Story of Jhoom Jhoom Jhumroo… : कुठल्याही प्राणिसंग्रहालयात सहसा जंगली प्राणी असतात. पण अनेकदा सुटका केलेले प्राणीही तिथे तात्पुरते ठेवावे लागायचे.
एकदा असंच झालं. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कोंडवाड्यामध्ये तीन- चार भटक्या गायी दाखल झाल्या होत्या. त्यातली एक गाय गाभण होती आणि तिचे दिवस भरत आले होते. मध्यरात्री कधीतरी त्या गायीला प्रसववेदना सुरू झाल्या आणि पहाटे तिने एका सुंदर, गोंडस वासराला जन्म दिला. सकाळी सकाळी या गुरांचे मालक कोंडवाड्यात आपापली गुरं सोडवण्यासाठी जाऊन पोहोचले. कामगारांनी त्या गायीच्या मालकाला तिचं वासरू दाखवलं आणि त्याचाही दंड भरायला सांगितलं. ते वासरू होतं खोंड. त्या मालकाच्या दृष्टीने निरुपयोगी. त्याने ते वासरू घेऊन जाण्याच साफ नाकारलं. कालवड असती तर दंड भरूनही नेलं असतं, पण हा बिनकामाचा बैल कशाला नेऊ, असं त्याचं म्हणणं.
Story of Jhoom Jhoom Jhumroo…
मालक गायीला टेम्पोत घालून निघाला. नुकत्या जन्मलेल्या वासराला एकटं सोडून जाताना त्या गायीने कसा हंबरडा फोडला असेल, विचार करा. तिचं हंबरणं ऐकून वासरूही खूप तडफडलं. खूप वेळ ओरडलं. पण आपली आई परत येत नाही, असं बघून तिथल्याच गवताच्या भाऱ्यावर झोपी गेलं. आख्खा दिवस त्याने झोपून काढला.
त्या रात्री कडाक्याची थंडी होती. त्यामुळे पहाटे जाग येऊन ते वासरू भुकेने कळवळत बसलं होतं. पालिकेचे अधिकारी राऊंडवर कोंडवाड्यात पोहोचले, तेव्हा ते तान्हं बेवारस वासरू पाहून त्यांनाही खूप वाईट वाटलं. त्यांनी त्या वासराला ताबडतोब आमच्या पार्कमध्ये पाठवण्याचा आदेश दिला. त्यानंतर तासाभरातच ते वासरू आमच्याकडे आलं. तेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही सगळी हकीकत आम्हाला समजली.
आम्ही त्याचं नाव ठेवलं झुमरू, छोटे कान, गोंडा असलेली छोटीशी शेपटी. त्याच्या कपाळावर मधोमध पांढऱ्या रंगाचा एक सुरेख चांदवा होता. फारच गोड वासरू होतं ते. पण एवढं तान्हें दूध-पितं वासरू सांभाळायचं म्हणजे आमची कसरतच होती. शिवाय जन्मल्या जन्मल्या ते उपाशी राहिलं होतं. आम्ही त्याच्यासाठी दूध आणि पाणी उकळून घेतलं. लहान बाळाच्या दूध पिण्याच्या बाटलीतून ते त्याला देण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. बूच त्याच्या तोंडात सरकवल, पण ते त्याला चोखता येईना. एक-दोनदा अयशस्वी प्रयत्न करून त्याने हताशपणे मान टाकली आणि बराच वेळ ते नुसतं पडून राहिलं. त्याला त्याची आई हवी असणार.
