The story of a girl who fell from the sky into the forest

The story of a girl who fell from the sky into the forest in Marathi : आकाशातून जंगलात पडलेल्या मुलीची गोष्ट

1 min read

The story of a girl who fell from the sky into the forest : ही गोष्ट आहे जवळपास ५० वर्षांपूर्वीची. अगदी खरी घडलेली.

२४ डिसेंबर १९७१. पेरूची राजधानी लिमाचा विमानतळ भरून वाहत असतो. ख्रिसमसच्या आधीचा दिवस असल्यामुळे प्रत्येकालाच घरी पोहोचण्याची घाई असते. सतरा वर्षांची ज्युलियन कोपेक आणि तिची आई मारिया या दोघी त्यात असतात. ज्युलियनच्या शास्त्रज्ञ आई-वडिलांचं पेरूच्या अॅमेझॉन जंगलात संशोधन केंद्र असतं. या दोघी आज तिकडेच चाललेल्या असतात. लिमा ते पुकाल्पा हा अवघ्या तासाभराचा प्रवास. हवा अगदी उत्तम असते, प्रवास सुरळीत सुरू असतो; पण दुपारी अचानक एक वादळ विमानावर थडकतं. मोठा हादरा बसतो आणि काही कळायच्या आत ज्युलियनच्या लक्षात येतं की आपलं विमान खाली कोसळतंय..

.. जाग येते तेव्हा ज्युलियन अॅमेझॉनच्या जंगलात चिखलमाती आणि पालापाचोळ्याने आच्छादलेल्या जमिनीवर पडलेली असते. एका क्षणात तिच्या लक्षात येतं की आपलं विमान क्रॅश झालं आहे.. आपण जंगलात आहोत आणि आपली आई आपल्याजवळ दिसत नाहीये. ती उठून उभी राहण्याचा प्रयत्न करते; पण तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येते. थोडा वेळ तशीच पडून राहिल्यावर ती हातावरचं घड्याळ चाचपून पाहते, तर बरेच तडे गेले असले तरी घड्याळ अजून सुरू असतं. नऊ वाजलेले असतात. प्रकाशावरून ज्युलियन ताडते की सकाळची वेळ असावी. म्हणजे आदल्या दिवशी दुपारी विमान कोसळल्यापासून सकाळपर्यंत ती बेशुद्धावस्थेत जंगलामध्ये पडून असते.

बऱ्याच प्रयत्नांनंतर तिला उठून उभं राहायला जमतं. आपल्याला नेमकं कुठे आणि किती लागलंय हे ती चाचपून बघते. मानेजवळचं एक हाड वेडवाकडं लागत असल्याचं आणि पिंढरीला एक खोल जखम झाल्याचं तिला जाणवतं; पण आश्चर्य म्हणजे दोन्ही ठिकाणी तिला दुखत नसतं. किमान १० हजार फुटांवरून कोसळूनही एवढ्या मामुली जखमांवर आपलं कसं काय निभावलं हे तिला कळत नाही. या जखमांपेक्षा दोन-तीन गंभीर समस्या असतात. एक तर तिचा चष्मा हरवलेला असतो, एक सँडल गायब असते आणि तिचा उन्हाळ्यासाठी घातलेला आखूड ड्रेस जंगलातल्या मुक्कामासाठी अगदीच चुकीचा असतो. चांगले बूट आणि कपडे नसताना अमेझॉनच्या जंगलात राहणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. कारण साप आणि नाना प्रकारच्या विषारी कीटकांचं ते साम्राज्यच.

