Story of Our time will come…

Story of Our time will come… in Marathi : अपना टाइम आएगा… गोष्ट.

1 min read

Story of Our time will come… : चपक्… चपक्… चपक्… चपक्… चिखलातून चप्पल घालून जाताना आवाज होत होता. त्या आवाजात राघूची तंद्री लागली होती. पावसाळ्याचे दिवस होते. जिकडेतिकडे हिरवंगार झालं होतं. भाताची रोपं तरारली होती. वाफ्यांत पाणी साठलं होतं. सगळीकडे भाताचा वास दरवळत होता.

राघू सातवीत होता. त्याचे वडील सोन्याबापू एस.टी.त कंडक्टर होते. फाट्यावर त्यांना डबा द्यायचं राघूचं नेहमीचं काम होतं. आजही सकाळी सकाळी तो आईने दिलेला भाकरी-भाजीचा डबा घेऊन रायबाच्या वाडीकडे निघाला होता. राघूचं घर रायबावाडी आणि पलीकडच्या डोणेवाडीच्या मधोमध होतं. मध्ये एक साधीशी बैलगाडीची वाट होती. आता पावसामुळे तिथे एवढा चिखल झाला होता, की वाट कोणती आणि शेत कोणतं, ओळखू येईना झालं होतं. बैलगाडीच्या धावेमुळे तयार झालेल्या खळगीत चहाच्या रंगाचं पाणी साठलं होतं. त्यात उडी मारून तिथलं पाणी उडवायला राघूला आणि त्याचा दोस्त महादूला फार आवडायचं. आज महादू नव्हता. महादूच्या वडिलांना, म्हणजे दादांना तालुक्याच्या गावी नेलं होतं. त्यांना चार दिवसांपासून ताप येत होता. त्यांना कोरोना झालेला नसू दे, अशी प्रार्थना महादू आणि राघू रोज शिवारातल्या मारुतीकडे करत होते. शिवारातल्या मैदानावरच राघू एरवी मित्रांसोबत क्रिकेट खेळायचा. सध्या पावसामुळे ते मैदानही पूर्ण भिजून गेलं होतं. राघूला क्रिकेट खेळायला आवडायचं, तसंच क्रिकेटवरचे लेख वाचायलाही आवडायचं. त्यातले क्रिकेटपटूंचे फोटो कापून वहीत ठेवणं हा तर त्याचा छंद होता. सगळ्यांप्रमाणेच धोनी आणि विराट हे त्याचे अतिशय आवडते खेळाडू होते.

Story of Our time will come…

रायबाची वाडी आणखी अर्धा-एक किलोमीटर अंतरावर असेल. राघूचे वडील रोज सकाळी सायकलने वाडीपर्यंत जायचे आणि फाट्यावरून तालुक्याच्या गावाला जायचे. तिथून पुढे त्यांची ड्यूटी जिथे लावली असेल त्या गावाला जावं लागायचं. दोन दिवसांतून एकदा मुक्कामी पण जावं लागायचं. आज त्याना पुन्हा मुक्कामाची ड्यूटी आली होती. त्यामुळेच राघूकडे त्यांना डबा पोचवायचं काम आलं होतं. सोन्याबापू फार सरळ आणि सज्जन माणूस होता. वाडीतल्या सगळ्या लोकांना त्यांचा फार आधार होता. त्यांचं तालुक्याच्या गावी रोजचं येणं-जाणं असल्याने अनेक लोकांची पार्सलं पोचवण्याचं, वस्तू नेण्याचं-आणण्याचं, निरोप देण्याचं काम सोन्याबापू हसतमुखाने करत. गावातली काही मुलं शिकायला तालुक्याच्या गावी जात. ती सोन्याबापूंच्या एसटीनेच जात. त्यांच्यावर भरोसा ठेवून गावकरी आपल्या पोरांना निश्चिंतपणे त्यांच्या ताब्यात देत असत.

