Story of Yanku

Story of Yanku in Marathi : यांकु गोष्ट.

1 min read

Story of Yanku : “जिमी कुठाय?” जिमीच्या बाबांनी विचारलं.

“तो विवराच्या आसपास असेल. काळजी करायचं कारण नाही. यांकुला घेऊन गेलाय.” जिमीची आई म्हणाली. “बरं, मला सांग… तो आलाय का?” त्यांनी पुढे विचारलं.

“होय, स्पेस स्टेशनवर आहे तो. त्याच्या तपासण्या चालू आहेत. शिवाय त्याला तीन दिवस एकान्तवास आहे. मलाही बघायची उत्सुकता आहेच. पंधरा वर्ष झाली, पृथ्वी सोडल्यास पृथ्वीवरचं काहीही बघितलेलं नाही…”

“जिमीने तर त्याच्या उभ्या आयुष्यात असलं काही बघितलेलं नाही.” जिमीची आई म्हणाली.

“कसा बघणार? तो चंद्रावर जन्मला, त्यामुळे पृथ्वीवर जाऊ शकत नाही. म्हणून तर मी पृथ्वीवरून हळूहळू जमेल तशा काही गोष्टी आणायच्या असं ठरवलं. हे चंद्रावर प्रथमच घडतंय.”

जिमीच्या आईचा अंदाज चुकीचा नव्हता. जिमी खरोखरच एका चांद्रविवराच्या उतारावर खेळत होता. पृथ्वीवरच्या दहा वर्षांच्या मुलांच्या मानाने तो अगदीच काटकुळा आणि उंच होता. त्याचे हात- पायही लांबसडक होते. त्यामुळे तो खूपच चपळ होता. अंगावरल्या स्पेस सूटमुळे तो जरा तरी बरा दिसत होता. मात्र, त्याला चंद्रावरच्या गुरुत्वाकर्षणाचीच सवय असल्यामुळे तो इथे अगदी सहज वावरत होता. पृथ्वीवरून इथे ‘ल्युना सिटी’त येऊन राहिलेल्या लोकांना अजूनही ते पूर्णपणे जमलेलं नव्हतं. त्यामुळेच जिमीचे वडील या उतारावर त्याला कधीच पकडू शकले नव्हते. विशेषतः तो कांगारू उड्या मारू लागला की ते हरलेच म्हणून समजा.

also read : Story of -The school of then

जिमी ज्या विवरापाशी खेळत होता त्या पलीकडे क्षितिजावर नेहमीप्रमाणे जवळजवळ पूर्ण पृथ्वी दिसत होती. ल्युना सिटीतून ती नेहमीच या ठिकाणी दिसायची. विवरापाशी तिचा उजेडही पडत होता.

“चल, चल यांकु, थांबलास कशाला?” असं म्हणत जिमी लांब लांब उड्या मारत त्या उतारावर निघाला. बांकुला जिमीच्या स्पेस सूटमधल्या रेडिओद्वारा हा संदेश मिळाला. बांकुला स्पेस-सूटची गरजच नव्हती. तो यांत्रिक कुजा होता. यामुळे त्याला मागे टाकणं जिमीला कधीच जमलं नव्हतं. या वेळीही तसंच झालं. बांकु एका झेपेतेच जिमीच्या पुढे गेला, जिमीची उडी त्याच्यावरच पडायची, पण ऐन वेळी जिमी सावरला.

“यांक्या, आगाऊपणा करू नकोस. दूरही जाऊ नकोस. नाही तर बघ!” जिमीने दम दिला. यांकुने नेहमीप्रमाणे यांत्रिक शीळ घालून त्याला उत्तर दिलं. यांकु वेगवेगळ्या शिट्ट्या वाजवायचा; जिमीला त्यांचे अर्थ लगेच समजायचे. जिमीला यांकुची गंमत करायची लहर यायची.