also read : Story of Timeplease in Marathi

उठून चालता येऊ लागल्यावर ज्युलियनची पहिली प्रतिक्रिया असते ती आजूबाजूला विमानातलं आणखी कोणी दिसतं का ते पाहण्याची. अॅमेझॉनचं रेन फॉरेस्ट म्हणजे प्रचंड आकारांच्या झाडांची गर्दी असलेलं जंगल. दहा पावलंही सरळ चालता येऊ शकणार नाही इतकं दाट. त्यातून वाट काढत काढत ज्युलियन आसपासचा परिसर हिंडते, पण तिथे विमान कोसळल्याची कुठलीच चिन्हं नसतात. ना विमानाचे अवशेष, ना जखमी माणसं, ना विमानात तिच्या शेजारी बसलेली तिची आई. विमानातून फक्त आपणच खाली कोसळलो की काय असं ज्युलियनला वाटतं. थोड्याच वेळात तिला कळून चुकतं की आपल्या आसपास मदतीला इतर कोणीही नाही. विमान नेमकं कुठे पडलंय ते आपल्याला माहिती नाही. थोडक्यात, या किर्र जंगलात आपण आता एकटेच असून कोणीही तातडीने आपल्या मदतीला येण्याची शक्यता नाही. पण तरीही ज्युलियन घाबरून जात नाही की आपण कुठे जंगलात येऊन पडलो अशी भावना तिच्या मनात तयार होत नाही. याचं एक कारण विमानातून खाली कोसळल्याच्या धक्क्यामुळे ती काहीशी बधीर झालेली असते. कोणतीच भावना पटकन तिचा ताबा घेत नाही. ना तिला भीती वाटत असते, ना जखमांमुळे वेदना होत असतात, ना आता आपलं कसं होणार याची चिंता वाटत असते.

दुसरं कारण म्हणजे अॅमेझॉनचं हे जंगल तिच्या ओळखीचं असतं. लहानपणापासून ती आई- वडिलांच्या संशोधन केंद्रात येत-जात असते आणि दोन-तीन वर्षं तर ती या जंगलातच राहिलेली असते, आई-वडिलांबरोबर जंगलात भरपूर भटकलेली असते. जंगलाचे कायदेकानू तिला माहिती असतात. झाडा-वनस्पतींशी, प्राण्यांशी, विषारी किड्यांशी, सापांशी आणि प्रत्येक वेळेला रूप बदलणाऱ्या जंगलाशी तिची ओळखच नव्हे तर मैत्री असते.

आता आपल्यालाच जंगलातून बाहेर पडण्याचा रस्ता शोधावा लागणार हे लक्षात आल्यावर तिला वडिलांनी सांगितलेला जंगलातला पहिला नियम आठवतो: कधीही जंगलात हरवलीस तर वाहत पाणी शोधून काढ. पाणी ज्या दिशेला वाहतंय त्या दिशेने पाण्यासोबत चालत राहिलीस तर माणसांच्या वस्तीपर्यंत पोहोचशील. त्यामुळे ती पाण्याचा शोध घेऊ लागते. थोडा वेळ आसपास फिरल्यावर ज्युलियनला एक छोटा ओहोळ वाहत असलेला दिसतो. वाटेत तिला कँडीचं एक पाकीट सापडतं, बहुतेक ते विमानातूनच पडलं असणार. पण ते सोडता इतर प्रवाशांच्या काहीच खाणाखुणा तिला दिसत नाहीत. तिला स्वतःला फारशा गंभीर जखमा झालेल्या नसतात. त्यामुळे विमानातले इतर प्रवासी बचावले नसतील अशी शंकाही तिला येत नाही. आपल्यापासून लांब कुठे तरी तेही जिवंत असतील आणि त्यात आपली आईही असेल असंच तिला वाटत असतं. त्यामुळे त्यांची वाट पाहत थांबून न राहता या छोट्या ओहोळाचा माग पकडून चालत राहायचं असं ती ठरवते.

पण या ओहोळाच्या सोबतीने चालणं सोपं नसतं. झाडांच्या गर्दीमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. शिवाय सगळा परिसर चढ-उताराचा असतो. कधी कधी ज्युलियनला झाडांमधून वाट काढत बरंच चढून जावं लागतं; पण हे चढ टाळण्यासाठी शॉर्टकट घेऊन जंगलाच्या आत शिरणं किती जोखमीचं आहे याची तिला कल्पना असते. त्यामुळे कितीही दमणूक होत असली तरी ती पाण्याच्या काठाने चालत राहते. थोड्या वेळाने हा ओहोळ मोठा होत जातो आणि त्याचं छोट्या झऱ्यात रूपांतर होतं. आता त्याच्या कडेने चालणंही थोडं कमी त्रासदायक बनतं. अपघातानंतरच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास अंधार पडायला लागतो आणि ज्युलियन रात्री मुक्कामासाठी थोडी बरी जागा शोधून झोपण्याची तयारी करते.