आज राघू विशेष खुशीत होता. त्याचे बापू त्याच्यासाठी तालुक्याच्या गावावरून एक मस्त भेटवस्तू आणणार होते. राघूला खूप दिवसांपासून एक घड्याळ हवं होतं. शेतावर काम करताना, वाडीला जाताना-येताना, क्रिकेट खेळताना, एसटीच्या वेळा पाळताना घड्याळ सारखंच लागायचं. राघूला सतत दुसऱ्याला वेळ विचारावी लागे. म्हणून त्याने बापूंकडे घड्याळ मागितलं होतं. अखेर खूप हट्ट केल्यानंतर बापूंनी त्याला घड्याळ आणून देण्याचं कबूल केलं होतं. आज बापूंच्या पगाराचा दिवस होता. त्यामुळे ते आज नक्की घड्याळ आणणार, याची राघूला खात्री होती.

झूम… झुझ्ग, झुइग… झूम झूम… एकदम आवाज आले, तसा राघू दचकला. त्याने समोर पाहिलं तर चार-पाच खूप भारी, दणकट पांढऱ्या कार त्या कच्च्या रस्त्याने वेगाने पलीकडच्या डोंगराकडे जाताना दिसल्या. त्या गाड्यांना काळ्या काचा होत्या. त्यात कोण बसलंय ते कळत नव्हतं, पण कुणी तरी मोठी, तालेवार माणसं असणार हे नक्की. पलीकडच्या डोंगरावर एक मोठी संस्था होती. तिथे गिर्यारोहण, साहसी खेळ यांचं प्रशिक्षण चालायचं, म्हणे. त्या भागात अनेक खासगी लोकांची रिसॉर्ट पण होती. तिकडे जाणारा रस्ताही ‘खासगी मालमत्ता’ असा बोर्ड लावून बंद केलेला होता. तिथे एक वॉचमन कायम असायचा. त्याला नाव विचारलं, तर तो ‘मला सुभेदार म्हणा’ एवढंच म्हणायचा. राघू आणि महादूची सुभेदारकाकांशी गट्टी होती.

also read : Story of Mother-in-law’s chair in Marathi

राघू जरा पुढे गेला, तर सुभेदारकाका आलेच समोरून. राघूने त्यांना वेळ विचारली. नऊ वाजून वीस मिनिटं झाली होती. बापूंच्या एसटीला अजून वेळ होता. फाटाही इथून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर होता. मग राघू सुभेदारांच्या केबिनमध्ये येऊन बसला. सुभेदारांकडे ‘टायगर’ नावाचा गावठी, पण चांगला दणकट कुत्रा होता. राघूची आणि त्याचीही दोस्ती होती. राघू आत शिरल्याबरोबर टायगर आलाच शेपटी हलवत. राघूने त्याला थोपटलं. त्याच्या गळ्याखाली खाजवत त्याने सुभेदारकाकांना विचारलं, ‘कसल्या या गाड्या, हो काका? कोण लोक आलेत ?’

सुभेदारकाका म्हणाले, ‘आता काय सांगू? कुणाला सांगायचं नाही, अशी मला सक्त ताकीद आहे, बाबा. फार मोठे लोक आहेत. तुला कळलं, तर तू आश्चर्यानं उडशील…’

राघू म्हणाला, ‘सांगा की… सांगा की काका… मी कुण्णाकुण्णाला सांगणार नाही.’

‘बरं… इकडं ये…’ सुभेदारकाका म्हणाले. ‘कान कर इकडं…. अस म्हणत ते राघूच्या कानात काही तरी पुटपुटले.

ते ऐकून राघूने मोठ्ठा ‘आ’ वासला. ‘काय सांगताय काय, काका? खरंच? कोहली आणि आपली सगळी टीम आलीय इथं ?’

