Story of Mother-in-law's chair

Story of Mother-in-law’s chair in Marathi : सासू-सुनेची खुर्ची गोष्ट.

2 min read

Story of Mother-in-law’s chair : सासू-सुनेची खुर्ची गोष्ट.आमच्या या छोट्या गावात सगळ्यांत मोठं असण्याचा मान आमच्या घराला मिळालेला आहे. घरातल्यांची संख्या, सध्याच्या, मी – माझा नवरा माझी एक-दोन वा एकच मूलच्या काळात अंमळ जास्तच म्हणायला हवी. लहान-मोठी मिळून तेरा-चौदा जण राहतो आम्ही आमच्या मोठ्या घरात. त्यात शाळेत जाणारी मुलं आहेत, कॉलेजात जाणारी तरुण मंडळी आहे, कामावर जाणारे पगारदार आहेत आणि ज्येष्ठ नागरिक पदाला पोहोचलेले सेवानिवृत्तही आहेत. या सर्वांनी एकत्र राहायचं म्हणजे घराचा आकार मोठ्ठाच हवा. घराला साजेसा दिवाणखाना म्हणजेच बैठकीची खोली आहे. सोफासेट, दिवाण आणि खुर्थ्यांनी बैठकीची खोली सुसज्ज आहे. आमच्याकडे नात्यागोत्यातल्या, ओळखी-बिनओळखीच्या आणि नव्यानं ओळख झालेल्यांचं येणं-जाणं असतं. सगळ्यांचं तोंडभरून स्वागत हे आमच्या घराचं वैशिष्ट्य आहे. मोठ्या आवडीनं विविध स्तरांतली माणसं आमच्याकडेयेतात, गप्पाटप्पांत भाग घेतात, चहापाणी होतं. सगळ्यांचा वेळ छान जातो. एकूण काय तर घरातल्यांचं आणि बाहेरून येणाऱ्यांचं तेवढ्या वेळेपुरतं मस्त चाललेलं असतं.

अलीकडं मात्र त्यात थोडा खंड पडू पाहतो आहे आमच्याकडे येणारे काही संशयी मुद्रेनं घरात प्रवेश करू लागले आहेत. घेऊन आलेल्या कामाबद्दल उभ्या उभ्या बोलू आणि लगेच कटायला घेऊ, असंही काहींना वाटू लागलंय की काय, असं आम्हाला वाटू लागलंय. यात महिलावर्गाची संख्या अधिक आहे. सहाएक महिन्यांपूर्वी त्या यायच्या, ऐसपैस गप्पा व्हायच्या. दिलेलं आवडीनं खाल्लं जायचं, पण आजकाल आमच्याकडची एक खुर्ची बसणाऱ्या महिलेला पाडते, असे कुजबुजल्या आवाजात बोललेलं आमच्या कानांवर येऊ लागलंय. सुरुवातीला या प्रकाराकडे आमचं दुर्लक्ष झालं, पण त्यानंतर वारंवार आमच्याकडं येऊन खुर्चीतून खाली पडणाऱ्यांच्या संख्येत भर पडू लागली आणि गंभीरपणे विचार करण्याची पाळी आमच्यावर आली. गोष्ट खरी आहे, की आमच्या दिवाणखान्यातल्या खुर्चीवर बसायला घेतलेली बाई अचानक खाली पडते ! पण, नेमकी खुर्ची कोणती, तिचा काही पत्ता अद्याप लागलेला नाही. एक जण पडली म्हणून खुर्ची बाजूला ठेवायला घ्यावी, तर दुसऱ्या खुर्चीवरून खाली पडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सगळ्या खुर्चा काढून त्या जागी सोफा सेट ठेवण्याचा खर्चीक विचारही आम्ही सध्या करतो आहोत.

Story of Mother-in-law’s chair

बाहेरून आमच्या भेटीस येणाऱ्यांपैकी सर्वांत पहिल्यांदा खुर्चीतून खाली पडल्या प्रधानांच्या कमळाबाई. अशाच एका रविवारच्या संध्याकाळी प्रधान मंडळी आमच्याकडे डोकावली. दोन-तीन पुरुष, पाच बायका, दोन लहान मुलं एवढी मंडळी आमच्याकडे आली. नेहमीच्या पद्धतीनं सगळ्या प्रधानांचं तोंडभरून स्वागत झालं.

“कसं काय ? आज अकस्मात दर्शन दिलंत?” मी घरातला कुटुंबप्रमुख या नात्यानं प्रधानांच्या ज्येष्ठांपैकी एकाला विचारलं.

“अकस्मात ? ते कसं काय ? निरोप पाठवला होता त्या ह्याच्याकडून.” प्रधानांपैकी एकानं माहिती पुरवली.

“पण तो कोण तो अद्याप पोहोचला नाही आमच्याकडे!’ मी वस्तुस्थिती कथन केली.