मग मी थोडं डोकं लढवलं. गरम पाण्यात टर्कीश टॉवेल बुडवून त्याने त्याचं अंग पुसून काढलं. त्याच्या आईच्या उष्ण जिभेसारखाच त्या टॉवेलचा स्पर्श असेल, असा माझा अंदाज होता. ही युक्ती उपयोगी पडली असावी. मी बाटलीचं बूच तोंडात दिल्यावर वासराने ते अधाश्यासारखं ओढायला सुरुवात केली. चार-पाच वेळा दुधाऐवजी तोंडात फक्त हवा गेल्यामुळे त्याला चांगलाच ठसका लागला. पण लवकरच त्याला बाटली कशी चोखायची हे लक्षात आलं. पुढच्या १०-१५ मिनिटांत अर्धा लिटर दूध त्याच्या पोटात गेलं आणि आमचा जीव भांड्यात पडला.
also read : Story of Mesolea in Marathi
पोट भरल्यावर ते वासरू सरळ आमच्या बेडरुममध्ये घुसलं आणि आमच्या दोघांच्या मध्ये येऊन पहुडलं. झोपण्यापूर्वी त्याच्या थोड्या फार ‘हम्मा हम्मा’ अशा हाका मारून झाल्या. आम्हाला त्या अम्मा अम्मा अशाच ऐकू येत होत्या. तेजसच्या अम्मीने त्याला कुशीत घेतलं आणि ‘झोप रे झुमरू…’ असं म्हणत दामटवून थोपटलं. जादू झाल्यासारखा झुमरू शांतपणे झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी झुमरू आमच्याही आधी उठून थेट बाथरुममध्ये गेला. भळकन मुतला आणि शेणाचे गोळे टाकून स्वतःचंच घर असल्यासारखा घरभर फिरू लागला. बाथरूममध्ये जाऊन हे प्रातर्विधी करावेत, ही अक्कल त्याला कशी आली कुणास ठाऊक. पण आता गडी पुन्हा एकदा भुकाबला होता. आदल्या दिवशीप्रमाणेच त्याला दूध-पाणी मिसळून बाटलीने पाजलं. गडी खुश !
झुमरू आला तेव्हा आमच्याकडे पाशा आणि पिंटू नावाचे दोन कुत्रे होते. पाशा होता ग्रेट डेन जातीचा, पिंटू साधा गावठी! दांडगा असूनही पाशा खूप आज्ञाधारक होता आणि हुशारही. आम्ही म्हटलं, झुमरूला रुळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो का बघावं. पाशाला चुचकारत घरामध्ये बोलावलं आणि प्रेमाने समजावत झुमरूजवळ नेलं. पाशानेही समजुतीने झुमरूला प्रेमाने चाटलं आणि झुमरू अलगद आमच्या कुटुंबात सामील झाला. संध्याकाळी घराच्या आवारात पाशा-पिंटू खेळायचे. दूरवर फेकलेला चेंडू पळत जाऊन आमच्याकडे आणून द्यायचा, हा त्या दोघांचा आवडता उद्योग. आता झुमरूही आमच्यासोबत खेळू लागला. आपले छोटे कान हलवत खुरांबर उड्या मारत तो सर्वांबरोबर हुंदडायचा. आपल्या लहानग्या शेपटीचा गाँडा उडवत मस्ती करणाऱ्या झुमरूला बघायला आम्हाला भारी मजा वाटायची. संध्याकाळी खेळ संपला की पिंटू आणि पाशा त्यांचं जेवण मिळेपर्यंत बाहेरच्या ओट्यावर शांतपणे बसून असत. तेजसचा अभ्यास चालू असे. मी आणि प्रतिभा टीव्ही पाहत असताना झुमरू आम्हा दोघांच्या अगदी मध्येच हक्काने पाय दुमडून बसायला लागला.