Story of Yanku

जिमीने उलटी उडी मारली आणि दोनच उड्यांमध्ये तो विवराच्या अंधाऱ्या भागात आला. त्या भागात जायचं नाही, असं जिमीला आई-बाबांनी अनेकदा सांगितलं होतं. तसं का हे जिमीला माहिती नव्हतं. त्याला तर त्यात काही धोका दिसायचा नाही. त्यामुळे तो अनेकदा तिथे जायचा, यांकु चित्रविचित्र आवाज काढून त्याला ‘तिथे जाऊ नको’ असं सांगायचा खरा, पण जिमीचं रक्षण करायची जबाबदारी असल्याने तोही जिमीच्या मागे तिथे यायचाच. यांकु जिमीजवळ येईपर्यंत जिमीच्या स्पेस सूटच्या आत त्याच्या कानाशी बाबांचा आवाज आला, “जिमी, लगेच घरी ये.” जिमी नाईलाजाने मागे फिरला.

घरी आल्यावर जिमीने स्पेस सूट काढला आणि अंघोळ केली. यांकुलाही त्याने धुवून काढलं. यांकुवर पाणी मारायला सुरुवात केली की तो चित्रविचित्र आवाज करत असे. मग जिमीचे बाबा म्हणायचे, “यांकु, चूप!” की मग त्याचे आवाज थांबायचे.

अंघोळ करून जिमी बाहेर आला. त्याचे बाबा म्हणाले, “जिमी, तुझ्यासाठी एक भेट आणलीय. बहुधा उद्याच घरी येईल.”

“पृथ्वीवरून आणली?” जिमीने विचारलं,

हो. खराखुरा जिवंत कुत्रा ! एक स्कॉच टेरियरचं पिल्लू, चंद्रावरचा पहिला जिवंत कुत्रा, आता तुला यांकुची काहीच गरज पडणार नाही. आणि दोघांनाही ठेवून घ्यायला आपल्याला परवानगीही मिळणार नाही, यांकु आता दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल.” त्यावर जिमी काहीच बोलला नाही, तसे बाबा म्हणाले, “तुला कुत्रा म्हणजे काय ते ठाऊक आहे ना, जिमी? तुझा यांकु म्हणजे खऱ्या कुत्र्याची नक्कल आहे.”

also read : Story of -The school of then

“बाबा, यांकु ही नक्कल असेल की आणखी काही। पण माझा यांकु माझा कुत्राच आहे.”

“अरे, पण तो हाडामासाचा कुत्रा नाही; यांत्रिक आहे.”

“मला जे हवं ते ते तो करतो, बाबा. त्याला मी काय बोललो ते बरोबर कळतं. तो जिवंतच आहे.”

“त्याला तसं प्रोग्राम केलंय. खरा कुत्रा तुझ्या- माझ्यासारखा जिवंत असतो. एकदा का तो आला की तू यांकुकडे बघणारही नाहीस.” बाबा म्हणाले.

“त्या कुत्र्यासाठी स्पेस-सूट लागेल ना, बाबा?”

“होय. त्याशिवाय तो जगेलच कसा? पण त्याला हळूहळू सवय होईल इथली.”

जिमीने यांकुकडे बघितलं. तो त्याला घाबरल्यासारखा वाटला. जिमीने हात पुढे केले. यांकु एका उडीत त्याच्या मिठीत आला.

“त्या कुत्र्यात आणि यांकुमध्ये नक्की काय फरक आहे?” जिमीने रडक्या सुरात विचारलं.

“तू प्रत्यक्ष तो कुत्रा बघशील तेव्हा आपोआपच तुझ्या लक्षात येईल. तो कुत्रा तुझ्यावर खरंखुरं प्रेम करेल. यांकुला तुझ्यावर प्रेम करायला शिकवलं गेलंय.”

also read : Story of -The school of then

“बाबा, आपण यांकु उघडून दुरुस्त करू शकतो, त्या कुत्र्याचं तसं नसतं. कदाचित त्यालाही प्रेमाचं नाटक करायला शिकवलं गेलं असेल.”

बाबांच्या कपाळावर आठ्या पडल्या. “जिमी, जिवंत प्राण्यांना असं खोटं वागायला शिकवता येत नाही.” ते जरा रागावून म्हणाले.

जिमीने यांकुला आणखीनच घट्ट धरलं. तो म्हणाला, “ते कसे वागतात याच्याशी मला काय करायचंय? माझ यांकुवर प्रेम आहे!” यांकु जिमीच्या मिठीत आनंदाने शीळ घालत होता. खरा कुत्रा असता तर त्या घट्ट मिठीत कदाचित गुदमरलाही असता.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.