“तुमच्यातल्या एकाच्या व्हॉटस्अपवर निरोप दिला होता की…”

“व्हॉटस्अप? ते काय असतं?” मी माझं अज्ञान दर्शविलं.

“कुणी तरी एकाच्या मोबाइलवर कळवलं होतं…”

“आमच्याकडे कुणाला कधी रेंजच मिळत नाही… जाऊ दे. आलात ते बरं झालं. तरी ही मला म्हणत होती, प्रधानांकडचं कुणी या दिवसांत आलं नाही आमच्याकडे म्हणून…” मी अरुंधतीची साक्ष काढली.

अरुंधतीनं विचारलं, “अहो, पण कमळाबाई कुठं आहेत ? त्यांना नाही का आणलंत?” कमळाबाई म्हणजे अरुंधतीची समवयस्क. अलीकडेच त्यांनी दुसरी सून आणलीय.

“आलीय हो… कमळासुद्धा आलीय. वाटेत तिला तिची एक जुनी मैत्रीण दिसली. लगेच गाडीतून उतरली. म्हणाली, तुम्ही पुढं व्हा. मी येतेच हिच्याशी जरा बोलून. दोन मिनिटाची तर वाट आहे ! म्हणून आम्ही पुढं आलो. येईल ती एवढ्यात…”

आणि कमळाबाई दारात उभ्या असलेल्या दिसल्या. कमळाबाईंच्या आडव्यातिडव्या भारदस्त देहामुळे संपूर्ण दार भरल्यासारखं दिसलं !

“या… या… कमळाबाई. तुमच्या नावाचं ते गाणं कानांवर पडलं की, तुमची आठवण होतेच. या… बसा… तुमचीच वाट पाहत होतो आम्ही…” अरुंधतीनं तोंडभरून कमळाबाईंचं स्वागत केलं.

“हो… पाहताय माझी वाट,” असं म्हणत कमळाबाई पुढं आल्या. हाताजवळची खुर्ची ओढून त्या बसल्या. बसल्या कसच्या ? क्षणार्धात खुर्चीतून दाणदिशी खालीच पडल्या. खाली डोकं वर पाय अशीच चमत्कारिक अवस्था झाली त्यांची आणि भरीस भर म्हणून लगोलग खुर्चीही पडली त्यांच्या डोक्यावर. खुर्ची प्लॅस्टिकची होती म्हणून कमळाबाईंचं डोकं वाचलं. अन्यथा जखम झाली असती, मामला गंभीर झाला असता. “अहो! अहो, सांभाळा,” असं अरुंधती म्हणेपर्यंत कमळाबाईंचं ‘अधःपतन’ झालेलं सर्वांना दिसलं. काही जण पुढं सरसावले. काहींनी तोंडाचा ‘आ’ करून पाहिलं… एकदोघांना गंमत वाटल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरच्या बारीकशा हास्यामुळे जाणवलं.

also read : Story of Soragat in Marathi

हात देऊन उठवू पाहणाऱ्यांना कमळाबाईंनी हातानं रोखलं. “मला उचलायला जाल आणि माझ्याच अंगावर कोसळाल… मीच उठते.” पुढच्या एक-दोन मिनिटांत कमळाबाई उठून उभ्या राहिल्या.

“कंबर चेचून निघालीय… आई गंऽऽऽ’ आणि माझ्याकडे पाहून कपाळावर आठ्या घालत म्हणाल्या, “काय हो, मोडकी खुर्ची दिवाणखान्यात ठेवता ? तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना शिक्षा देण्याची नवी पद्धत सुरू केलेली दिसतेय… अगाईग SSS.”

“अहो, खुर्ची मोडकी नाहीये… नवी आहे!” माझ्या तोंडून शब्द गेले.

“हो… माझं वजन या तुमच्या नाजूक खुर्चीला सहन झालं नसेल…” खुर्चीकडं पाहत भुवया उडवत कमळाबाई म्हणाल्या.

“वजनाचं नाही हो… परवाच्या दिवशी तालीमशाळेतले एक पैलवान आले होते. माझ्या आठवणीप्रमाणं याच खुर्चीत बसले होते, पण मघाशी तुमचं झालं तसं नाही झालं त्यांचं ? काय गं?” मी अरुंधतीची साक्ष काढली.

“खुर्चीच्या अगदी कडेला बसलात काय?” दुसऱ्या एकानं शंका काढली.

“नाही… नाही! मी काही आयुष्यात पहिल्यांदा असल्या खुर्चीवर बसलेली नाहीय. हज्जार वेळा बसल्येय या आधी. एकदाही नाही पडले…” कमळाबाई सांगू लागल्या.

त्यांना पुढं बोलू न देता त्यांची सून म्हणाली, “पण, आज मात्र पडलात…”

“हो… पडले. माझीच चूक. निवडलेली खुर्ची मोडकीतोडकी आहे का, ते नाही पाहिलं आधी…” वैतागानं कमळाबाई उद्‌गारल्या.

