Story of -The school of then

Story of -The school of then in Marathi : ‘तेव्हा’ची शाळा गोष्ट.

1 min read

Story of -The school of then : १७ मे २१५५. या दिवशी मार्जीने आपल्या डायरीत लिहिलं- ‘आज टॉमीला एक खरंखुरं पुस्तक मिळालं.’ ते पुस्तक खूप जुनं होतं. मागे एकदा मार्जी आजोबांबरोबर गप्पा मारत खेळत होती, तेव्हा आजोबांच्या तोंडून तिने ‘पुस्तकां’ विषयी ऐकलं होतं. आजोबा लहान असताना त्यांच्या आजोबांनी त्यांना पुस्तकांविषयी माहिती दिली होती. फार फार पूर्वी म्हणे कागदावर पुस्तकं छापली जात होती !

टॉमीला सापडलेल्या त्या पुस्तकाची पानं पिवळी पडलेली होती. काही पानांचे तर तुकडे पडले होते. मुख्य म्हणजे पानांवरचा मजकूर स्थिर होता. कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसतात तसे हे शब्द फिरते नव्हते. एवढंच नव्हे, तर ते सर्व शब्द वाचून झाल्यावर त्यांनी पान उलटलं, तर नव्या पानावर नवा मजकूर होता. अशी सर्व पानं वाचून संपली. परत त्यांनी पहिलं पान काढलं, तर तिथे आधी होता तोच मजकूर होता. नवा मजकूर आलेला नव्हता.

“शी! किती वाया जातंय हे सगळं ! पुस्तक वाचून झालं की ते म्हणे टाकून द्यायचं! आपल्या स्क्रीनवर लाखो-हजारो पुस्तकं येतात जातात, पण मी काही कॉम्प्युटर स्क्रीन कधी फेकून देणार नाही.” टॉमी म्हणाला.

also read : Story of Brother in Marathi

“हो ना.” मार्जी म्हणाली. “हे तुला कुठे मिळालं रे, टॉमी?” तिने विचारलं.

“आमच्या घरात.” आपल्या घराच्या दिशेने हात करत टॉमीने सांगितलं. तो ते पुस्तक वाचण्यात गढून गेलेला होता. “माळ्यावर कोपऱ्यात पडलं होतं ते.”

“कशाबद्दल आहे ते?”

“शाळा!”

टॉमीचं हे उत्तर ऐकून मार्जीच्या कपाळावर आठ्या अवतरल्या. “शाळेबद्दल लिहिण्यासारखं काय असतं? शी! मला शाळा मुळीच आवडत नाही!”

मार्जीला शाळा आवडत नव्हती हे खरंच होतं, आणि अलीकडे तर तिचा शाळेबद्दलचा राग वाढतच चालला होता. तिचा यंत्रशिक्षक तिच्या एकामागोमाग एक परीक्षा घेत होता, आणि प्रत्येक चाचणीत तिचे भूगोलाचे गुण कमी कमी होत चालले होते. असं का घडतंय हे तिच्या आईलाही समजत नव्हतं. शेवटी आईने यंत्रशिक्षकाची तपासणी करणाऱ्या माणसाला बोलावून घेतलं. त्या जाडजूड, बुटक्या माणसाच्या पोतडीत अनेक यंत्र, पकडी, चिमटे, स्क्रू ड्रायव्हर, तारा आणि घड्याळासारख्या वस्तू होत्या. त्याने यंत्रशिक्षकाचे सगळे भाग सुटे केले. मार्जीला बाटलं, त्याला शिक्षक पुन्हा जोडताच आला नाही तर काय मजा येईल! पण तसं काही झालं नाही. त्या माणसाने तिचा यंत्रशिक्षक जोडून पुन्हा पहिल्यासारखा केला. त्याच्या स्क्रीनवर धडे, प्रश्न – सगळं पूर्वीसारखंच दिसू लागलं. त्यातून पूर्वीसारख्याच गंभीर आवाजात सूचनाही येऊ लागल्या. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्या शिक्षकाच्या पोटातली फटही तशीच होती. या फटीतून मार्जीला आपल्या चाचणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका आणि गृहपाठ टाकावा लागायचा. त्या यंत्रशिक्षकाला कळेल अशा विशिष्ट खुणांच्या लिपीत तो लिहावा लागायचा. वयाच्या सहाव्या वर्षीच मार्जी ती लिपी शिकली होती. गृहपाठ किंवा उत्तरपत्रिका त्या फटीत सरकवली की एका मिनिटाच्या आतच यंत्रशिक्षकाच्या स्क्रीनवर गुणपत्रिका दिसायला लागायची; कुठली उत्तरं कशी चुकली आहेत आणि ती कशी लिहायला हवी होती याच्या सूचनाही दिसायला लागायच्या.