फुट कँडीचं एक पाकीट वगळता ज्युलियनकडे खायला काहीच नसतं. मासे पकडून भाजून खावेत, असा विचार केलाच तरी आग पेटवायलाही तिच्याकडे काही साधनं नसतात. अगदी दोन वाळक्या काटक्यांनी किंवा दगडांनी ठिणगी कशी पेटवायची हेही तिला माहिती असतं; पण या पावसाळ्यात सगळं जंगल भिजलेलं असतं. एक कैंडी खाऊन झऱ्यातलं पाणी पिऊन पोट भरणं एवढंच तिच्या हातात असतं.

also read : Story of Timeplease in Marathi

त्या रात्री ज्युलियनला गाढ झोप लागते. रात्रीतून किती किडे अंगावर वळवळले असतील, कोणते प्राणी आसपास फिरून गेले असतील याचा विचार करण्याचंही ती टाळते. बहुतेक अजूनही तिच्यावरच्या धक्क्याचा परिणाम पुरता ओसरलेला नसतो. सकाळी उठून ती पुन्हा चालू लागते. चालताना अनेकदा तिला धोकादायक किडे दिसत असतात. एके ठिकाणी पक्ष्यालाही खाऊ शकणारा आणि धोका वाटला तर माणसावरही हल्ला करणारा विषारी कोळी तिला दिसतो. पण नशिबाने तो झऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असतो..

ज्युलियनला आकाशातून विमानांचे आवाजही ऐकू येत असतात. बचावकार्यासाठी घिरट्या घालणारं विमान असावं असं ती ताडते; पण झाडांच्या दाटीतून तिला विमान दिसणं शक्य नसतं, मग विमानातून ती दिसणं तर अशक्यच. पण तरीही विमानाचा आवाज ऐकू आल्यावर ती खच्चून ओरडून घेते. आपला आवाज या झाडांच्या टोकांपर्यंत पोहोचणंही शक्य नाही हे माहिती असूनही.

चौथा दिवस थोडा वेगळा उजाडतो. दुपारच्या वेळेस तिला एक कर्कश आवाज ऐकू येतो. तो ऐकून पहिल्यांदाच ज्युलियन भीतीने गोठून जाते. आवाजावरूनच ती ओळखते की हा गिधाडांचा आवाज आहे. एवढ्या जवळ गिधाडं आहेत याचा अर्थ कुठे तरी मोठ्या प्रमाणावर मांस आहे हे उघड असतं. तिच्या मनात येतं, या गिधाडांचं इथे येण्याचं कारण माझी आईच असेल तर? थोड्याच वेळात तिला गिधाडांचं अन्न दिसू लागतं. विमानातल्या तीन आसनी खुर्चीवर तीन मृतदेह वेड्यावाकड्या अवस्थेत पडलेले असतात. जमिनीत घुसलेली तोंडं आणि आकाशाच्या दिशेने उंचावलेले पाय. त्या तिघांमधली एक बाई असते. ती आपली आई तर नसेल ना, या विचाराने ज्युलियन सुन्न होऊन जाते. त्या ठिकाणाहून पळून जावं अशी इच्छा तिचा ताबा घेते, पण शहानिशा करण्याशिवाय पर्याय नसतो. जवळ जाऊन बघते तर तिला त्या बाईच्या पायाची रंगवलेली नखं दिसतात. ती सुटकेचा निःश्वास टाकते. आई कधीच नखं रंगवत नाही, हे तिला माहीत असतं. पण त्या दृश्यामुळे तिची बधिरावस्था थोडीशी कमी होते. आईचं काय झालं असेल, हा विचार तिच्या मनाचा ताबा घेतो. आई सुखरूप असणार, असं स्वतःला बजावत ती चालत राहते.