“नाही… नाही. तशा तुम्ही व्यवस्थितच बसला असणार, पण काही तरी गडबड झाली, एवढं मात्र खरं. थांबा ! ती खुर्चीच बाजूला काढून ठेवतो… म्हणजे त्या खुर्चीत कुणी बसला आणि खाली पडला असं व्हायला नको.” मी खुर्ची बाजूला काढून ठेवत म्हणालो.

तेवढ्यात प्रधानांपैकी एक जण सांगू लागला, ” दोन-तीन महिन्यांपूर्वी त्या कुणाच्या तरी लग्नाला गेलो होतो. कुणाचं लग्न होतं ते आठवत नाही आणि ते महत्त्वाचंही नाही. महत्त्वाचं म्हणजे जेवणावळीच्या ठिकाणी एका आमंत्रिताला खुर्चीनं अस्साच दगा दिला होता. जेवणाचं भरलेलं ताट घेऊन तो खुर्चीसाठी आजूबाजूला पाहत होता. तेवढ्यात एका रिकाम्या खुर्चीकडे त्याचं लक्ष गेलं. त्या खुर्चीत दुसरा कुणी बसण्याआधी आपण बसून घ्यावं म्हणून तो पुढं झेपावला. खुर्चीत बसला आणि खुर्चीचे पाय डळमळले, चारी दिशांना पसरले आणि जेवणाचं ताट अंगावर घेऊन तो माणूस खाली जमिनीशी समांतर झाला होता… हा! हा! हा!”

“दुसरा पडला की तुला हसू येतं का?” कमळाबाईंनी – तीव्र निषेध नोंदवला.

“नाही. आता या क्षणी ते आठवलं आणि चित्र डोळ्यांसमोर उभं झालं, म्हणून हसू आलं. त्या वेळी आम्ही सगळेच गंभीर झालो होतो. वराकडच्यांनी वधूमंडळीकडे या प्रकाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती आणि त्या मंडळींनी आपले दोन्ही हात वर केले होते. वर-वधू मंडळींत भांडणाच्या निमित्ताची ठिणगी पडते की काय, असे वाटत असताना जेवणावळीच्या कंत्राटदारानं माफी मागितली होती. खुर्य्या मांडणाऱ्या पोऱ्यानं चुकून ती मोडकी खुर्ची ठेवल्याबद्दल तो त्याला नोकरीवरून काढून टाकणार होता! खुर्चीतून पडलेल्याला दुसरे ताट देण्यात आले, पण ते त्यानं साफ नाकारलं. म्हणाला, “कपडे खराब झालेत. आता इथं बसून राहणं केवळ अशक्य…”

त्याचं हे सगळं सांगून पूर्ण होण्याची वाट पाहत आमच्यातला एक जण म्हणाला, “नाही तरी लग्नमंडपातल्या खुर्चा जुन्यापुराण्याच असतात. त्यात पडायला होतंच, पण आमच्याकडच्या या खुर्चीत कमळाबाई पडल्या म्हणजे आश्चर्यच म्हणायला हवं. अहो, हल्लीच बाजारात आलेल्या एरवीपेक्षा थोड्या महागड्या नव्या ब्रँडच्या खुर्च्छा आहेत त्या…”

“होय… तिथला माणूस म्हणाला होता. कितीही वजनदार माणूस बसला तरी अजिबात कुणी पडणार नाही म्हणून… पण, कमळाबाई पडल्या!” दुसऱ्या एकानं पुस्ती जोडली.

कमळाबाईंनी सर्वांचं सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाल्या, “नाही… तुमची खुर्ची मजबूतच आहे; पण माझं वजन नाही पेललं तिला. डॉक्टर म्हणाले होते, वजन कमी करा म्हणून. प्रयत्न चालू आहेत.” एव्हाना खुद्द कमळाबाईंनीच आपलं ‘अधःपतन’ लाइटली घेण्याचं ठरवलेलं दिसलं आणि आम्हाला बरं वाटलं !

also read : Story of Soragat in Marathi

…तो विषय तिथंच थांबला. प्रधान मंडळींनी ऐसपैस गप्पा मारल्या. त्यांच्यासाठी मुद्दाम केलेल्या शिऱ्यावर ताव मारला. फरसाणाचे बोकाणे मारले. अरुंधतीच्या हातच्या स्पेशल चहाची चव चाखली आणि मंडळी निघाली. जाता जाता दादा प्रधानांनी गौप्यस्फोट केला, “अहो, मघाशी आल्या आल्या आम्ही येणार असल्याचं कळवलं होतं म्हणालो होतो ना; ती सगळी बंडलबाजीच बरं का… खरं म्हणजे तुम्हा मंडळींना सरप्राइज देण्यासाठीच आलो होतो आम्ही…”