‘श्शू… शांत शांत शांत बस, बाबा. नोकरी जाईल माझी…’

राघूला एकदम आठवलं. पुण्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक टेस्ट मॅच खेळायला आपली टीम आली होती. त्या मॅचमध्ये आपण तीन दिवसांतच वाईट हरलो होतो. पण त्यानंतर आपली टीम इकडे आलीय, हे काही त्याला खरं वाटेना. पण डोंगरावरच्या संस्थेत ते दोन दिवसांसाठी आले आहेत, असं काकांनी त्याला सांगितल्यावर मग विश्वास ठेवावाच लागला. मगाशी गेलेल्या त्या कारमधून चक्क आपले आवडते क्रिकेटपटू गेले होते, हे लक्षात येऊन राघू मनोमन हरखला. त्यांना बघायला मिळालं तर? त्याच्या डोळ्यांतले भाव वाचूनच सुभेदारकाका बोटानेच ‘नाही नाही’ म्हणाले.

राघू हिरमुसला होऊन फाट्याकडे निघाला. टायगरही त्याच्या मागे मागे थोडं अंतर हुंदडत आला. ‘टायगर, परत जा… काकांना सोबतीला थांब, असं राघू म्हणाल्याबरोबर जणू समजल्यासारखं टायगर मागे वळला.

राघू फाट्यावर येऊन उभा राहिला. तिथे एक पडकी शेड होती. शेजारी वडाच्या झाडाखाली एरवी फळ विकणाऱ्या मावशी बसायच्या. सध्या पावसामुळे आणि कोरोनामुळे हल्ली त्या दिसत नसत. राघू उजवीकडच्या वळणाकडे बघत बसला. त्याची ही नेहमीची सवय होती. वळणावर एस.टी. दिसली, की तो एक ते शंभर आकडे मोजायला सुरुवात करायचा. साधारण सत्तरच्या पुढे आकडे गेले, की एस.टी. बरोबर समोर येऊन थांबायची.

also read : Story of Mother-in-law’s chair in Marathi

आत्ताही तसंच झालं, वळणावर लालचुटुक रंगाची, पण आता चिखलाने माखलेली गाडी दिसली आणि राघूने ‘एक, दोन, तीन… सुरू केलं. बरोबर पंचाहत्तर आकड्याच्या वेळी एस.टी. समोर येऊन थांबली. दार उघडलं आणि सोन्याबापू खाली उतरले. वडिलांना बघून राघूचा चेहरा उजळला. ‘काय राघवा, डबा आणलायस का? त्यांनी राघूच्या केसांत हात फिरवत विचारलं, त्यांच्या चेहऱ्यावरचे मिश्कील भाव लपत नव्हते. ‘हो… हा घ्या… असं म्हणत राघूने डबा दिला. ‘आणि माझं घड्याळ?’ राघूने अधीरतेने विचारलं.

‘थांब, थांब,’ म्हणत बापू शेडमधल्या बाकावर बसले आणि म्हणाले, ‘राघवा, या वेळी काही बड्याळ आणायला जमलं नाही, रे…’

राघू एकदम खट्टू झाला, ‘का पण? तुम्ही आज आणणार होतात ना…? असं म्हणताना त्याचा चेहरा अगदी रडवेला झाला.

‘अरे हो…’ बापू समजुतीच्या स्वरात म्हणाले, ‘आपल्या महादूचे दादा हॉस्पिटलात आहेत. मी आजच त्याच्याकडं जाऊन आलो. त्यांना प्लाझ्मा द्यावा लागला. मला त्यांच्या उपचारांसाठी पैसे द्यावे लागले… म्हणून तुझं घड्याळ राहिल. पण पुढच्या महिन्यात मी नक्की घेणार तुला… आपल्या मारुतीची शप्पथ…