Story of -The school of then

दुरुस्तीचं काम संपल्यावर तो माणूस मार्जीच्या आईला म्हणाला, “तुमच्या मुलीची काही चूक नव्हती. ते यंत्र भूगोलाच्या बाबतीत थोडं जास्त वेगानेच चाललं होतं. आता मी ते यंत्र दुरुस्त केलं आहे. आता ते काही त्रास देणार नाही.” ते ऐकून मार्जी फारच निराश झाली. तिला वाटत होतं, की तो यंत्रशिक्षक दुरुस्तीसाठी घरातून बाहेर नेला जाईल आणि निदान काही दिवस तरी त्याच्या कचाट्यातून आपली सुटका होईल. मागे एकदा टॉमीचा शिक्षक तर महिनाभर दुरुस्तीसाठी घराबाहेर ठेवला होता

म्हणूनच तिने आता टॉमीला विचारलं, “शाळेबद्दल पुस्तकभर लिहावं असं काय आहे?”

टॉमीने तिच्याकडे ‘काय खुळी आहे ही!’ अशा तहेने बघितलं. “येडे, ती आपल्या शाळेसारखी शाळा नव्हती काही. ही फार पूर्वीची, जुन्या काळातली शाळा, शेकडो वर्षांपूर्वीची.” प्रत्येक शब्दावर जोर देत तो म्हणाला.

मार्जीला त्याचा रागच आला. हा स्वतःला फार शहाणा समजतोय लेकाचा! “इतक्या वर्षांपूर्वीची शाळा कशी होती ते मला कसं ठाऊक असणार?” असं म्हणत टॉमीच्या खांद्यावरून ती पुस्तकात डोकावली. मग म्हणाली, “म्हणजे त्या काळातही शिक्षक होते तर?”

also read : Story of Brother in Marathi

“हो, अर्थात होते; पण ते आपल्या या शिक्षकांसारखे नव्हते, तर चक्क माणसंच मुलांना शिकवायची.”

“माणसे कशी मुलांना शिकवायची? आश्चर्यच आहे!”.

“का? तो शिक्षक त्याला असलेली एखाद्या विषयाची माहिती मुलांना सांगायचा. मग गृहपाठ द्यायचा, चाचण्या घ्यायचा.”

“कसं शक्य आहे? माणूस इतका हुशार असूच शकत नाही.”

“का? माझे बाबा आहेत की माझ्या शिक्षकाएवढेच हुशार!”

“अंहं, एखाद्या माणसाला यंत्रशिक्षकाएवढं ज्ञान असणं शक्यच नाही.”

“माझे वडील यंत्रशिक्षकापेक्षा जास्त हुशार आहेत, पैज लावायची ?”

मार्जीला टॉमीशी वाद घालायची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने विषय बदलला. “माझ्या घरात कुणी परका माणूस मला शिकवायला आला तर ते मला आवडणार नाही.”

हे ऐकताच टॉमी खदखदा हसू लागला. म्हणाला, “तुला काहीच ठाऊक नाही, मार्जी. त्या वेळी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी राहायचे नाहीत काही! तर शिक्षक आणि सगळी मुलं एका वेगळ्याच इमारतीत जायची. वेगवेगळे शिक्षक वेगवेगळे विषय शिकवायचे.”

“आणि सर्व मुलं एकच अभ्यास शिकायची?”