“पण तुमच्याकडच्या खुर्चीनं आमच्या कमळाबाईंना सरप्राइज दिलं. तरी बरं, त्यांना लागलं नाही कुठं…” यावर कमळाबाईंसह सगळे हसले. कमळाबाई म्हणाल्या, ‘खरं म्हणजे कंबर अगदी चेचून निघालीय. घरी जाऊन गरम पाण्याचे शेक घेते. आयोडेक्स खसाखसा चोळते आणि तरी गुण पडला नाही तर डॉक्टरकडे जाते. त्याचं बिल मात्र तुमच्याकडेच पाठवते. नैतिक जबाबदारी आहे तुमची. पाहुण्यांसाठी मोडकी खुर्ची ठेवता काय ?”

आम्ही सारेच शरमलो. कमळाबाईंना बसण्यासाठी कुणी बरं खुर्ची पुढं सरकवली ? आठवलं की, कमळाबाईंनी स्वतःच खुर्चीची निवड केली होती. खुर्चीऐवजी सोफ्यावर बसायला त्यांना काय झालं होतं? त्यांच्या अधःपतनाला त्याच जबाबदार होत्या; पण खुर्ची आमच्या मालकीची होती. त्यामुळं अर्धी जबाबदारी आमचीच होती. ताण आणखी थोडासा सैल करण्याकरता मी म्हणालो, “कमळाबाई, माफ करा. ध्यानात राहील आमच्या. पुढच्या खेपेला याल तेव्हा असं होणार नाही याची खात्री या क्षणी देतो… मग तर झालं?”

“पुढचं पुढं… पण, आज मी पडले त्याचं काय?” कमळाबाई पुन्हा ‘वैताग’ राग आळवायला घेतील की काय, असं वाटत असतानाच कमळाबाईंचे यजमान म्हणाले, “जाऊ दे गं… एवढासा मुद्दा… किती वाढवशील?”

“जाऊ दे काय ? मी पडल्येय… तुम्ही पडला असता तर कळलं असतं…” कमळाबाई नाक फेंदारीत म्हणाल्या.

आणि प्रधान मंडळी एकदाची निघाली. त्यांना त्यांच्या कारपर्यंत सोडून आम्ही परतलो. मी म्हणालो, “कमळाबाई पडल्या ते फार वाईट झालं. मोठी दुखापत झाली नाही ते आपलं नशीब… नाही तर…”

“अशा प्रसंगी माकडहाडाला इजा होते म्हणतात ना?” कुणी तरी प्रश्न उपस्थित केला.

“कमळाबाईंचं माकडहाड त्यांच्या चरबीत कुठं तरी लपून बसलं असेल…” दुसरा कुणी तरी हलक्या आवाजात बोलला; आणि काय बोलून गेलो म्हणून त्यानं जीभ चावली…

कमळाबाई खुर्चीत पडल्या त्यानंतरच्या दोन-चार दिवसांच्या अंतरानं पलीकडच्या कॉलनीतल्या शांताबाई साठे आपल्या सुनेसह आमच्याकडे गप्पाटप्पा करायला आल्या.

अरुंधतीनं नेहमीच्या सुहास्य मुद्रेनं त्यांचं स्वागत केलं. “या शांताबाई… बसा ! काही विशेष ?”

“काही नाही. सहज आले बसायला,” असं म्हणत शांताबाई खुर्चीवर बसल्या आणि त्या द्वाड खुर्चीनं त्यांची थेट कमळाबाईंसारखीच अवस्था केली. शांताबाई खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्यावर पडली खुर्ची.

“अहो आई, खुर्चीच्या कडेला बसलं की खुर्ची उलटणारच…” असं म्हणत त्यांच्या सूनबाई त्यांना उठवण्यासाठी पुढं सरसावल्या.

पण, सुनेचा हात झिडकारल्यासारखं करत फणकाऱ्यानं शांताबाई म्हणाल्या, “आता खुर्चीवर कसं बसायचं ते तुझ्याकडून शिकायला हवं मला…”

आणि आपल्याला खाली पाडणाऱ्या खुर्चीकडे आणि अरुंधतीकडे आळीपाळीनं रागानं पाहत त्या म्हणाल्या, “अहो, तुमच्याकडची खुर्ची मोडकी आहे, हे आम्हा बाहेरच्यांना कसं कळणार? तुम्ही अशा मोडक्या खुर्चा बाजूला का नाही काढून ठेवत ?”

अरुंधतीजवळ शांताबाईंच्या या प्रश्नावर उत्तर नव्हतं; पण ती एकदम बोलून गेली, “गेल्या आठवड्यात आमच्याकडे कमळाबाई प्रधान आल्या होत्या इतर कुटुंबीयांसोबत… त्यासुद्धा अशाच पडल्या!’

“कमळाबाई पडली? मला नाही बोलली ती… परवाच भेटली होती बागेत !”

