधल्या नाड्या असं सगळं गोळा केलं. मग आईचं कपाट उघडलं. खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला दोन ओढण्या मिळाल्या – एक लाल आणि एक केशरी.
हे सगळं साहित्य घेऊन चौघंजण साडेपाच वाजता केदारच्या घरातून बाहेर पडले. तोवर पाऊस जवळजवळ थांबला होता. सूर्याने किल्ली तशीच खिशात घातली आणि चौघंजण रेल्वेच्या रुळांकडे सुसाट धावत निघाले. सूर्या त्याच्या नेहमीच्या जागी जाऊन पोचला. ही जागा जिथे झाड पडलेलं होतं त्याच्या खूप अलीकडे होती. त्यामुळे इथे जर का धोक्याची पहिली सूचना मिळाली तर इंजिनकाकांना ट्रेन थांबवायला पुरेसा वेळ मिळाला असता. तिथे त्या सगळ्यांनी ‘थांबा! धोका!’ असं लिहिलेल्या चादरीची दोन टोकं झाडाला बांधली. त्याची उरलेली दोन टोकं पकडून ईशा तिथे उभी राहिली.
मग तिकडून सगळेजण झाड पडलेलं होतं तिकडे जायला लागले. थोडंसं पुढे गेल्यावर सूर्याने अशी जागा शोधली जिथून इंजिनकाकांना लांबूनही मुलांनी बांधलेली चादर दिसेल. तिथे त्यांनी रुळावर झाड पडलेलं चित्र असलेली चादर दोन उभ्या काठ्यांना बांधली. ती चादर उभीच्या उभी धरून शमीम तिथे उभा राहिला. त्याच्या थोडं पुढे लांबून दिसेल अशा बेताने लाल ओढणी घेऊन राणू उभी राहिली.
राणू उभी राहिली आणि सूर्या तसाच धावत पुढे निघाला. चांगली जागा बघून तो थांबला. तेवढ्यात त्याला लांबून इंजिनाची शिट्टी ऐकू आली. आता सूर्या त्याच्या मूळ टाटा करायच्या जागेपासून आणि पहिल्या खुणेपासून जवळजवळ दोन किलोमीटरपेक्षा जास्त लांब आला होता. जोरात आहे हे लक्षात ट्रेनचा स्पीड नेहमीसारखा आल्यावर त्याचा जीव अक्षरशः कानांत गोळा झाला होता.
सूर्याच्या मूळच्या जागेच्या थोडंसं आधी इंजिनवाले काका शिट्टी वाजवायचे तशी त्यांनी जोरात शिट्टी वाजवली. आपल्या खुणा काकांना समजल्या नाहीत तर काय होईल, या कल्पनेने सूर्याला रडू यायला लागलं. पण ट्रेन थांबवण्यासाठी जे काही करण्यासारखं होतं ते त्याने आधीच केलेलं होतं. आता फक्त हातातली ओढणी जोरात फडकवायची आणि जोरजोरात हातवारे करायचे, एवढंच त्याच्या हातात होतं. इकडे इंजिनकाकांनी त्यांच्या नेहमीच्या जागी पाहिलं, तर नेहमीच्या छोट्या मुलाऐवजी त्याच वयाची मुलगी भल्यामोठ्या चादरीवर धोक्याचा इशारा करून त्यांना थांबण्यासाठी खाणाखुणा करत होती.
काही तरी गडबड आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आलं. ट्रेनला गाडीसारखा अर्जंट ब्रेक लावता येत नसल्यामुळे त्यांनी वेग कमी करायला सुरुवात केली.
वेग थोडा कमी झाला होता, पण तरीही अजून ट्रेन चांगलीच जोरात होती. तेवढ्यात त्यांना त्याच वयाचा एक मुलगा अजून एक चादर घेऊन उभा असलेला दिसला. त्या चादरीवर तर रुळावर झाड पडल्याचं चित्रं काढलेलं स्पष्ट दिसत होतं. गाडीचा स्पीडही कमी होत होता. त्या मुलाला ओलांडून पुढे गेल्यावर अजून एक मुलगी लाल ओढणी फडकावून जोरजोरात थांबायच्या खाणाखुणा करत होती. आता ट्रेनचा स्पीड बऱ्यापैकी कंट्रोलमधे आला होता, पण गाडी अजून धावतच होती आणि त्या रुळावर पडलेल्या झाडाकडे बऱ्यापैकी वेगाने चाललेली होती. अजून थोडं पुढे गेल्यावर इंजिनवाल्या काकांना त्यांचा नेहमीचा छोटा दोस्त दिसला. त्याने हातात केशरी ओढणी धरली होती आणि तो ती जोरजोरात हलवत होता. त्याच्यापाशी पोचेपर्यंत ट्रेनचा वेग इतका कमी झाला होता की इंजिनवाल्या काकांना पहिल्यांदाच सूर्याचा चेहरा नीट दिसला… तो चेहरा अश्रूनी पूर्ण भरला होता. कारण सूर्या ओक्साबोक्शी रडत होता.
ट्रेनचं इंजिन जसं सूर्याला ओलांडून पुढे गेलं तशी त्याने त्याच्याबरोबर धावायला सुरुवात केली. आधी इंजिन चांगलंच वेगात होतं आणि थोड्याच वेळात जवळजवळ सगळी ट्रेन सूर्याला ओव्हरटेक करून पुढे निघून गेली. पण सूर्या धावतच राहिला आणि हळूहळू त्याच्या डोळ्यांसमोरच गाडीचा स्पीड कमी कमी व्हायला लागला.