“हो. सगळी सारख्या वयाची मुलं एकाच वर्गात बसायची आणि एकच अभ्यास करायची.”

“पण माझी आई तर म्हणते की प्रत्येक शिक्षक मुलाच्या बौद्धिक गरजा बघून बनवावा लागतो. त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्यांचा शिक्षक हा त्याच्यापुरताच उपयोगी ठरतो, आणि प्रत्येक शिक्षकाचा त्याच्या विद्यार्थ्याला शिकवण्याचा मार्ग वेगळा आणि त्या मुलापुरताच मर्यादित असतो.”

“ते आजचं झालं. त्या काळात तसं नव्हतं. तुला मी सांगतो ते खोटं वाटत असेल किंवा आवडत नसेल तर फुट!” टॉमी चिडून म्हणाला.

त्यावर झटकन मार्जी म्हणाली, “असं मी कुठं म्हटलं?” आता तिलाही ते पुस्तक वाचावंसं वाटायला लागलं होतं.

दोघं मिळून पुस्तक वाचायला लागले. तेवढ्यात मार्जीच्या आईने तिला हाक मारून शाळेची वेळ झाल्याचं सांगितलं.

“अजून थोडा वेळ आहे, आई!” मार्जी ओरडली.

“नाही, नाही, चला लगेच.”

“टॉमी, शाळा संपल्यावर तू ते पुस्तक आणशील? आपण दोघं मिळून ते पुढे वाचू या?”

“बघू.” इतकंच उत्तर देऊन टॉमी निघून गेला.

मार्जीही घरात गेली. आपल्या रोजच्या अभ्यासाच्या खोलीत शिरली. यंत्रशिक्षक तिची वाट बघत तयारीतच होता. तो रोज याच वेळी आपोआप सुरू होत असे. फक्त शनिवार आणि रविवार तो दिवसभर बंद असायचा. तिच्या आईच्या मते रोज ठराविक वेळेस अभ्यास केला तर अभ्यास चांगला होतो, म्हणून तिच्या यंत्रशिक्षकाचा प्रोग्राम असा बनवण्यात आला होता.

also read : Story of Brother in Marathi

कॉम्प्युटर स्क्रीन सुरू झाला. मार्जी त्याच्या समोर बसली. त्याबरोबर त्या स्क्रीनवर अक्षरं दिसायला लागली- ‘आज आपण अंकगणित शिकणार आहोत. अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते माहिती करून घेण्यापूर्वी कृपया कालचा गृहपाठ तपासण्यासाठी तपास फटीत सरकवावा.’ मार्जीने एक सुस्कारा सोडत तसं केलं; पण तिच्या मनात तिच्या आजोबांच्या आजोबांच्या लहानपणीची शाळा नाचत होती… आसपासची सर्व मुलं तेव्हा एकाच शाळेत जात होती. शाळेच्या आवारात हसत, भांडत, खेळत होती. वर्गात एकत्र बसत होती. शाळा सुटल्यावर आरडाओरडा करत बाहेर पडत होती आणि मिळून घरी परतत होती. त्यांना ‘सगळ्यांना एकच अभ्यास एकत्रित शिकवला जात होता. त्यामुळे गृहपाठ करताना ती एकमेकांना मदत करू शकत होती. त्याबद्दल चर्चा करत होती, शंका निरसन करत होती. शिकवायला तर म्हणे वेगवेगळे मानवी शिक्षक यायचे… त्या जुन्या, खूप खूप वर्षांपूर्वीच्या शाळेत किती मजा होती! पण आपल्याला मात्र या यंत्रशिक्षकापुढेच शिकत बसावं लागणार, हे जाणवून तिला रडू फुटायला लागलं.

Share This News

Related Latest News

Leave a Comment

Company

UNIVERSAL हे तुमचे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला शिक्षण, बातम्या आणि सरकारी योजनांशी संबंधित सर्व माहिती मिळते, तीही हिंदीमध्ये. तुम्हाला नवीनतम आणि सर्वात महत्त्वाची माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या शिक्षण आणि करिअरबद्दल योग्य निर्णय घेऊ शकाल.