आता ज्युलियनकडच्या कँडीही संपलेल्या असतात. पावसाळा असल्यामुळे कुठल्याच झाडाला फळं नसतात. पामचा गर वगैरे खावा म्हटलं तर तो काढण्यासाठी तिच्याकडे सुरी नसते. जंगलातल्या बहुतेक गोष्टी विषारी असल्यामुळे कुठलाही धोका पत्करायला ती तयार नसते. त्यामुळे झऱ्यातलं माती मिसळलेलं गढूळ पाणी पिऊन पोट भरण्याशिवाय आता दुसरा पर्याय नसतो, पण जिथे मानवी वस्ती नाही तिथलं पाणी पिण्यात फारसा धोका नाही एवढं ज्युलियनला माहिती असतं. बहुधा ते पाणी प्यायल्यामुळेच तिला भुकेचीही फारशी जाणीव होत नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट. पण तिच्या शरीरातली ताकद मात्र झपाट्याने कमी व्हायला लागलेली असते.

also read : Story of Timeplease in Marathi

पाचव्या किंवा सहाव्या दिवशी तिला पुन्हा एकदा विमानांची घरघरही ऐकू येऊ लागते. ती पुन्हा एकदा जोरजोरात ओरडून विमानांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. आता जंगल तुलनेने डं कमी झालेलं असतं. त्यामुळे आपण विमानातून नक्की दिसू असं तिला वाटत असतं. विमानांचे आवाज कमी कमी होत लांब निघून जातात तेव्हाही ती स्वतःची समजूत काढते, की आता थोड्याच वेळात विमान पुन्हा परतेल आणि आपली सुटका होईल. पण बराच काळ जाऊनही काहीच घडत नाही. अंधार पडू लागतो तसं तिचं मन निराशेने भरून येतं. आपण सोडून विमानातल्या इतर सगळ्या प्रवाशांची सुटका झाली असणार आणि आपण सापडत नसल्यामुळे आता शोधमोहीम थांबवण्यात आली असणार असं वाटून तिचा संताप संताप होतो.

एकच सँडल घातलेल्या पायांनी काठावरून चालवणं अवघड जात असल्यामुळे ती नदीच्या पात्रातूनच चालायचं ठरवते. शिवाय जंगलामध्ये नदीच्या काठावर स्टिंग रे विश्रांती घेत बसलेले असतात याचीही तिला माहिती असते. अशा एखाद्या स्टिंग रेवर चुकून जरी पाय पडला तरी मृत्यू ओढवणार हे नक्की. त्यापेक्षा नदीतून चाललेलं बरं, असा विचार ती करते. अर्थात नदीच्या पाण्यातही धोके कमी नसतात. मगरींची भीती असते. शिवाय पिरान्हा नावाचे शिकारी मासेही या पाण्यात आढळण्याची शक्यता असतेच. पण हे प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करणार नाहीत हे ज्युलियनला माहिती असतं. शिवाय, काहीही असलं तरी हे धोके पत्करून चालत राहण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय काय असतो? एखादी चांगली जागा सापडली तर तिथेच थांबून राहावं आणि सुटकेसाठी कोणी येईल याची वाट पाहावी का, असंही तिच्या मनात एक-दोनदा येऊन जातं. पण आता थांबलो आणि आणखी चार दिवसांनी पुन्हा चालण्याची वेळ आली तर तेवढी शक्ती आपल्याकडे उरणार नाही आणि आपण या जंगलातच संपून जाऊ याची जाणीव तिला पुढे रेटत असते.