राधूला एकदम महादूचा चेहरा आठवला. त्याने मनातल्या मनात पुन्हा मारुतीरायाला हात जोडले. ‘शक्ती दे, बुद्धी दे’ हा नेहमीचा मंत्र मनातल्या मनातच परत म्हटला. तेवढ्यात ड्रायव्हर रामकाकांनी बापूंना हाक मारली. ‘राघू, सोड रे आता तुझ्या बापाला… आम्हाला लांबची ट्रिप आहे आज… ते हसत हसत गाडीतूनच म्हणाले. तशी बापू डबा आणि पैशांची कातडी पिशवी घेऊन लगबगीने उठले. गाडीचं दार लावून घेताना राधूला म्हणाले, ‘नीट घरी जा रे…’ त्यांनी डबल बेल मारली आणि एस.टी. भुर्रकन पुढे निघून गेली.

फाट्यावर आता कुणीही नव्हतं. राघूला काही तिथून हलावंसं वाटेना. तो समोरच्या बडाच्या झाडाकडे एकटक बघत बसला. त्या पारंब्यांतून, पानांतून वेगवेगळे आकार शोधण्याचाही त्याला नाद होता. त्याला आता तिथे सारखं घड्याळच दिसायला लागलं.

तेवढ्यात लांबून ‘झुम… झुम…’ आवाज आला. राघूने कान टवकारले. मगाच्याच त्या मोठ्या गाड्या आल्या असणार! तो नीट लक्ष देऊन बघू लागला. तेवढ्यात एक गाडी एकदम तिथे येऊन थांबलीच. करकचून ब्रेक मारत उभी राहिली. काळी काच खाली झाली. ‘वो माची पर जानेवाला रास्ता कहाँ से है? हम रास्ता भटक गए हैं… कुणी तरी आतून बोलत होत. राघू तीन ताड उडालाच… कारण साक्षात विराट कोहली होता कारमध्ये… काळा गॉगल आणि पांढरा टी-शर्ट घातलेला विराट राघुलाच पत्ता विचारत होता.

भानावर यायला राघूला दोन मिनिटं लागली. ‘विराट SSSS’ तो किंचाळलाच.

‘हां, मैं ही हूँ… किसी को बोलना मत… हम यहाँ जरा आराम करने आए हैं… बताओ तो माची पर कहाँ से रास्ता है?’

‘वो… वो… यहाँ से…’ राघूने फाट्याच्या जवळच्या वाटेकडे बोट दाखवलं.

‘एक काम करो… हमारे साथ आओ… बैठो गाडी में… रास्ता दिखाओ जरा..’

आता तर राघू इतका खूश झाला, की त्याला काय करावं ते समजेनाच. विराटने दार उघडलं आणि त्याला गाडीत शेजारी बसवून घेतलं. राघूला आता चक्कर यायचीच बाकी होती. त्याने रस्ता दाखवला. फाट्यावरून आत सुभेदारकाकांची केबिन दिसताच, ड्रायव्हर म्हणाला, ‘यही रास्ता है सर… हम आ गये…”

रस्त्यात राघू एकटक विराटच्या हातातल्या काळ्या वस्तूकडे बघत होता. ते घड्याळ आहे का नक्की काय ते त्याला कळत नव्हतं. केबिनपाशी गाडी आल्यावर राघू खाली उतरला. न राहवून त्याने विचारलं, ‘यह क्या है?’

also read : Story of Mother-in-law’s chair in Marathi

‘अरे, ये स्मार्ट वॉच है… चाहिये क्या?’ असं म्हणत विराटने चक्क ते काळं घड्याळ काढून राघूच्या हातात दिलं आणि बघता बघता त्याची गाडी निघूनही गेली.

सुभेदारकाका म्हणाले, ‘लकी आहेस, गड्या…’

तेवढ्यात त्यांच्या केबिनमधल्या रेडिओवर गाणं सुरू झालं अपना टाइम आएगा… अपना टाइम आएगा… राघू त्या तालावर उड्या मारायला लागला आणि टायगरही दोन पाय वर करून त्याला साथ देऊ लागला.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.