“आपण खुर्चीत बसलो आणि खाली पडलो, असं सगळ्यांना सांगतं का कुणी?” शांताबाईंच्या सूनबाई बोलून गेल्या.

“हो! आहे ठाऊक. तुझ्याकडून ऐकायच्या आधी, ठाऊक होतं मला.” एवढं सुनेला सुनावून झाल्यावर शांताबाई अरुंधतीला म्हणाल्या, “पण, तुम्ही अशा मोडक्या खुर्च्य ठेवत जाऊ नका. कधी कधी नकळत तुम्हीच स्वतः खाली पडाल…” आणि कमरेवर हात ठेवत हळूहळू पावलं पुढं टाकत शांताबाई निघाल्या. त्यांच्यामागून त्यांची सूनबाईही निघाली.

आम्ही दोघं एकमेकांकडे पाहू लागलो. शांताबाई पडल्या म्हणून गंभीर व्हायचं का हसण्यावारी न्यायचं, याचा निर्णय घेऊ शकलो नाही. दरम्यान, बाहेर गेलेली घरातली मंडळी परतली. सगळ्यांच्या कानांवर शांताबाई पडल्याचं घातलं गेलं. तेव्हा एकीनं ‘अगोबाई !’ केलं, तर दुसरीनं ‘अय्या!’ म्हटलं..

also read : Story of Soragat in Marathi

शांताबाई खुर्चीत पडल्याची घटना समेळांच्या लताबाईंना कळली असावी; कारण, आमच्याकडे पाऊल ठेवता ठेवता त्या अरुंधतीला म्हणाल्या, “अहो, तुम्ही मोडक्या खुर्च्य ठेवता म्हणे दिवाणखान्यात आणि तुमच्याकडे येणारी माणसं खाली पडतात म्हणे… खरंय का ते?”

आणि एवढं बोलून त्या खुर्चीवर बसल्या मात्र… क्षणार्धात जमिनीवरच बसल्या. खुर्चीही त्यांच्या डोक्यावर आपटली.

“अगोबाई… काय हे? अगाई गंऽऽ” असं म्हणत लताबाई कशाबशा उठून उभ्या झाल्या आणि जळजळीत का काय म्हणतात ना, तसा कटाक्ष अरुंधतीच्या दिशेनं टाकत तोंडातून एकही शब्द न काढता चालू लागल्या.

“अहो… अहो लताबाई, थांबा! जरा बसून घ्या…”

“काही नको… पुन्हा पडायचं नाहीये मला.” असं कडक शब्दांत अरुंधतीला ऐकवून त्या दृष्टिआड झाल्या. अरुंधतीचा चेहराच पडला.

….आता मात्र आम्ही दोघंही हादरलो. बाहेरून आमच्याकडे येणारी माणसं अशी खुर्चीवरून खाली पडू लागली तर गावात नाक वर करून चालायची सोयच उरणार नव्हती. नेमका काय प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही दोघांनीही आळीपाळीनं प्रत्येक खुर्चीवर बसून पाहिलं. अर्थात योग्य ती सावधगिरी पाळूनच; पण तिची गरज नसल्याचंही जाणवलं. खुर्त्यांत कसलाच दोष नव्हता… बसू पाहणाऱ्या मंडळींचं काही तरी चुकत असावं या निर्णयाला आम्ही पोहोचलो आणि या निर्णयानं आमचं आम्हाला बरं वाटलं. त्यानंतर घरातल्या इतरांनाही जरा जपूनच बसायला सांगितलं. काही जणांनी ‘जरा जपून’ ही आमची सूचना या कानात ऐकून त्या कानानं सोडून देऊन बसून पाहिलं. कुणीही पडला नाही! ‘या बायका खुर्चीवर नीट बसत नाहीत. त्यामुळं त्या पडतात.’ या निष्कर्षावर सर्वांनी सहमती दर्शविली.

पण, पुढच्या दोन दिवसांत खुर्चीतून पडण्याचा ‘मान’ आमच्याकडे आलेल्या कुलकर्त्यांच्या सुनेला – उत्कर्षाला मिळाला!

उत्कर्षा म्हणजे सावधातली सावध तरुणी. ती स्वतःला खूपच जपते, असाच तिच्याबद्दलचा ‘लौकिक’ आहे… पण, उत्कर्षासुद्धा खुर्चीतून पडली. खुर्चीनं उत्कर्षाला चांगलंच खाली पाडलं. तिच्या दोन्ही हातांचे कोपर सडकून निघाले. आपण खुर्चीतून खाली कसे पडलो याबद्दल आश्चर्य करावं, का क्रोधित व्हावं, का शरमेनं चूर व्हावं तेच मुळी उत्कर्षाला समजेना. अरुंधतीनं पुढं होऊन तिला उठवलं. दुसऱ्या कुणी पाणी आणून दिलं; पण उत्कर्षा खुर्चीकडं अगदी भयभीत नजरेनं पाहत असल्याचं पाहून अरुंधतीच्या हृदयाचा ठोका चुकला. आता उत्कर्षाकडून काय काय ऐकावं लागणार म्हणून अरुंधती कावरीबावरी दिसू लागली…