एक चांगले असतं, की मनातून तशी शंका असली तरी आता लवकरच शोधमोहीम थांबवली जाणार अप्तल्याचं ज्युलियनला कळण्याची काही शक्यता नसते. तिला हेदेखील कळण्याची शक्यता नसते की विमानातील एकाही व्यक्तीची सुटका झालेली नसते. तिच्याखेरीज विमानातलं कुणाही वाचलेलं नसते. पण हे माहीत नसल्यामुळे सर्व बातम्यांपासून दूर ती स्वतःच्या विचारांमध्ये चालत असते. आपल्या आईचा विचार करत प्रार्थना करत राहते. पण हळूहळू चालणं आणि रात्रीची झोप या दोन्ही गोष्टी त्रासदायक बनत जातात. रात्र तर अतिशय वेदनादायी असते. डास किंवा कोणते ना कोणते किडे रात्री तिच्या जवळपास उधड्या अंगावर चाल करून येत असतात. थोडी डुलकी लागते ना लागते तोच नवा दंश तिला जागं करत असतो. चिलट, माश्या, पिसवा आणि अशा हजारो प्रकारच्या किड्यांची संख्या इतकी असते की चास. ते किडे तिच्या तोंडात, नाकात, डोळ्यांत, कानांत सगळीकडे शिरून चावे घेत असतात. हे कमी की काय, म्हणून कधी तरी रात्रीतूनच पाऊस सुरू होतो. दिवसाच्या वेळी जंगलातली हवा दमट आणि उष्ण असली तरी रात्री पाऊस सुरू झाल्यावर मात्र कडाक्याची थंडी वाजते. पावसाचे थेंब सुया टोचल्यासारखे ज्युलियनच्या अंगात घुसत असतात. छोट्याशा ड्रेसमध्ये चिंब भिजून आता आणखी थंडी सहन होणं शक्य नाही अशा परिस्थितीत ज्युलियन रात्रभर कुडकुडत राहते.

त्यातच आणखी एक समस्या डोकं वर काढते. तिच्या खांद्याजवळ एक जखम झालेली असते. अधूनमधून मान मागे वळवून ती जखम तपासण्याचा चाळा ज्युलियनला लागलेला असतो. एकदा तिच्या लक्षात येतं की त्या जखमेत अळ्या वळवळताहेत. बहुतेक एक प्रकारच्या माश्यांनी त्या जखमेत अंडी घातलेली असतात आणि त्यातून अळ्या बाहेर आलेल्या असतात. ती जखम डोळ्यांसमोर नसल्यामुळे त्या अळ्या काढणं ज्युलियनसाठी अतिशय अवघड असतं. मान तिरकी करून एका काटकीचा चिमटा तयार करून ती त्या अळ्या काढण्याचा प्रयत्न करत; पण काटकीचा स्पर्श झाल्यावर त्या पुन्हा जखमेच्या आत गायब होतात. ज्युलियनच्या घरच्या कुत्र्याच्या जखमेतही अशाच अळ्या झाल्याचं तिला आठवत. तेव्हा त्याच्या जखमेवर केरोसीन टाकून त्या बाहेर काढलेल्या असतात. पण इथे तिच्याकडे ना केरोसीन असतं ना आणखी कुठलं औषध. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा काटकीने डिवचून त्या एकेक करून बाहेर काढण्याशिवाय पर्याय नसतो. सध्या तरी त्या अळ्यांमुळे काही त्रास नसला, तरी आपल्या शरीरात अळ्या वळवळताहेत ही जाणीव फारशी चांगली नसते. या अळ्या आपलं शरीर आतून पोखरून काढताहेत, अशी दृश्यं ज्युलियनच्या डोळ्यांसमोर दिसू लागतात.