आता सूर्याला समोर लांबवर पडलेलं ते झाड दिसत होतं आणि त्याच्या दिशेला जाणारी ट्रेन पण दिसत होती. सूर्या सगळा जीव एकवटून ट्रेनबरोबर पळायचा प्रयत्न करत होता. त्याने हातातली ओढणी केव्हाच मागे टाकून दिली होती. ट्रेन आता त्या झाडापासून अगदी जवळ आली होती, पण आता तिचा वेग सूर्याइतकाच कमी झाला होता.
हळूहळू तिचा वेग सूर्यापेक्षाही कमी झाला. सूर्याने एक डबा मागे टाकला, अजून एक डबा मागे टाकला. आता सूर्याला खिडक्यांमधून बाहेर बघणाऱ्या माणसांचे चेहरे पण दिसत होते. काही डब्यांच्या दारांतली माणसं ट्रेन मधेच का थांबली ते बघायला दारातून डोकावत होती. त्यातले काहीजण सूर्याकडे आश्चर्याने बघत होते; पण सूर्याचं मात्र यांच्यातल्या कोणाकडेच लक्ष नव्हतं. त्याला फक्त ते लाल इंजिन आणि त्यातले ड्रायव्हरकाका दिसत होते. सूर्या पळत पळत इंजिनपाशी पोचला तेव्हा ट्रेन त्या पडलेल्या झाडापासून काही फुटांवर थांबली होती आणि इंजिनकाका इंजिनमधून खालीच उतरत होते. सूर्या त्यांच्यापाशी पोचला तेव्हा त्यांनी सूर्याला घट्ट मिठी मारली आणि उचलूनच घेतलं. ते किती तरी वेळ सूर्याला मिठीत पकडून उभे होते. सूर्या अजूनही रडत होता. इंजिनकाका एकीकडे स्वतः रडत होते आणि एकीकडे सूर्याला थोपटून शांत करत होते.
ट्रेन थांबली म्हटल्यावर गावातली माणसं तिथे गोळा व्हायला लागली. राणू, शमीम आणि ईशा पण मागून आले. गावातल्या लोकांना हे कळेना, की कोणालाच फोन लागलेला नसताना ट्रेन थांबली कशी? आणि ट्रेनमधल्या लोकांना हे कळेना, की स्टेशन किंवा सिग्नलसुद्धा नसलेल्या ठिकाणी अशी मधेच ट्रेन का थांबली ? हळूहळू लोक बाहेर यायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण किती मोठ्या संकटातून वाचलो ते. गावातल्या माणसांच्याही हळूहळू लक्षात यायला लागलं, की या चार लहान मुलांनी ट्रेन थांबवली आहे. सगळेजण सूर्या आणि गँगचं कौतुक करत होते.
तेवढ्यात सगळी गर्दी बाजूला करत सूर्याचे आई-बाबा आले. त्यांना शेजारच्या काकूंनी दोन्ही बातम्या एकदमच दिल्या होत्या, की रेल्वे ट्रॅकवर झाड पडलं आणि सूर्या ट्रेनच्या वेळेला त्याच दिशेला धावत जाताना दिसला. केदारचं रेल्वे इंजिनाचं वेड माहिती असल्यामुळे सूर्या समोर दिसेपर्यंत आई-बाबांच्या जिवात जीव नव्हता. सूर्याचे आई-बाबा आले म्हटल्यावर इंजिनकाकांनी सूर्याला खाली ठेवलं आणि ते आई-बाबांच्याच पाया पडायला लागले. म्हणाले, “तुमच्या मुलाने आज किती तरी माणसांचा जीव वाचवला. ही मुलं जर वाटेत धोक्याच्या सूचना देत थांबली नसती तर आज काय झालं असतं त्याची कल्पनाही करायला नको वाटतं आहे.” या मुलांनी नेमकं केलं तरी काय, असा आई-बाबा विचार करत असताना सिमरन, ईशा आणि शमीम आईजवळ आले. आणि त्यांनी आपापल्या हातातली चादर आणि ओढणी केदारच्या आईला दिली.
also read : Story of When I go for a walk! in Marathi
इंजिनकाका म्हणाले, “वहिनी, या चादरींचा आता तुम्हाला काही उपयोग नाही, तर या मी नेऊ का ? आमच्या ऑफिसमधे मी या चादरी लावीन, म्हणजे लोकांना लक्षात येईल की या पोरांनी आमचा जीव कसा वाचवला ते…” मग सगळ्या लोकांनी मिळून ते झाड रुळांवरून बाजूला केलं आणि बऱ्याच वेळानंतर ट्रेन सुटली.
इंजिनकाका सूर्याला कधीच विसरले नाहीत. त्यांनी घरी गेल्यावर सूर्याला पत्र पाठवलं. त्यात त्यांनी सूर्याला त्यांच्या संघटनेचा एक टी-शर्ट आणि कॅप पाठवली होती. त्यानंतर सूर्याला आणखीही खूप बक्षिसं मिळाली; पण त्या टी-शर्ट आणि कॅपइतकं त्याला काहीच आवडलं नाही.
Leave a Comment