उत्कर्षानंतर सान्यांची कावेरी पडली. तिच्यानंतर, सुलभाताई पडल्या… अशा एकूण सात-आठ तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पदाला पोहोचलेल्या महिला पडल्या आणि टीव्हीवरच्या ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतल्या पात्रांप्रमाणे आम्हालाही प्रश्न पडला, की “हे घरात चाललंय ते काय?” त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे आमच्यापैकी कुणीच खुर्चीवर बसायला गेला आणि जमिनीशी समांतर झाला असं घडलं नव्हतं… घडत नव्हतं; पण इतरांच्या पडण्याचं काय ?

आमच्या घरातल्या खुर्चीत बसू पाहणारी माणसं विशेष करून महिला खाली पडतात हे वास्तव आमच्या छोट्या गावात पसरायला वेळ लागला नाही. आमच्या गावातला प्रत्येक जण दुसऱ्याला ओळखतो वा असं म्हणू या, की ओळखून असतो. आमचं घर त्यातल्या त्यात बरं म्हणूनच ओळखलं जायचं; पण खुर्चीतून पडण्याच्या प्रसंगांनी आमच्या घरावर शिंतोडे उडू लागले. खुर्चीत बसलेली व्यक्ती अचानक कशी खाली पडते, हे पाहण्यासाठी गावातली काही मंडळी आमच्याकडे येऊ लागली. “सहज म्हणून आलो,” असं म्हणत सावधगिरीनं खुर्चीत बसू लागली. त्यातल्या पुरुष मंडळींना काही झालं नाही. म्हणजे पुरुष पडले नाहीत; पण महिलांना मात्र खुर्चीनं पाडलंच. आणखी एक विशेष गोष्ट जाणवली. पुरुषांप्रमाणेच अविवाहित तरुणीही नाही पडल्या… नाही म्हणायला सात्त्विकांच्या आशाताई आणि त्यांची सून समीक्षा… दोघांपैकी कुणीच नाही पडली! पण, पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसू लागली आणि मला आमच्या काका काणेंची आठवण झाली. काका काणे म्हणजे ज्ञानी माणूस. कुणाच्याही, कोणत्याही लहान-मोठ्या समस्येवर काका काण्यांच्या पोतडीत उत्तर असणार म्हणजे असणारच. काका काणे थोडे मूडमध्ये मात्र असायला हवेत… आमच्याकडच्या द्वाड, खोडकर खुर्चीचा प्रश्न काका काणे आणि केवळ काका काणेच तेवढे सोडवू शकतील, असा दृढ विचार करून मी काका काण्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नाला लागलो; पण काका काणे गावात नव्हते… दुसरीकडे कुठं तरी गेले होते आणि नेमके कुठं गेलेत याचा नेमका पत्ताही कुणाजवळ नव्हता… एव्हाना आमच्याकडे संशयानं पाहणाऱ्यांची संख्या वाढू लागली.

आणि एक दिवस खुद्द काका काण्यांची स्वारीच घराच्या दारात उभी राहिली…

“काय रे? काय ऐकतोय मी? तुमच्याकडच्या खुर्च्य बसणाऱ्याला खाली पाडतात काय ? मला आधी सांग, अशा जुन्यापुराण्या मोडकळीस आलेल्या खुर्चा तुम्ही मोठ्या अभिमानानं तुमच्या या प्रशस्त दिवाणखान्यात ठेवताच कशासाठी ? दुसरा कुणी खाली पडल्याचा आनंद लुटायची ‘वृत्ती’ कधीपासून आली तुमच्यांत?” काका काणे पुढंही काही प्रश्न उपस्थित करू पाहत होते; पण मी त्यांना हात दाखवून थोडं थांबायला सुचवलं. काकांनी लगेच हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवलं. त्या आधी एकच शब्द त्यांच्या तोंडून निघाला, “बोल…”

मग मी गेल्या सहा महिन्यांत आमच्याकडच्या खुर्चीत बाहेरचे कसे पडू लागतात, त्याबद्दलची इत्थंभूत माहिती पुरविली.

सगळं शांतपणे ऐकून काका म्हणाले, “हे सगळं आलंय माझ्या कानांवर; पण यामागचं कारण शोधून काढायचं असेल तर व्यवस्थित एक तक्ता बनवायला घ्यावा लागेल… या तुमच्याकडच्या खुर्चीत सर्वांत आधी कोण पडलं? तो दिवस कोणता होता ? वेळ कोणती होती? नेमक्या कुठल्या क्षणी ती व्यक्ती बसायला गेली आणि खाली पडली? या सगळ्याची सुसंगत अशी यादीच तयार करायला हवी. कोण सांगेल ही माहिती मला ? अचूक माहिती हवी.”