also read : Story of Timeplease in Marathi

आता नदीचा प्रवाह आणखी मोठा झालेला असतो आणि त्यात पोहत पोहत पुढे जाता येऊ शकेल असा शोध ज्युलियनला लागतो. त्यामुळे तिच्या प्रवासाचा वेग वाढतो आणि शक्तीही कमी खर्च होते. नदीत मध्ये मध्ये मोठाले ओंडके पडलेले असतात. त्यांच्यावर न आदळता पुढे जाण्याची कसरत तिला करावी लागते एवढंच. या टप्प्यात तिला नदीकिनारी अनेक प्राणीही दिसतात, पण त्यांची भीती वाटावी असं त्यात कुणीही नसतं. एकदा मात्र ज्युलियन संकटात सापडता सापडता बचावते. थोडा काळ नदीच्या काठी विश्रांती घेत असताना तिला एक ओळखीचा आवाज ऐकू येतो. छोट्या मगरीच्या पिल्लांचा तो आवाज असतो. ती पिल्लं नदीतून बाहेर येत अगदी तिच्या जवळ येऊन ठेपलेली असतात. पाहते तर त्यांची आईही नदीतून बाहेर पडण्याच्या बेतात असते. पिलांच्या सुरक्षेपोटी ती आपल्यावर जीवघेणा हल्ला करू शकते हे ज्युलियनला माहिती असतं. पण इथेही जंगलाबद्दलचं तिचं ज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो. काठावर येणारी मगर दिसली की कुणीही तिच्यापासून दूर जंगलात पळून जाण्याचा विचार करणार. पण जंगलात घुसलं तर इतर प्राण्यांची भीती तर आहेच, शिवाय बाट चुकण्याचा धोकाही मोठा आहे, हे ज्युलियनला माहिती असतं. त्यापेक्षा ती स्वतःच्या अनुभवावर विसंबून थेट पाण्यात शिरते आणि मगरीशेजारून पोहत पुढे पुढे जाते. आपण आपल्या मार्गाने गेलं तर मगर आपल्या वाटेला जाणार नाही, हा तिचा होरा बरोबर ठरतो आणि एक धोका टळतो.

आता पोहणं आणि चालणं अशक्त ज्युलियनसाठी आणखी अवघड होऊ लागलेलं असतं. आता खायला मिळालं नाही, तर आपण जिवंत राहणं अवघड आहे, हे तिला कळत असतं. पण काय खाणार? पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे बेडूक ओरडत असतात. ते पकडून खावेत, असा विचार तिच्या मनात येतो. किळस बाजूला ठेवून ती बेडूक पकडण्याचा प्रयत्नही करते; पण काही केल्या तिला ते जमत नाही. शक्ती आणि चपळता दोन्ही कमी झालेली असल्यामुळे अगदी हातात येऊनही बेडूक तिच्या तावडीतून सुटतात.

दहावा दिवस उजाडतो. आता थोडा काळ विश्रांती घेतल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही, असं वाटून ती एका ठिकाणी किनान्याशी थांबते, थोड चालल्याबर तिला अचानक समार एक बोट उभी दिसते, अगदी नवी कोरी करकरीत बोट. आपल्याला नक्कीच भास होतोय याची जणू ज्युलियनला खात्रीच असते; पण तरीही शंका नको म्हणून जवळ जाऊन हात लावून बघते, तर बोट खरीच असते, किनाऱ्याकडे लक्ष जातं, तर तिथे एक छोटा तंबू उभारलेला तिला दिसतो. एका ओढीने ती त्या तंबूकडे जायला लागते; पण तिच्या अंगात त्राण इतके कमी असतात की ते शंभर फूट चालायला तिला काही तास लागतात.

त्या तंबूत कुणी तरी माणूस असेल अशी तिला आशा असते; पण तिथे कुणीच नसतं. कुणी येऊन गेलंय अशी चिन्हंही नसतात. पण त्या तंबूमुळे ज्युलियनला किमान एक आसरा मिळतो. शिवाय तिथे तिला केरोसीनची बाटली मिळते. ती पाहिल्यावर तिला खांद्याजवळच्या जखमेत झालेल्या अळ्या आठवतात. खूप प्रयत्नांनी बाटलीचं बूच उघडून ती थोडं थोडं केरोसीन जखमेवर टाकते. प्रचंड वेदना होतात आणि पहिल्यांदा अळ्या आणखी आत जाण्याचा प्रयत्न करतात, पण नंतर मात्र त्या झपाट्याने बाहेर येऊ लागतात. ज्युलियन अशा ३० अळ्या मोजते. सगळ्या बाहेर आलेल्या नसल्या तरी तेवढ्या कामगिरीमुळेही ती स्वतःवर खूष होते. ज्युलियन इतकी थकलेली असते की तिथे मेल्यासारखी झोपून राहते. इतकी चांगली झोप फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही लागणार नाही असं तिच्या मनात येतं.