एक-दोन आठवडे असेच गेले. झुमरू रुळला. छान वाढू लागला. सकाळच्या दुधानंतर दुपारी लंच टाईममध्ये संपत, राऊत किंवा गणपत या माझ्या सहकान्यांपैकी कोणीतरी आमच्या घरी येऊन त्याला दूध पाजून जात असे. हळूहळू त्याचा आहार चांगलाच बाढला. दोन-अडीच लिटर दूधही त्याला कमी पडू लागलं. आम्ही त्याला हिरवा चारा, आजूबाजूच कोवळं गवत द्यायला सुरुवात केली. त्याची पहिली भुकेची वेळ साधून चान्यामध्ये फळभाज्या, धान्य मिसळून ठेवू लागलो. सुरुवातीला तो या जेवणाकडे कुंकूनही पहात नसे. खूप भूक लागली तरच तो भाजीचे तुकडे खात असे. नंतर कोवळा हिरवा चारा तो अगदी आवडीने खाऊ लागला, पुढे त्याची भूक इतकी बाढली की त्याला जे खाण्यासारखं दिसेल ते तो गहम करून टाकायचा.
also read : Story of Mesolea in Marathi
एकदा गंमतच झाली. दुपारी जेवणाच्या वेळी मी घरी आलो, तेव्हा प्रतिभा डोक्याला हात लावून एकटीच हसत बसली होती. म्हणाली, “आज आपल्याला हॉटेलमधून पार्सल आणावं लागणार. घरात कुठलीच भाजी करता येणार नाही. कारण सगळे गोडतेल संपलंय.” मला कळेना परवाच महिन्याभराचं किराणा सामान भरलं असताना सगळं तेल कसं संपलं? मग उलगडा झाला. झुमरूला सकाळी सकाळी तेलाच्या बरणीचा शोध लागला होता आणि त्याने सगळं तेल पिऊन सफाचट केलं होतं. मी डोक्याला हात मारून घेतला. आम्ही बाहेर जाऊन मिसळ पाव खाऊन आलो. येताना तेलाच्या पिशव्या आणून त्या सरळ फ्रीजमध्ये लपवून ठेवल्या. पण एवढ गोडतेल पचवूनही झुमरू मजेत होता.
त्याचं असं मिळेल त्या पदार्थावर डल्ला मारणं पुढेही सुरू राहिलं. मळलेल्या कणकेचे गोळे तो गायच करायचा. बनपाव गायब व्हायचे. दूध तर वर राहिलं की संपलं म्हणूनच समजा. झुमरूला खायला कमी पडतं होतं म्हणावं, तर तसंही नव्हते. पण छोट्या मुलाप्रमाणे जे दिसेल ते चाखून बघण्यात आणि आवडलं की त्याचा फडशा पाडण्यात त्याला मजा येत होती
एके दिवशी दुपारी घरी आलो, तर घराभोवतीची जास्वंद आणि तुळशीची रोपं फुलांसकट गायच झालेली. आमचा निरागस चोर आता चांगलाच सोकावला होता. त्याला आवर घालणं गरजेचं होते.
त्याच सुमारास आमचा इन्स्पेक्टर मित्र दारा इराणी एकदा चहासाठी घरी आला. तेव्हा झुमरू आमच्या दोघांच्या मध्ये बसून आरामात टीव्ही बघत होता. झुमरूचे इतर उद्योगही त्याच्या कानावर होतेच. तो म्हणाला, “अरे, एवढ्या लाडाने हा बैलोबा ऐदी होईल, त्यापेक्षा मी त्याला शेतावर घेऊन जातो. थोडं फार काम तरी शिकेल.” आम्हालाही ते पटलं. झुमरू अंगानेही वाढायला लागला होता. त्याला घरात ठेवणं आम्हाला अवघड झालं असतं आणि प्राणिसंग्रहालयात बैलांसाठी कशी जागा करणार? त्यामुळे त्याच संध्याकाळी झुमरू इन्स्पेक्टर साहेबांच्या गाडीतून त्यांच्या शेतावर रहायला गेला तो कायमचाच !
also read : Story of Mesolea in Marathi
पुढे कित्येक दिवस आम्हाला संध्याकाळी टीव्ही बघताना झुमरूची हमखास आठवण यायची, सुटका केलेलं एक तान्हं वासरू पुढे असा लळा लावेल, असं कुणाला वाटलं असतं !