मी म्हणालो, “इतरांनी खुर्चीवरून खाली पडण्याच्या घटनेचा चष्मेदिल गवाह म्हणजे साक्षीदार मीच आहे. अरुंधती आणि इतरांच्या डोळ्यांदेखत काही पडलेली आहेत; पण् आजपर्यंत ज्या ज्या महिला पडल्या त्यांना त्या स्थितीत पाहण्याचं दुर्भाग्य केवळ माझंच आहे. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली माहिती मीच तुम्हाला सांगू शकेन.”

आणि मग काका काणे आणि मी, दोघांनी तास-दीड तास खर्ची घालून सगळी माहिती कागदावर लिहून काढली. त्या कागदाकडे लक्षपूर्वक एकटक पाहता पाहता काका काणेंचा चेहरा खुलू लागला. एक मोठंच रहस्य आपल्याकडून उलगडू पाहतेय यासंबंधीचा जबरदस्त आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यकिरणांप्रमाणे पसरलेला दिसला आणि मी, महाभारतातल्या युद्धभूमीवर अर्जुनानं श्रीकृष्णासमोर हात जोडले होते त्या थाटात हात जोडून म्हणालो, “काका, तुम्हाला आमच्याकडच्या अतर्क्स घटनांमागचं कोडं उलगडलेलं मला तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती – मग ती बरोबर असो वा चूक – आपण म्या पामराच्या कानांवर घालाल काय?”

also read : Story of Soragat in Marathi

काका किंचित चिडक्या सुरात म्हणाले, “काय म्हणालास? माझ्याकडची माहिती चुकीची असू शकते ? मग जाऊ दे. मी काहीच नाही सांगणार. नाही तरी चुकीच्या माहितीचा तुला उपयोग तो काय ?”

“काका, केवळ जीभ घसरल्यामुळेच म्हणजे स्लिप ऑफ टंगमुळे माझ्या तोंडून ते शब्द निघाले, ते मी या क्षणी मागं घेतो आणि एवढंच म्हणतो, की तुमच्याजवळची शंभर टक्के बरोबर माहिती म्या पामराच्या कानांवर घालण्याची कृपा करावी.”
“आता कसा आलास लाइनीवर…” असं म्हणत विजयी मुद्रेनं काका म्हणाले, “सुदैवानं एक गोष्ट चांगली आहे, की आपल्या या छोट्या गावातल्या, तुमच्याकडे येणाऱ्यांच्या जवळजवळ प्रत्येक कुटुंबाची खडान्खडा माहिती माझ्याजवळ आहे. कुणाच्या घरात काय चाललं… कुणाच्या घरात सासू- सुनेचं एकमेकांशी अपेक्षित सौहार्द कितपत आहे, याची पूर्ण माहिती माझ्यापाशी उपलब्ध आहे आणि म्हणूनच खुर्चीतून खाली पडण्यामागचं नेमकं कारण मी अधिकारवाणीनं सांगू शकतो.”

“काका, नमनाला घडाभर तेल घालून झालं. आता मुद्द्यावर यायला काय घ्याल?” असं अगदी जिभेवर आलेलं वाक्य मी मोठ्या प्रयत्नांनी परतवून लावलं आणि पुन्हा हात जोडून म्हणालो, “काका, आपण सर्वज्ञ आहात. लक्ष्मी तुमच्याकडे पाणी भरत नसली तरी सरस्वती तुमच्या इथं भांडी घासते, याचा प्रत्यय याआधीही आम्हाला आलाय. आता ऐकू द्या आम्हाला तुमच्या मुखातून बाहेर पडणारी अमृतवाणी…’

एवढी तारीफ ऐकल्यावर कुणीही खूश होईल. काका तर डबल खूश झाले. नाक फुगवून म्हणाले, “अरे, तुमच्याकडच्या खुर्थ्यांना, सासूचे सुनेप्रति आणि सुनेचे सासूप्प्रति तणावाचे संबंध मान्य नाहीत! त्यामुळेच अशा खाष्ट, आक्रमक सासू- सुनांना धडा शिकवण्यासाठी खुर्ची त्यांना पाडत असते. अशांनी आपल्यावर बसायला येऊ नये असेच तुमच्याकडच्या खुर्थ्यांना वाटत असतं !!”

“काय? काय म्हणता काका? या मंडळींच्या खुर्चीतून खाली पडण्यामागचं हे कारण आहे? पटत नाही हो…” मी म्हणालो.

“पटवून घ्यावं लागेल. खुर्चीतून पडलेल्या प्रत्येकीचा स्वभाव, वागणं यासंबंधीची माहिती माझ्याजवळ आहे. त्यामुळे तेच एकमेव कारण असायला हवे, या निष्कर्षाला मी आलेलो आहे. मला सांग, तुमच्याकडे येऊन खुर्चीत बसणारी तमाम पुरुष मंडळी आणि अविवाहित तरुणी का नाही पडत?” काकांनी आणखी एक मुद्दा मांडला.