आता पुढे चालत राहावं की थांबून या तंबूचा मालक येईल याची वाट पाहावी हे ज्युलियनला कळत नाही. नदीच्या काठाशी लागलेली बोट घेऊन पुढे जावं असा मोहही तिला एकदा होतो; पण ती बोट आणखी कुणी तरी ठेवलेली असणार. आपण ती घेऊन गेलो, तर त्या माणसाचं काय होईल, हा विचार तिच्या मनात येतो. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालणं तिला त्या परिस्थितीतही पटत नाही. शिवाय या अशक्त अवस्थेत ती बोट चालवू शकेल का याबाबतही शंका असतेच.

बाहेर पाऊस पडत असतो आणि आत ज्युलियन अर्धवट जागी, अर्धवट ग्लानीत पडून असते. डोक्यात नाना विचारांचा गोंधळ उडालेला असतो. तिच्या मनात येतं, अपघाताला दहा दिवस नक्कीच उलटून गेले आहेत. आतापर्यंत नक्कीच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं गेलं असणार. फक्त आपणच या जंगलात एकटे भरकटतोय. आपली सुटका होण्याआधीच आपण मरून गेलो तर आपला शेवट कुठे झाला हे जगात कुणालाही कळणार नाही. दहा दिवस आपण कोणत्या परिस्थितीतून गेलो, किती धीराने-किती कष्ट घेऊन जिवंत राहिलो हे जगात कधीच कुणाला कळणार नाही, असे काय काय विचार तिच्या मनात येत असतात..

आणि तितक्यात बाहेरून माणसांचे आवाज ऐकू येतात. आधी ज्युलियनला हाही भासच वाटतो. पण हळूहळू ते आवाज जवळ येतात, तिच्या समोर येऊन उभे ठाकतात. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि भीतीचं मिश्रण असतं. त्यांनी काही विचारण्याआधीच ज्युलियन बोलू लागते, “मी लान्सा क्रॅशमधून वाचलेली मुलगी आहे. माझं नाव ज्युलियन, मी गेल्या दहा दिवसांपासून चालते आहे. आणि आता मरणाची दमले आहे.” तिचं बोलणं ऐकल्यावर त्या माणसांचे चेहरे बदलतात. ते भराभर तिला हवं नको ते बघायला लागतात. आपल्याकडचं खाणं काढून तिला देतात. खरे तर त्या दिवशी या तंबूकडे येण्याचा त्यांचा अजिबात विचार नसतो; पण सहज म्हणून ते तिथे येतात आणि त्यांना ज्युलियन सापडते.

पण जंगलातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आल्यावर तिला आणखी धक्के बसायला सुरुवात होते. बाहेर आल्यावर तिला कळतं की त्या विमान अपघातातून तिच्याखेरीज एकही प्रवासी वाचलेला नसतो. अगदी तिची आईसुद्धा. आपण जंगलात जीव वाचवण्यासाठी धडपडत होतो, तेव्हा त्याच जंगलात कुठे तरी आपल्या आईचा जीव मात्र वाचू शकला नाही, याचा विचार करून ज्युलियन खिन्न होऊन जाते.

also read : Story of Timeplease in Marathi

ज्युलियन सुखरूप बचावल्याची बातमी जगभर पोहोचल्यावर ती किती धाडसी आणि असामान्य आहे असा कौतुकवर्षाव तिच्यावर झाला अजूनही होत असतो. पण ज्युलियन म्हणते, ‘मी असामान्य अजिबातच नव्हते. आजही नाही. आई-वडिलांनी मला जंगलाच्या सान्निध्यात वाढवलं म्हणून मी तिथे तरू शकले; पण माझ्या जागी आणखी कोणी असतं तरी त्यांनीही तेवढंच धाडस दाखवलं असतं. असामान्य परिस्थिती आपल्याला त्या त्या वेळी असामान्य बनवते, हे त्यामागचं खरं कारण असलं पाहिजे.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.