“पण काका, ही मंडळी आमच्याच घरातल्या खुर्त्यांवरून का पडताहेत ? दुसरीकडेही ही मंडळी मधूनमधून जात असतात; पण दुसऱ्यांच्या घरी पडल्याचं कधीच कानांवर आलेलं नाही, ते कसं?”

“त्यामागचं कारण म्हणजे तुमच्या या घरातल्या सासू आणि चार सुनांचं एकमेकांशी असलेलं अतिसौहार्दपूर्ण नातं. तुमच्या या घरात सासू-सुनांची भांडणं होत नाहीत. एकमेकांवर जिव्हारी लागतील अशा शब्दांचे वार केले जात नाहीत… याचा प्रभाव नाही म्हटलं तरी खुर्चीसारख्या दर्शनी निर्जीव वस्तूवरही पडतो. त्यामुळे तुमच्यापैकी कुणीही खुर्चीवर बसल्यावर खाली पडत नाही. उलट, घराबाहेरच्या अशा भांडखोर, चुगलखोर, वाचाळ, खाष्ट मंडळींना तुमची खुर्ची आपल्यावर सुखानं बसू देत नाही… उलट, खाली पाडून एक प्रकारचा निषेधच व्यक्त करते ती त्यांच्या वागण्याचा! त्यांच्या वर्तनाचा!”

“पण काका, हे तुमचं तर्कट अजबच म्हणायचं. पचनी पाडायला कठीण आहे. मी तर म्हणेन, ये बात ठीक से हजम नही हुई…”

“तो तुझा प्रश्न आहे. मला सांग, सात्त्विकांची सासू-सून तुमच्याकडे येते. ही एकमेव अशी जोडी आहे जी खुर्चीतून पडलेली नाही, कारण त्यांच्यातलं नातं सौहार्दपूर्ण आहे. आदर्श आहे. जसं तुमच्याकडे आहे तसंच…”

“तसं असेल तर मी खुर्चा काढून टाकतो आणि सोफे आणतो. म्हणजे कुणी कसाही वागत असेल तरी पडणार नाही…” मी माझ्या डोक्यात आलेला विचार काकांसमोर मांडला.

काका म्हणाले, “मूर्खपणा होईल तुझा. अरे, तुमच्याकडचे सोफेसुद्धा अशा मंडळींना खाली पाडतील. एक वेळ खुर्ची डोक्यावर पडली तर फारशी इजा होत नाही; पण सोफा पडला तर ? मंडळी जखमी होतील… त्यांच्यावरच्या उपचाराचा खर्च तुझ्याकडून वसूल केला जाईल…”

“तर मग मी दिवाणखान्यातल्या सगळ्या खुर्च्छा- सोफासेट काढून टाकतो आणि भारतीय बैठक म्हणून चटया पसरवून ठेवतो…”

“त्यानंही काही होणार नाही. चटईवर बसलेली अशी व्यक्ती चटईसह गुंडाळली जाईल… तुझी समस्या आणखी वाढेल…”

“तर मग काका, यावर नेमका उपाय तो काय ? एवढं सांगितलंत तर उपायदेखील सांगावाच लागेल…” मी हट्टच धरला.

काका चेहऱ्यावर किंचित हास्य पसरवीत म्हणाले, “आहे! उपाय आहे. जगातल्या कुठल्याही समस्येवर उपाय हा असतोच… सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे, इतरांच्या घरांप्रमाणेच तुमच्याही घरातल्या सासू-सुनांचे परस्पर संबंध बिघडू द्या. दररोज लहानमोठी भांडणं, वादावादी होऊ द्या. घरातलं सध्याचं शांत वातावरण संपूर्ण नष्ट होऊ द्या. निर्जीव खुर्थ्यांना त्याचीही सवय होईल आणि मग सासू-सुनेचं भांडण हे जनरीतीला धरूनच असतं या समजानं प्रेरित झालेल्या तुमच्याकडच्या खुर्चा कुणालाही खाली पाडू पाहणार नाहीत. थोडक्यात, तुमच्या घरातली शांतता ढवळून निघू द्या…”

also read : Story of Soragat in Marathi

काका काणेंनी सुचवलेला हा उपाय ऐकून आमच्यापैकी – सगळ्यांनाच हसावं का रडावं तेच कळेना! आमच्या या जगावेगळ्या समस्येवर तुम्हीही डोकं खाजवा आणि काकांनी सुचवलेल्या उपायाव्यतिरिक्त दुसरं काही सुचलं असेल, तर अवश्य कळवा ! आम्ही सारे तुमच्या सल्ल्याची वाट पाहत आहोत.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.